२९ डिसेंबर २०२० या दिवशी(दत्तजयंतीला) सनातनचे २६ वे संत पू. भाऊकाका (सदाशिव) परब यांचा वाढदिवस झाला. त्यानिमित्ताने त्यांचा साधनाप्रवास येथे प्रसिद्ध करत आहोत. २ जानेवारी या दिवशी आपण पू. भाऊकाका यांची समष्टी साधना आणि सेवा ही सूत्रे पाहिली. आज त्यापुढील सूत्रे पाहूया.
(भाग ३)
भाग २ पहाण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/437117.html
१८. पूर्णवेळ साधनेला आरंभ
१८ ई. नोकरी सोडतांना वरिष्ठ किंवा सहकारी यांच्याकडून मिळालेली वागणूक : मी नोकरीतून स्वेच्छा निवृत्ती घेतांना आमचे वरिष्ठ अधिकारी (हेल्थ ऑफिसर) मासिक बैठकीमध्ये म्हणाले, ‘‘श्री. सदाशिव परब यांच्यासारखी प्रामाणिकपणे नोकरी करणारी माणसे या जगात मिळणे फार कठीण आहे.’’ त्यानंतर मला उद्देशून ते म्हणाले, ‘‘तुम्ही या खात्यात नोकरी करत असतांना दिलेली कामे व्यवस्थितपणे आणि प्रामाणिक राहून परिपूर्ण केलीत, हा तुमच्यातील गुण आम्ही शिकलो.’’ (ईश्वरी कृपेने मी एकाच तालुक्यात ३५ वर्षे नोकरी केली. सांगितलेली कामे पूर्ण केली नाही, तर वरिष्ठ अधिकारी आम्हाला शिक्षापत्रक देत. याची नोंद आमच्या सारख्यांच्या (‘ऑफिसरांच्या) प्रगतीच्या नोंदवहीत (‘पर्सनल रेकॉर्ड’वर) नोंद केली जात असे. देवाच्या कृपेने माझ्याविषयी ३५ वर्षांच्या कालावधीत एकही शिक्षापत्रक न मिळता मी नोकरी केली.) वरिष्ठ अधिकारी मला म्हणाले, ‘‘आम्ही तुमचा हा आदर्श घेऊ.’’
मी माझे सहकारी आणि वरिष्ठ यांच्यासमवेत मनमिळाऊपणाने आणि आनंदाने राहून ३५ वर्षे नोकरी केली. या काळात त्यांनी मला पुष्कळ सहाकार्य केले. यासाठी मी त्यांच्या चरणी कृतज्ञ आहे.
१८ उ. पूर्णवेळ साधक झाल्यानंतर केलेली विशेष सेवा
१. पूर्णवेळ साधक झाल्यानंतर मी गोव्यामध्ये विविध प्रकारे प्रसाराचे कार्य केले.
२. ६० टक्के आध्यात्मिक पातळी झाल्यानंतर आणि संत झाल्यानंतर गुरुमाऊलींच्या कृपेने गोवा अन् महाराष्ट्र येथील विविध जिल्ह्यांमध्ये जाऊन साधकांना ‘व्यष्टी अन् समष्टी साधनेचे आणि भावजागृतीचे प्रयत्न कसे करायचे ?’, याविषयी मार्गदर्शन केले.
३. साधकांच्या शंकांचे निरसन केले आणि त्यांच्या साधनेतील अडचणी दूर करून त्यांना आनंद मिळावा, यासाठी प्रयत्न करायला सांगितले.
या सेवा गुरुमाऊलींनी माझ्याकडून करवून घेतल्याविषयी मी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.
१९. साधकांसाठी नामजप करणे
१९ अ. नामजपादी उपाय करतांना शिकायला मिळालेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे
१. सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी नामजप शोधण्यास शिकवले.
२. ‘प्राणशक्तीवहन संस्थेतील अडथळ्यांमुळे होणार्या विकारांवर करायचे उपाय’ या ग्रंथाच्या अभ्यासाद्वारे ‘साधकांना होणार्या आध्यात्मिक त्रासाचे अडथळे कसे शोधायचे ?’ हे मला अनुभवता येत आहे.
३. आध्यात्मिक त्रास असणार्या साधकांसाठी मंत्रोपाय करतांना ‘साधकांना चैतन्य मिळून आणि त्यांचे त्रास दूर होऊन त्यांना बरे वाटते’, हे मला शिकायला मिळाले.
