राजश्री शाहू उद्यानातील काम निकृष्ट दर्जाचे असल्याने महापालिकेकडून २ अभियंत्यांची चौकशी !

प्रतीकात्मक छायाचित्र

पिंपरी – चिंचवड येथील राजश्री शाहू उद्यानाच्या पुनर्विकासाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे, तसेच कामात अनियमितता असल्याचेही अन्वेषणात स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कार्यकारी अभियंता आणि कनिष्ठ अभियंता यांची खातेनिहाय चौकशी महापालिकेने चालू केली आहे. ठेकेदार तसेच सल्लागार यांना काळ्या यादीत टाकण्याचा आदेश पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी दिला आहे. या उद्यानाच्या पुनर्विकासाचे काम करण्यासाठी महापालिकेने १ कोटी ६६ लाख रुपये खर्च केले. मात्र निविदेतील अटी आणि शर्तींच्या अन्वये उद्यानाचे काम न झाल्याचे तसेच निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते मारुति भापकर यांनी केला होता. त्यांनी केलेल्या तक्रारीनंतर महापालिकेच्या दक्षता आणि गुण नियंत्रण विभागाने पुणे  येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (सीओईपी) भूशास्त्र विभागाच्या पथकाकडून कामाची तपासणी करवून घेतली. त्या वेळी हे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचे आढळून आले आहे. महापालिकेचे आर्थिक नुकसान करणे, सुधारित अंदाजपत्रकाला तांत्रिक मान्यता न देणे, जास्तीच्या कामांना मान्यता न घेणे, कामाचा दर्जा चांगला नसणे आदी आक्षेपही चौकशीतून समोर आले आहेत. त्यामुळे हलगर्जीपणा आणि शिथिल पर्यवेक्षण केल्याचा ठपका ठेवून कार्यकारी अभियंता आणि कनिष्ठ अभियंता यांच्या खातेनिहाय चौकशीचा आदेश आयुक्तसिंह यांनी दिला आहे. सल्लागार तसेच संबंधित काम करणारा ठेकेदार यांना काळ्या सूचीत टाकण्याचीही त्यांनी अनुमती दिली आहे. अभियंता विरोधात खातेनिहाय चौकशी चालू आहे. तर या प्रकरणातील संबंधित सल्लागार आणि ठेकेदारावर कारवाई करण्याचे अद्याप आदेश प्राप्त झाले नाहीत. आदेश प्राप्त होताच कारवाई करण्यात येईल, असे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे शहर अभियंता मकरंद निकम यांनी सांगितले.

संपादकीय भूमिका 

भ्रष्टाचार करण्याची सवय लागलेल्या अधिकार्‍यांकडूनच कामाचे सर्व पैसे वसूल करायला हवेत. अशांना भर चौकात उभे करून कठोर शिक्षा द्यायला हवी !