शिवोली येथील श्री सातेरी देवस्थानचा ४३ वा जत्रोत्सव

श्री देवी सातेरी देवस्थान, शिवोलीचा वार्षिक जत्रोत्सव शनिवार, २ जानेवारी २०२१ या दिवशी साजरा होत आहे. त्यानिमित्ताने देवस्थानचा इतिहास सांगण्याचा हा प्रयत्न !

शिवोली येथील श्री सातेरीदेवी

इतिहास

४३ वर्षांपूर्वी श्री देवी सातेरीची पुनर्स्थापना शिवोली गावात करण्यात आली. त्यापूर्वी जवळ जवळ ४०२ वर्षे श्री सातेरीदेवीचे वास्तव्य मोरजी गावी होते. त्या वेळी शिवोलीचे काही नागरिकच जत्रोत्सवात भाग घेत असत. आता गेली ४२ वर्षे देवीचा जत्रोत्सव वृद्धींगत होत आहे.

श्री सातेरी देवीचे मंदिर

देवस्थानामध्ये जत्रोत्सव, कालोत्सव, वर्धापनदिन, दिवजोत्सव, गुढीपाडवा, श्रावण महिनाभर भजनांचा कार्यक्रम, श्रावणी समराधना इत्यादी उत्सव साजरे होतात, तसेच अमावास्याही साजरी केली जाते. नवरात्रोत्सवाचा उत्सव चालू करण्यात आला आहे. या उत्सवामध्ये धार्मिक उत्सवांची आणखी भर पडावी, असे भाविकांचे मत आहे. त्यासाठी कार्यकारी मंडळ कार्यरत आहे.

यंदाचा ४३ वा जत्रोत्सव विविध धार्मिक विधींनी साजरा होणार आहे. जत्रोत्सवकाळात सकाळी श्रीचरणी पंचामृत अभिषेक, महापूजा, मंगलारती, प्रार्थना, तीर्थप्रसाद, दुपारी महाप्रसाद श्रीचरणी रूजू करण्यात येणार आहे.

कोरोनाविषयीचे नियम पाळण्याचे आवाहन

श्री सातेरी देवीच्या पालखीचे संग्रहित छायाचित्र

यावर्षी कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर ‘उत्सवाच्या दिवशी भाविकांनी गर्दी न करता कोरोनाविषयीचे नियम पाळून दर्शन घ्यावे’, असे आवाहन करण्यात आले आहे.

सर्वांनी देवीचा कृपाशीर्वाद प्राप्त करून घ्यावा, अशी देवस्थान कार्यकारिणीने विनंती केली आहे.

संकलक : कार्यकारी मंडळ, श्री सातेरीदेवी देवस्थान, शिवोली, गोवा.