हरिद्वार येथील वर्ष २०२१ च्या कुंभमेळ्यात होणार कोरोना नियमांचे पालन !

हरिद्वार  (उत्तराखंड) – येथे पुढील वर्षी मार्च ते एप्रिल मासामध्ये कुंभमेळा होणार आहे. कोरोनाच्या काळात होत असलेल्या या कुंभमेळ्याच्या निमित्ताने सर्व प्रकारचे नियम पाळण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. सामाजिक अंतर राखत येथे गंगा नदीमध्ये भाविकांना स्नान करावे लागणार आहे. येथे कोरोनाच्या तपासणीसाठी ३ मोठी केंद्रेही बनवण्यात येणार आहेत. या वेळी प्रथमच सामान्य घाटांसह नैसर्गिक घाटांचाही उपयोग केला जाईल. तात्पुरत्या स्वरूपातील प्लास्टिकच्या या घाटांवर सुरक्षेसाठी ‘डीप वॉटर बॅरिकेडिंग’ असेल. प्रत्येक बॅरिकेडिंग ४ मीटर परिसरात असणार आहे. भाविकांना सुरक्षितपणे अंघोळ करता यावी, यासाठी यात ४ फूट पाणी असणार आहे. कुंभसाठी पहिले स्नान ११ मार्च २०२१ या दिवशी महारशिवरात्रीला होणार आहे, तर शेवटचे चौथे २७ एप्रिलला चैत्र पौर्णिमेला होणार आहे.