१९ आ. नामजपादी उपाय करतांना आलेल्या अनुभूती : मला आध्यात्मिक त्रास असणार्या साधकांसाठी नामजप करतांना कधी त्रास झाला नाही. माझ्याकडून प्रत्येक वेळी कृतज्ञता व्यक्त होते. माझी नामजपातील एकाग्रता वाढली आहे. मला आतून चांगले वाटते. रुग्ण साधकांवरील संकट टळते.
२०. आध्यात्मिक पातळी ६० टक्के आणि ‘संतपद घोषित होणे
२०.१२.२०१० मार्गशीर्ष पौर्णिमा या दिवशी (‘दत्तजयंती’ या माझ्या जन्मदिनादिवशी) माझी ६० टक्के आध्यात्मिक पातळी घोषित करून गुरुदेवांनी या जिवाला जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून मुक्त केले. तेव्हा परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी मला रामनाथी आश्रमात बोलावून माझा सन्मान केला. त्यांच्या चरणी नतमस्तक झाल्यावर मला ६ चरण दिसले. त्यांपैकी २ चरण निळ्या रंगाचे होते. हे गुरुमाऊलींना सांगितल्यावर ते म्हणाले, ‘‘जे डोळ्यांनी दिसत नाही, ते सूक्ष्मातून दिसते.’’
९.१०.२०१२ या दिवशी मला संत म्हणून घोषित करण्यात आले. ६० टक्के पातळी गाठीपर्यंत, तसेच ६० टक्के पातळी ते संतपद घोषित होणे, या माझ्या साधनाप्रवासात वेगळे काही वैशिष्ट्यपूर्ण घडल्याचे माझ्या लक्षात आले नाही.
२१. कुटुंबियांचे सहकार्य
२१ अ. कुटुंबियांकडून साधनेला आरंभी विरोध असणे आणि नंतर अनमोल साहाय्य मिळणे : पूर्वी कुटुंबातून पत्नी आणि मुली यांच्याकडून मला साधनेसाठी विरोध झाला; परंतु मी त्यांना समजावून सांगितल्यानंतर हळूहळू त्यांच्या विचारांत पालट होत गेला. आता त्यांचा विरोध पूर्ण मावळला आहे. पत्नी, मुलगा आणि सून आता घरी राहून नामजपादी साधना करू लागले आहेत.
२२. कुटुंबियांना शिकायला मिळालेली सूत्रे
२२ अ. पू. भाऊंची पत्नी सौ. सुफला सदाशिव परब, श्री. सूरज सदाशिव परब (मुलगा) आणि सौ. प्रीतम सूरज परब (सून)
१. ‘सनातनच्या देवद आश्रमात जातांना पू. भाऊ आम्हाला ‘व्यवहारातील आणि शेतीची कामे गडी ठेवून त्याच्याकडून करवून घ्या’, असे सांगून जात; परंतु ती कामे आमच्याकडून झाली नाही, तरी ते आम्हाला त्याविषयी ओरडत नसत. ते आश्रमातून घरी आल्यानंतर गड्याला बरोबर घेऊन ती कामे स्वतः करवून घेत किंवा काही कामे स्वतःच करत.
२. पू. भाऊ आश्रमातून वर्षांतून केवळ ३ वेळा घरी येतात. प्रत्येक वेळी परिस्थिती पाहून मला आर्थिक साहाय्यही करतात. आश्रमात राहूनसुद्धा ते घरच्या भूमीविषयीची कोर्टातील खटल्याची कामेही भ्रमणभाषद्वारे अधिवक्त्यांचा पाठपुरावा करून करवून घेत.
३. पू. भाऊंनी आम्हाला शेतातील कामेही करायला शिकवली आहेत. ‘माणसावर कितीही वाईट परिस्थिती आली, तरी देवाला प्रार्थना करून ती परिस्थिती आनंदाने स्वीकारायची आणि तिला सामोरे जायचे. देव आपल्याला साहाय्य करत असतो’, असे ते सांगतात.
४. पू. भाऊ प्रेमळ स्वभावाचे, व्यापक विचारांचे आणि निर्मळ मनाचे आहेत. त्यांनी आम्हाला ‘गुरुकृपायोगा’नुसार साधना कशी करायची, हे शिकवले. त्याप्रमाणे आम्ही कुटुंबातील सदस्य साधना करत आहोत.
५. पू. भाऊंनी सनातन संस्थेच्या मार्गदर्शनाखाली साधना चालू केल्यापासून ते सतत आनंदी आणि शांत असतात. त्यांना राग येत नाही. ते कोणत्याही कठीण परिस्थितीत स्थिर रहातात. ते नेहमी सांगतात, ‘माणसाने नेहमी शिकण्याच्या स्थितीत रहावेे. प्रत्येकातील गुण शिकत रहायचे. पुढे आपल्याला त्याचा मोठा लाभ होतो.’
अशा प्रकारे आम्हा कुटुंबियांना पू. भाऊंकडून पुष्कळ शिकायला मिळाले. यासाठी आम्ही श्रीमन्नारायणस्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या कोमल चरणी अनंत कोटी कृतज्ञ आहोत.’
२२ आ. सौ. सुजाता विजय सावंत (मुलगी)
१. ‘आमचे बाबा पू. भाऊ परब स्वभावाने चांगले आहेत. त्यांच्या तोंडवळ्यावर नेहमी हास्यच असते. ते फार शिस्तप्रिय आहेत. ते आमची पुष्कळ काळजी घेतात. त्यांनी आम्हाला शिस्तीने वागायला शिकवले आहे.
२. ते आम्हाला वेळोवेळी सांगतात, ‘शरिराला शिस्त लावणे नेहमीच चांगले असते. आपली सगळी कामे वेळच्या वेळी करा. ती परिपूर्ण आणि ‘सत्यम्-शिवम्-सुंदरम्’ अशीच करा.’
३. ‘कुठेही गेलात, तरी संध्याकाळ होण्यापूर्वी घरी यायचे. बाहेर जातांना ‘कुठे जात आहोत ?’, ते सांगून जावे. इतरांशी आदराने बोलावे. दुसर्यांना साहाय्य करावे’, असे ते आम्हाला सांगतात.
४. आम्ही लहान असतांना प्रतिदिन सायंकाळी सर्व मिळून आरती करायचो. त्या वेळी माझे सूर इतरांशी जुळत नसत. तेव्हा बाबा मला म्हणायचे, ‘‘आरती सुरात सूर मिळवून केली, तर ती देवाला आवडते.’’ मग बाबांनी मला आरती कशी म्हणायची, ते शिकवले. तेव्हापासून मला आरती चांगली म्हणता येऊ लागली.
५. आमच्या लहानपणी बाबांकडे प्रत्येक सोमवारी ‘शिवलीलामृता’चे वाचन होत असे. मला त्यातील काही शब्द स्पष्ट उच्चारता येत नव्हते. त्या वेळी बाबांनी ‘मी कुठे चुकत आहे’, हे दाखवल्यानंतर देवाच्या कृपेने मला ‘शिवलीलामृत’ वाचता येऊ लागले.
मनमिळाऊ आणि समजूतदार बाबा दिल्याविषयी मी गुरुमाऊलीच्या कोमल चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’
२२ इ. सौ. सुकांती गावडे (पू. भाऊ परब यांची बहीण)
१. ‘पू. भाऊंनी आपले जीवन समाजाचे अज्ञान घालवून ‘समाजाला सज्ञान करणे आणि आनंदाने जीवन कसे जगावे ?’, हे सांगण्यासाठी वाहिलेले आहे.
२. पू. भाऊ सदासर्वकाळ त्यागमय जीवन जगत आले आहेत. त्यांची शिकवण निःस्वार्थी असल्याने त्यांना कशाचीच अपेक्षा नसते.
३. त्यांच्यापासून त्यांच्या कुटुंबियांना चांगली शिकवण मिळते. त्यांचे मन शुद्ध असल्याने त्यांना काहीच वाईट दिसत नाही.
४. भाऊ नेहेमीच सर्वांशी आदराने आणि प्रेमाने बोलतात. ते आश्रमातून घरी आल्यानंतर आम्ही त्यांना भेटायला जातो. तेव्हा त्यांच्या सत्संगातच रहावेसे वाटते. घरी जावेसे वाटत नाही.
५. ‘भाऊंकडे पहातच रहावे’, असे वाटते.
६. भाऊंच्या शिकवणीनुसार साधना केल्याने मन शांत होते. वाईट विचार मनात येत नाहीत.
७. भाऊ संत झाल्याने आमच्या २१ पिढ्यांचा उद्धार झाला.’
२३. संत झाल्यावर कुटुंबियांना जाणवलेले पालट
२३ अ. श्री. सूरज (मुलगा), सौ. प्रीतम (सून) आणि सौ. सुफला सदाशिव परब (पत्नी)
१. ‘आमचे बाबा संत झाले, तेव्हा आम्हा कुटुंबियांना पुष्कळ आनंद झाला. आता त्यांचा तोंडवळा पुष्कळ तेजस्वी दिसतो. ते उत्साही असल्याचे जाणवते.
२. त्यांच्या वाणीत चैतन्य आणि गोडवा जाणवतो.
