महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने आयोजित कार्यशाळेतील जिज्ञासूंना परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी केलेले मार्गदर्शन

परात्पर गुरु डॉ. आठवले

परात्पर गुरु डॉक्टर ‘स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशन’ या संस्थेचे प्रेरणास्रोत आहेत. त्यांनी जगभरात अध्यात्माचा प्रसार करण्यासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ची स्थापना केली आहे. या विश्‍वविद्यालयाकडून गोवा, भारत येथील आध्यात्मिक संशोधन केंद्रात ५ दिवसांच्या आध्यात्मिक कार्यशाळा आयोजित करण्यात येतात. या कार्यशाळांचा उद्देश ‘जिज्ञासूंना साधनेच्या प्रायोगिक अंगाविषयी माहिती देऊन त्यांच्या साधनेला गती देणे’, असा आहे. परात्पर गुरु डॉक्टरांनी या कार्यशाळेतील जिज्ञासूंना केलेले मार्गदर्शन पुढे दिले आहे.

(भाग ४)

लेखाचा भाग ३ पहाण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा. – https://sanatanprabhat.org/marathi/430006.html


१. साधना

१ इ. गुरुकृपायोगानुसार साधनेचे महत्त्व !

१ इ १. दैनंदिन जीवनाचे आध्यात्मिकरण करणे म्हणजेच ‘गुरुकृपायोग’ !

सौ. श्‍वेता क्लार्क : महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या कार्यशाळेत येण्यापूर्वी सौ. प्रेमा हेर्नांडेज यांच्या मनात शंका होत्या. त्यांना दुसर्‍या साधनामार्गानुसार साधना करायची होती; परंतु आता त्यांची गुरुकृपायोगानुसार साधनेवर श्रद्धा निर्माण झाली असून आता त्यांना याच मार्गानुसार साधना करायची आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले : अध्यात्मात सर्वांसाठी एकच साधनामार्ग असू शकत नाही. आधुनिक वैद्य प्रत्येक रुग्णाला एकच औषध न देता त्याच्या आवश्यकतेनुसार (उदा. मधुमेह, अस्थिभंग, हृदयविकार, मोतीबिंदू इत्यादी रोगानुसार) त्याच्यावर योग्य औषधोपचार करतात. त्याचप्रमाणे प्रत्येकाच्या प्रकृतीप्रमाणे त्याचा साधनामार्ग ठरलेला असतो. ‘गुरुकृपायोग’ आणि इतर साधनामार्ग यांमध्ये हाच भेद आहे. गुरुकृपायोगामध्ये अध्यात्मातील तात्त्विक भागापेक्षा प्रायोगिक भाग शिकवला जातो. अध्यात्माचा तात्त्विक भाग सांगणारे सहस्रो ग्रंथ आहेत. ते वाचून तात्त्विक भाग समजून घेऊ शकतो. गुरुकृपायोगात तो तात्त्विक भाग कृतीत कसा आणू शकतो, हे शिकवले जाते. त्यानुसार साधना केल्याने जलद आध्यात्मिक प्रगती होते. त्यानंतर ‘ग्रंथामध्ये काय नाही ?’, हे तुमच्या लक्षात येईल. अध्यात्मातील तात्त्विक भाग तुम्ही प्रत्यक्ष अनुभवू शकाल. ग्रंथांना मर्यादा असते; कारण ते शब्दरूपी असतात. ईश्‍वर हा शब्दांच्या पलीकडील आहे.

१ इ २. दुसर्‍या देशात जाऊन अध्यात्माचा प्रसार करून त्यांच्यामध्ये मानवजन्माचे सार्थक करण्याचे बीज रोवा !

श्रीमती मामी सुमगरी : मी आश्रमात प्रथमच आले आहे. जपानहून येणार्‍या माझ्यासारख्या नवख्या साधकाला कृपया मार्गदर्शन करावे.

परात्पर गुरु डॉ. आठवले : तुम्ही दुसर्‍या देशात जाऊन अध्यात्माचा प्रसार करण्याचे बीज बना. नंतर तेथे अध्यात्माचा वृक्ष वाढेल. कोणत्याही देशात, शहरात किंवा परिसरात एकट्याने राहून साधना करणे कठीण असते. इतरांच्या समवेत साधना करणे सोपे असते. आश्रमामध्ये साधारण २५० साधक आहेत. प्रत्येक साधक इतरांच्या साधनेकडे लक्ष देतो आणि त्यांना साहाय्य करतो. आपल्या घरात आपण स्वतःच्या मनाप्रमाणे वागतो किंवा बोलतो; परंतु आश्रमात तसे चालत नाही. तुम्ही मायदेशी परत गेल्यानंतर तेथील लोकांच्या मनामध्ये अध्यात्माविषयी जिज्ञासा निर्माण करा. साधना न करणारी व्यक्ती पशूसमान असते. ती मानवाच्या रूपातील प्राणीच असते. आपल्यामध्ये आणि कुत्रा किंवा घोडा यांमध्ये काय अंतर आहे ? ईश्‍वराने आपल्याला बुद्धी दिलेली आहे. अनेक साधक आणि संत यांनी साधना करून प्रगती केली आहे, असा इतिहास आहे. त्यामुळे जोपर्यंत आपण साधना करत नाही, तोपर्यंत आपण ‘मानव’ म्हणून घेण्यास पात्र नाही. हा दृष्टीकोन ठेवून आपल्याला अध्यात्माचा प्रसार करायचा आहे. ईश्‍वर हा संपूर्ण विश्‍वाचा निर्माता आहे. एखादा साधक केवळ स्वतःसाठी ध्यान-धारणा करत असेल, तर ईश्‍वराला त्याच्याविषयी तेवढी जवळीकता वाटणार नाही. याउलट एखादा साधक समाजात जाऊन इतरांना साधनेचे महत्त्व सांगत असेल, तर तो काही प्रमाणात का होईना; परंतु ईश्‍वराचे कार्य करत असतो. त्याच्या मनात केवळ ईश्‍वराचेच विचार असतात आणि हे सर्वांत महत्त्वाचे आहे. अध्यात्मात आपल्याला ‘अ’ समजल्यावर इतरांनाही ‘अ’ शिकवावा; ‘आ’ समजल्यावर ‘आ’ शिकवावा. अध्यात्म शिकवण्यासाठी आध्यात्मिक गुरु बनण्याची आवश्यकता नाही. जे काही आपण शिकतो, त्याचा प्रसार करा. अध्यात्मात प्रगती केल्यानंतर आपल्याला सर्व ठाऊक असते. त्यामुळे समाजात जाऊन लोकांना अध्यात्माकडे वळवण्याची इच्छा रहात नाही. आपण सतत ईश्‍वराच्या अनुसंधानात, म्हणजेच आनंदावस्थेत असतो. त्या अवस्थेतून बाहेर येऊन अध्यात्मप्रसार करण्याची इच्छा होत नाही. त्यामुळे ‘इतरांना आताच साधना सांगणे’, ही आपली साधनाच आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले (पू. (सौ.) भावना शिंदे यांना उद्देशून) : तुम्ही प्रसारकार्य कसे करता, ते सांगा.

पू. (सौ.) भावना शिंदे : आम्ही कॅनडा येथे अध्यात्माच्या विविध विषयांवर व्याख्यान (प्रवचने) आणि सत्संग घेतो. त्या वेळी सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही आलेल्या जिज्ञासूंना प्रेम देण्याचा प्रयत्न करतो. अध्यात्माविषयीचे ज्ञान पुष्कळ प्रमाणात असून ते ज्ञान कुणीही देऊ शकतो; जिज्ञासूंना प्रकर्षाने जाणवणारी गोष्ट म्हणजे ‘प्रेमभाव.’ ते आम्हाला म्हणतात, ‘‘एस्.एस्.आर्.एफ्. च्या साधकांकडून आम्हाला जे प्रेम मिळते, ते इतर कोणत्याही संस्थेकडून मिळणार्‍या प्रेमाच्या तुलनेपलीकडील आहे.’’ याचे कारण म्हणजे आम्ही त्यांना पडणार्‍या प्रश्‍नांची उत्तरे शोधण्यासाठी त्यांना साहाय्य करतो. आम्ही दाखवलेल्या या प्रेमभावामुळेच ते आम्हाला प्रतिसाद देतात.

परात्पर गुरु डॉ. आठवले : आता ‘साधना म्हणून काय करायचे ?’, ते सर्वांच्या लक्षात आले का ? अध्यात्माचे ज्ञान स्वतःपुरते ठेवू नका. ते इतरांना द्या. देव तुम्हाला साहाय्य करील आणि तुमची साधनेत प्रगती होईल.

(क्रमशः)


भाग ५. वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/430683.html

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक