२९ डिसेंबर २०२० या दिवशी(दत्तजयंतीला) सनातनचे २६ वे संत पू. भाऊकाका (सदाशिव) परब यांचा वाढदिवस झाला. त्यानिमित्ताने त्यांचा साधनाप्रवास येथे प्रसिद्ध करत आहोत. १ जानेवारी या दिवशी आपण पू. भाऊकाका यांचे बालपण, शिक्षण आणि नोकरी ही सूत्रे पाहिली. आज त्यापुढील सूत्रे पाहूया.
(भाग २)
भाग १ वाचण्यासाठी येथे क्लीक करा : https://sanatanprabhat.org/marathi/436754.html
‘खडतर कष्ट केल्यावरच संत होता येते’, असे आपण बर्याच ठिकाणी वाचलेले असते. ‘खडतर कष्ट म्हणजे काय?’, हे पू. सदाशिव (भाऊ) परब यांच्या पुढील लेखातून लक्षात येते. असे संत सनातनला लाभले, हे सनातनच्या साधकांचे आणि माझेही भाग्यच आहे. ‘त्यांच्या सत्संगाचा लाभ घेऊन साधकांनी साधनेत लवकर प्रगती करावी’, अशी माझी भगवंताच्या चरणी प्रार्थना !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
४. समष्टी साधना आणि सेवा
४ अ. अध्यात्मप्रसार करणे : मी श्री गणेशचतुर्थी आणि अन्य सणांच्या वेळी घरोघरी जाऊन गणपतीची, तसेच संबंधित सणांच्या देवतांची शास्त्रीय माहिती द्यायचो.
४ आ. विविध ठिकाणी जाऊन ग्रंथप्रदर्शने लावणे : माझ्याकडे गोव्यातील डिचोली भागातील प्रसाराचेे दायित्व असल्याने मी साधकांसमवेत डिचोलीमध्ये अंतर्भूत असलेल्या विविध गावांतील जत्रांच्या आणि प्रमुख उत्सवांच्या वेळी ग्रंथप्रदर्शनाचे नियोजन करत असे. आम्ही वर्षभरामध्ये अंदाजे ५५ ठिकाणी ग्रंथप्रदर्शने लावत होतो. त्यात मला साधकांचा उत्स्फूर्त सहभाग मिळत असे. अशा प्रकारे गुरुमाऊली आम्हा साधकांकडून सेवा करवून घेत होती.
५. अन्य सेवा
अ. गोव्यातील विविध उत्सव आणि सण यांच्या वेळी प्रत्येक गावामध्ये सप्टेंबर आणि ऑक्टोबर मासांमध्ये घरोघरी जाऊन आणि व्यापार्यांना भेटून पुढील वर्षीचे पंचांग वितरण करत असे. मी गुरुपौर्णिमेच्या वेळी विज्ञापने आणण्याचीही सेवा करत असे.
आ. वर्ष १९९९ पासून मी सनातन संस्थेच्या मार्गदर्शनाखाली ‘गुरुकृपायोगा’नुसार साधनेला आरंभ केला. त्या वेळी मी सकाळी ६ वाजता आमच्या गावी, म्हणजे ‘मुळगाव’ (डिचोली, गोवा) येथे दैनिक ‘सनातन प्रभात’चे अंक आणि रविवारच्या ‘सनातन प्रभात’च्या अधिकच्या अंकांचे वितरण करत असे. त्याचप्रमाणे मी साप्ताहिक ‘सनातन प्रभात’च्या २१ अंकांचे वितरण करायचो. तेव्हा मला त्यातून पुष्कळ आनंद मिळत असे.
इ. त्या वेळी मी ४०० ते ५०० विशेषांक मागवून आम्ही त्यांचे डिचोली बाजारपेठेत आणि बसस्थानकावर जाऊन वितरण करत असू, तसेच बसमध्ये चढून बसलेल्या लोकांना दैनिक ‘सनातन प्रभात’चेे महत्त्व सांगून तेथेे वितरण करत असू. तेव्हा आम्हा सर्व साधकांना सेवेतून उत्साह आणि आनंद मिळत असे.
६. साधना चांगली होण्यासाठी केलेले प्रयत्न
मी साधना चांगली होण्यासाठी उत्तरदायी साधकांनी सांगितलेली अष्टांग साधनेची सूत्रे मन लावून आणि बुद्धीचा अडथळा न आणता करत होतो. माझ्यातील काही गुणांचा वापर होऊन गुरुमाऊलींनी सांगितलेली साधनेतील अनमोल सूत्रे त्यांनीच माझ्याकडून करवून घेतली, उदा. उत्तरदायी साधकाने दिलेली सेवा तत्त्वनिष्ठपणे, परिपूर्णतेने आणि बिनचूक करत राहिलोे. त्यामुळे साधनेचा प्रवास येथपर्यंत झाला; म्हणून मी गुरुमाऊलींच्या चरणी अनंत कोटी कृतज्ञ आहे.
७. ‘साधनेत सातत्य नाही’, असे माझ्या संदर्भात कधी घडले नाही.
८. मला आध्यात्मिक त्रास झाल्याचे माझ्या कधी लक्षात आले नाही.
९. प्रतिकूल परिस्थितीत रहाणे कठीण वाटत असतांना केलेले प्रयत्न
बालपणापासूनच मला प्रतिकूल परिस्थितीतून जावे लागले आहे. प्रत्येक परिस्थितीत भगवंताने मला सुखरूपपणे बाहेर काढलेे आहे. त्यामुळे मला अशी परिस्थिती कधीच कठीण वाटली नाही. जणू देवाने मला कठीण परिस्थितीतून जाण्याचा सरावच करून घेतला आहे.
१०. आरंभीपासून माझ्या जीवनात सर्व परिस्थितीत मी स्थिर राहूनच मार्गक्रमण करत आलो आहे.
११. स्वतःच्या आध्यात्मिक प्रगतीविषयी आलेले विचार किंवा अनुभूती
‘स्वतःची आध्यात्मिक उन्नती व्हावी’, असे मला कधी वाटले नाही; कारण ‘देव ती करणारच आहे’, यावर माझा दृढ विश्वास होता आणि अजूनही आहे. त्यामुळे वेगळे असे काही मला करावे लागले नाही, सर्व भगवंतच करून घेत आहे.
१२. साधनेच्या प्रवासात स्वतःत जाणवलेले पालट आणि त्यांतून साधकांपुढे ठेवलेला आदर्श
अ. प्रसाराला किंवा अर्पण आणण्यासाठी जातांना साधकांना एकत्र आणण्यासाठी त्यांच्याशी प्रेमाने वागून त्यांच्या सेवेचे नियोजन करणे.
आ. सेवेमध्ये प्रत्यक्ष कृतीच्या स्तरावर प्रत्येक टप्प्यात सहभागी होणे.
इ. साधकांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना साहाय्य करणे.
या कृतींमुळे सहसाधकांशी माझे चांगले जुळत असे.
आताही देवद आश्रमात भगवंत माझ्याकडून एकाग्रतेने, परिपूर्ण आणि भावपूर्ण सेवा करून घेत असल्याने अन् सर्व साधकांना सामावून घेऊन सेवा करावी लागत असल्याने भगवंतच माझ्या माध्यमातून सेवा करवून घेत आहे. त्यामुळे ‘मी काही केले’, असे झाले नाही.
१४. गुरुमाऊली आणि गुरुसेवा यांच्याप्रती असलेला भाव
गुरुमाऊली ही प्रत्यक्ष श्रीविष्णुस्वरूप, सत्यम्-शिवम्-सुंदरम् आणि मोक्षदायी आहे. या जिवाची कित्येक जन्मांची (५१ जन्मांची) साधना असल्यामुळे या जन्मी गुरुमाऊलीने मला त्यांच्या चरणांशी ठेवले आहे. गुरूंची सेवा म्हणजे ‘ईश्वराची सेवा’ आहे. अशी सेवा मिळण्यासाठी परम भाग्य लागते. गुरुदेवच सेवा देतात आणि त्यांना अपेक्षित अशी सेवाही तेच करवून घेतात. ही गुरुसेवेची अमूल्य संधी या पामराला दिल्यामुळे मी त्यांच्या कोमल चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.
१५. परात्पर गुरु डॉक्टरांनी साधनेविषयी केलेले वैशिष्ट्यपूर्ण मार्गदर्शन
अ. वर्ष २०१० मध्ये जेव्हा माझी ६० टक्के आध्यात्मिक पातळी घोषित झाली, तेव्हा गुरुमाऊली मला म्हणाली, ‘‘तुम्ही लवकर संत होणार !’’
आ. संत झाल्यावर माझी महाराष्ट्रातील प्रसारसेवा पूर्ण झाली. त्यानंतर उत्तरदायी साधकांनी मला लेखाची सेवा शिकण्यासाठी सांगितले. त्यासाठी पू. होनपकाका आणि पू. नकातेकाका यांच्यासमवेत रहाण्यास सांगितले. त्यानंतर देवद आश्रमात जाण्यास सांगितले.
१६. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे आशीर्वादात्मक बोल
प्रत्यक्ष भेटीदरम्यान परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘‘गोव्यातील साधकांना मार्गदर्शन झाल्यानंतर आता तुम्ही महाराष्ट्रात जायचे. मी आता जाऊ शकत नाही’’, असे उद्गार काढले होते.
१७. साधनेच्या प्रवासात संतांचे लाभलेले कृपाशीर्वाद
१७ अ. पू. नीलेश सिंगबाळ : वर्ष १९९९ मध्ये पू. नीलेश सिंगबाळ गोवा राज्याची सेवा पहात होते. १९९९ मध्ये त्यांनी मला डिचोली आणि वाळपई केंद्राची सेवा दिली. तेव्हा मी त्यांना म्हणालो, ‘‘मला हे दायित्व पेलवणार नाही. तेवढी माझी क्षमता आणि अभ्यासही नाही.’’ तेव्हा ते म्हणाले, ‘‘भाऊ, या सेवेचे दायित्व तुम्हाला परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी दिले आहे. तेच तुमच्याकडून त्यांना अपेक्षित अशी सेवा करवून घेणार आहेत.’’ त्यांचे हे बोल ऐकून माझे समाधान झाले आणि माझ्यात सकारात्मकता आली. त्यानंतर पुढे वेळोवेळी माझ्या शंकांचे निरसन करून त्यांनी मला चांगले मार्गदर्शन केले. त्यांच्याकडून लाभलेल्या साहाय्यामुळे गुरुमाऊलींनी मला येथपर्यंत आणले; म्हणून मी त्यांच्या आणि गुरुदेवांच्या चरणी पुष्कळ कृतज्ञ आहे.
१७ आ. सद्गुरु राजेंद्र शिंदे : वर्ष २०१२ मध्ये सनातनच्या देवद आश्रमात आल्यापासून सद्गुरु राजेंद्रदादांनी माझ्यातील तीव्र स्वभावदोषांची मला जाणीव करून दिली आणि ते दूर करण्यासाठी अन् माझ्यात ईश्वरी गुण वाढवण्यासाठी पुनःपुन्हा सांगून माझ्याकडून कृती करवून घेतली. हे मी माझ्या अंतःकरणात कोरून ठेवले आहे. मी त्याचा कधीच विसर पडू देणार नाही. यासाठी सद्गुरु राजेंद्रदादांच्या कोमल चरणी अनंत कोटी कृतज्ञ आहे.
१७ इ. परात्पर गुरु पांडे महाराज : देवद येथील आश्रमात आल्यापासून परात्पर गुरु पांडे महाराज यांनी माझ्या कुटुंबियांच्या आध्यात्मिक त्रासांचे निवारण होण्यासाठी काही आध्यात्मिक उपाय आणि मंंत्रजप दिले अन् त्रासांचे निवारण केले. हे मी कधीही विसरू शकणार नाही. यासाठी त्यांच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरीही ती अल्पच आहे. त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !
१८. पूर्णवेळ साधनेला आरंभ
१८ अ. पूर्णवेळ साधना करण्याविषयी झालेली विचारप्रक्रिया : मी पूर्णवेळ साधना करण्याला आरंभ केला. तेव्हापासून मी मनामध्ये ‘मी साधनेत झोकून देऊन, चिकाटीने आणि तळमळीने साधना करीन’, असा निश्चय केला. मी श्रीकृष्ण आणि गुरुमाऊली यांना प्रार्थना केली, ‘आता मला मोक्षापर्यंत घेऊन चला आणि तुमच्या चरणांशी स्थान द्या’, अशी माझी आपल्या कोमल चरणी शेवटची मागणी आहे.’
१८ आ. पूर्णवेळ साधना करण्याचा निर्णय घेतल्यावर कुटुंबियांकडून झालेला विरोध : मी पूर्णवेळ साधना करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा पत्नी, बहिणी आणि अन्य नातेवाईक यांनी मला विरोध केला. तेव्हा मी त्या सर्वांना साधेनेचे आणि ‘मनुष्यजन्माचे सार्थक करण्यासाठी साधना किती महत्त्वाची आहे !’, हे पटवून दिले. त्यामुळे त्या सर्वांनी शांत राहून माझ्या निर्णयाला स्वीकृती दर्शवली.
(क्रमशः सोमवारच्या अंकात)
– (पू.) श्री. सदाशिव परब, कोल्हापूर (१५.१२.२०१८)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |
भाग ३ पहाण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/437834.html