३. ते संत झाल्यापासून ‘त्यांना पहातच रहावे आणि त्यांच्या सत्संगात रहावे’, असे वाटते.
४. ते संतपदी विराजमान झाल्यावर ‘आमच्या पूर्वजांना गती मिळून त्यांचा उद्धार झाला आहे’, असे आम्हाला वाटते.
५. ‘ते ईश्वर आणि गुरुदेव यांच्याशी एकरूप झाले आहेत आणि त्यामुळे त्यांच्याकडून अधिकाधिक चैतन्य प्रक्षेपित होत आहे’, असे जाणवते.
६. बाबांना पाहून पुष्कळ शांत वाटते.’
२३ आ. सौ. सुजाता विजय सावंत (मुलगी)
१. बाबा संत झाले, तेव्हा त्यांना पाहून पुष्कळ आनंद झाला. तेव्हा ते भावस्थितीत होते.
२. पू. बाबा आश्रमातून घरी येतात, तेव्हा घरात पुष्कळ चैतन्य आणि आनंद अनुभवायला येतो.
३. पू. बाबा घरी आल्यावर सर्व लहान मुलांना चॉकलेट देतात. तेव्हा ‘ते प्रसादच देत आहेत’, असे वाटते.
४. त्यांना भेटण्यासाठी कुणी आले, तर बाबा त्यांच्याशी गोड बोलतात. त्यांच्या अशा बोलण्याने घरात चैतन्य निर्माण होते.
२३ इ. सौ. सुकांती गावडे
१. ‘संत होणे’, ही काही सर्वसामान्य गोष्ट नाही. संतपद मिळवण्यासाठी पुष्कळ कष्ट, श्रम आणि श्रद्धेने दिवस-रात्र परिश्रम घेऊन देवाच्या सातत्याने अनुसंधानात अन् नामजपात रहावे लागते. भाऊ संत झाल्यापासून आम्हाला त्यांचे आचार-विचार आणि वागणे-बोलणे यांत अहं जाणवत नाही.
२. पू. भाऊंना सुख-दुःख जाणवत नाही. ते सदैव नामस्मरण आणि देवाने दिलेल्या शिकवणीत मग्न असतात. ‘संतांचा प्रपंच परमार्थाचा असतो’, हे भाऊंच्या जीवनाकडे पाहून लक्षात येते.
३. त्यांच्या वाणीत चैतन्य जाणवते.
४. पू. भाऊ जेव्हा आम्हाला ‘संसारात राहून परमार्थ कसा करावा ?’, हे सांगतात, तेव्हा आमच्यातील वाईट विचार नष्ट होतात आणि पुष्कळ चांगले वाटते.
५. पू. भाऊंचे मन शुद्ध असल्याने त्यांच्या दृष्टीस काहीच वाईट दिसत नाही. ‘संतांच्या शिकवणीनुसार वागल्याने जीवन स्थिर होते आणि प्रारब्धही अल्प होते. त्यांना प्रारब्धावर मात करता येते’, हे आम्हाला अनुभवता येत आहे.’
२४. इतर संप्रदाय आणि सनातन संस्था
माझे आजोबा आणि वडील यांनी एकनाथी पंथाच्या एका संतांकडे जाऊन गुरुउपदेश (मंत्रजप) घेतला होता. त्यांच्यासमवेत मी श्रावणातील गुरुवारी, नवरात्रीमध्ये आणि भंडार्याला त्या संतांच्या मठात जात होतो. नंतर उपदेश देणारे संत इहलोक सोडून गेल्यावर पुढच्या पिढीस उपदेश देणारे कुणीही नव्हते. तेव्हा मला गुरुउपदेश घेण्यासाठी इतर संप्रदायातील लोक बोलावत होते. या संप्रदायातील लोकांकडे पाहिल्यावर ५० – ६० वर्षे गुरुउपदेश घेऊनही साधना करणार्यांमध्ये काहीच पालट जाणवत नव्हता किंवा त्यांची साधनेत प्रगती झालेली दिसत नव्हती; म्हणून त्यांच्याकडे जाण्यास माझ्या मनाची सिद्धता नव्हती.
त्यानंतर काही दिवसांतच मला सनातन संस्थेचे नाव कळले. मला योग्य मार्ग मिळाला.
२५.‘संकल्प’ आणि ‘अस्तित्व’ या स्तरांवर इतरांना आलेल्या अनुभूती
देवद आश्रमात सेवा करणार्या सहसाधकांना माझ्या अस्तित्वाने चैतन्य जाणवायचे.’
(समाप्त)
– (पू.) श्री. सदाशिव परब, कोल्हापूर (१५.१२.२०१८)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |