त्र्यंबकेश्वर (जिल्हा नाशिक) – ‘लव्ह जिहाद’च्या कायद्याचे मध्य प्रदेशात कठोर पालन केले जाणार असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. देशात आतापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखा शेतकर्यांचे हित जपणारा एकही नेता झाला नाही. नवीन कृषी कायद्यांमुळे शेतकर्यांना लाभ होणार आहे, असा दावा मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी येथे केला. त्यांनी २ जानेवारी या दिवशी जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वरचे दर्शन घेतले, त्या वेळी ते पत्रकारांशी बोलत होते.
त्र्यंबकेश्वर मंदिरात शिवराजसिंह चौहान यांनी सपत्नीक लघुरुद्र अभिषेक करून पूजा केली. शिवराजसिंह चौहान हे प्रतीवर्षी शिर्डी, तर दुसर्या दिवशी त्र्यंबकेश्वरमध्ये दर्शनासाठी येत असतात. यंदाच्या वर्षीही त्यांनी सहपरिवार दर्शन घेतले. या वेळी मंदिर परिसराच्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये वाढ करण्यात आली होती. शिवराजसिंह यांनी त्र्यंबकेश्वर मंदिरात पत्नी आणि आपल्या २ मुलांसह दर्शन घेतल्यानंतर मंदिर विश्वस्तांनी त्यांचे स्वागत केले.
चौहान पुढे म्हणाले, ‘‘गेले वर्ष भयावह होते. जगात कोरोनाने धुमाकूळ घातला होता. कोरोनामुळे भारतही बाधित झाला. अर्थव्यवस्था कोलमडली, अनेकांचे रोजगार गेले, अनेकांचा मृत्यू झाला; मात्र आता हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. देशाची परिस्थिती पूर्वपदावर यावी, आजपासून चालू झालेले कोरोनाचे ‘ड्राय रन’ यशस्वी होऊन कोरोनाचे संकट दूर व्हावे, यासाठी मी येथे प्रार्थना केली आहे. देशात जी.एस्.टी चांगला वसूल होत असून यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेलाही बळकटी मिळणार आहे. त्यातून देशात चांगली रोजगार निर्मिती होईल.’’