मडगाव – १९ डिसेंबर २०२० या दिवशी होणार्या गोवा मुक्तीदिन सोहळ्यावर गोवा शासन ३ कोटी १० लाख रुपये खर्च करणार आहे. या कार्यक्रमासाठी शासनाने एक ‘ईव्हेंट मॅनेजमेंट’ आस्थापनाला ३ कोटी १० लाख रुपयांचे कंत्राट दिले आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या आदेशावरून संबंधित ‘ईव्हेंट मॅनेजमेंट’ आस्थापनाला हे कंत्राट दिल्याचा आरोप दक्षिण गोवा काँग्रेसचे अध्यक्ष जोसेफ डायस यांनी केला आहे.
जोसेफ डायस पुढे म्हणाले, ‘‘मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत १९ डिसेंबर २०२० या दिवशी होणार्या गोवा मुक्तीदिन सोहळ्यावरील खर्चाविषयी कोणतीही माहिती देण्यास नकार देत असल्याने यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा संशय येतो. मुख्यमंत्री या सोहळ्याला केवळ ४०० निवडक लोकांना निमंत्रण दिल्याचे सांगत आहेत. या सोहळ्यात गोवा मुक्तीलढ्यात सहभागी झालेल्या स्वातंत्र्यसैनिकांना निमंत्रण दिलेले नसल्याने मी शासनचा निषेध करतो. यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी निमंत्रण सूची घोषित करावी. गोवा मुक्तीदिन सोहळ्यावरील खर्चही शासनाने घोषित करावा. सोहळ्यासंबंधीच्या निविदेत क्रमांक ६ आणि ७ मध्ये ८०० लोकांच्या रात्रीच्या जेवणाची सोय केल्याचा उल्लेख आहे आणि यासाठी ४० गोलाकार मेज आणि २०० खुर्च्या घालण्यात येणार असल्याचे म्हटले आहे; मात्र मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी १७ डिसेंबरला होणार्या सोहळ्याविषयी दिलेल्या माहितीत रात्रीच्या जेवणाचा कार्यक्रम नसणार असेे म्हटले आहे. यामुळे निविदेची रक्कम वाढवण्यासाठी त्यामध्ये रात्रीच्या जेवणाचा उल्लेख केला असावा. निविदेत सूत्र क्रमांक २७ मध्ये राज्यातील प्रमुख स्थानांवर ६ मोठे होर्डिंग लावणार, असेे म्हटले आहे; मात्र आजपर्यंत एकही होर्डिंग लावण्यात आलेला नाही. मुख्यमंत्र्यांनी याविषयी लेखी खुलासा करावा. स्वातंत्र्यसैनिकांच्या बलीदानाचा कुणीही गैरलाभ उठवू नये.’’