परात्पर गुरु डॉक्टर ‘स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशन’ या संस्थेचे प्रेरणास्रोत आहेत. त्यांनी जगभरात अध्यात्माचा प्रसार करण्यासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ची स्थापना केली आहे. या विश्वविद्यालयाकडून गोवा, भारत येथील आध्यात्मिक संशोधन केंद्रात ५ दिवसांच्या आध्यात्मिक कार्यशाळा आयोजित करण्यात येतात. या कार्यशाळांचा उद्देश ‘जिज्ञासूंना साधनेच्या प्रायोगिक अंगाविषयी माहिती देऊन त्यांच्या साधनेला गती देणे’, असा आहे. परात्पर गुरु डॉक्टरांनी या कार्यशाळेतील जिज्ञासूंना केलेले मार्गदर्शन पुढे दिले आहे.
(भाग ५)
लेखाचा भाग ४ पहाण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा. – https://sanatanprabhat.org/marathi/430351.html
१. साधना
१ इ. गुरुकृपायोगानुसार साधनेचे महत्त्व !
१ इ ३. अध्यात्माचा प्रसार व्हावा, यासाठी आध्यात्मिक लिखाणाचे भाषांतर करणे, ही गुरुकृपा संपादन करण्याची सर्वोत्तम सत्सेवा !
श्री. शॉन क्लार्क : श्रीमती मामी यांना जपानी भाषेत भाषांतर करण्याची सेवा करायची आहे.
परात्पर गुरु डॉ. आठवले : अध्यात्मप्रसार करण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे. ग्रंथ सहस्रो लोकांपर्यंत पोचतात. एखाद्या शहरात जाऊन आपण फारतर ५००, १०००, १५०० लोकांना साधनेविषयी सांगू शकतो; मात्र ग्रंथ सर्वत्र पोचू शकतात. ‘एस्.एस्.आर्.एफ्.’मुळेच तुम्ही येथे पोचू शकलात. श्री. शॉन (‘एस्.एस्.आर्.एफ्.’ या संकेतस्थळाचे संपादक) किंवा ‘एस्.एस्.आर्.एफ्.’चे सद्गुरु सिरियाक वाले अध्यात्मप्रसारासाठी जगभर फिरले असते, तर ते किती लोकांना संपर्क करू शकले असते ? याउलट प्रतिवर्षी ९० लक्ष लोक एस्.एस्.आर्.एफ्.चे संकेतस्थळ पहातात. त्यामुळे आध्यात्मिक लिखाणाचे भाषांतर करणे, हा अध्यात्मप्रसाराचा सर्वोत्तम मार्ग आहे; मात्र ही सेवा करतांना ‘मी भाषांतर केले’, हे विसरून ‘ईश्वर मला साहाय्य करत आहे’, असा भाव ठेवावा. मनात केवळ ‘लेखांचे भाषांतर करायचे आहे’, एवढाच विचार नसावा, तर त्या वेळी जे शिकलात, ते घरी गेल्यानंतर त्वरित आचरणात आणायला हवे. असे केल्यानंतर तुम्हाला ‘लेखांचे भाषांतर करण्याची सेवा किती महत्त्वाची आहे’, हे लक्षात येईल; कारण ती सेवा करतांना आपल्याला पुष्कळ शिकायला मिळते. एरव्ही आपण ग्रंथ वाचतो; परंतु आपल्याला भाषांतर करायचे असते, तेव्हा आपण त्याचा खर्या अर्थाने अभ्यास करतो. हा अभ्यासच आपल्याला साधनेत पुढे नेतो. तुम्ही अध्यात्मप्रसाराला जाल, तेव्हा जिज्ञासू तुम्हाला अनेक प्रश्न विचारतील. तुम्ही त्या सर्व शंकांचे निरसन करू शकलात की, मग अध्यात्म आणि तुम्ही सांगत असलेली साधना यांवर त्यांचा विश्वास बसेल. अशा प्रकारे तुमची आध्यात्मिक उन्नती होईल आणि तुम्ही ईश्वराच्या अधिक जवळ जाल.
१ इ ४. प्रामाणिकपणे १ – २ वर्षे गुरुकृपायोगानुसार साधना केल्यास साधनेच्या उर्वरित कालावधीत निश्चितपणे प्रगती होईल !
श्री. ट्रंग वेन : साधनेतील तळमळ, साधना आणि सत्सेवा यांचे गांभीर्य वाढवण्यासाठी काय करावे ?
परात्पर गुरु डॉ. आठवले : आपण प्रामाणिकपणे साधना करत राहिल्यावर हळूहळू १ – २ टक्के एवढा आनंद आपल्याला अनुभवता येतो. एकदा आपण त्याचा अनुभव घेतल्यावर आपण पूर्वीच्या अस्थिर स्थितीत जात नाही. भौतिक जीवनात आपल्याला सुख मिळते, आनंद नाही. सुख आणि आनंद यांत भेद आहे. त्यामुळे गुरुकृपायोगानुसार अष्टांग साधनेच्या अंतर्गत स्वभावदोष आणि अहं निर्मूलन, नामजप, सत्सेवा, सत्संग, भावजागृती, त्याग अन् प्रीती यांसाठी प्रयत्न करावे. १ – २ वर्षे हे प्रयत्न सातत्याने केल्यानंतर तुम्ही काही प्रमाणात आनंद अनुभवाल. त्यानंतर तुम्ही कधीच मागे फिरणार नाही, तर पुढेच जाल.
(क्रमशः)
भाग ६. वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/430988.html
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |