१०० कोटी रुपयांचा ‘शेअर मार्केट’ घोटाळा : आरोपींची मालमत्ता जप्त करण्याचे गोवा सरकारचे आदेश

(शेअर मार्केट म्हणजे समभाग खरेदी-विक्री बाजार)

पणजी, १३ एप्रिल (वार्ता.) – गोव्यातील फातोर्डा येथील १०० कोटी रुपयांच्या ‘शेअर मार्केट’ (समभाग बाजार) घोटाळ्याच्या प्रकरणी गोवा सरकारने आरोपींची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. आरोपी मायरन रॉड्रीग्स आणि त्याची पत्नी दीपाली परब यांच्या ७ मालमत्ता गोवा आणि महाराष्ट्र राज्यांत आहेत.

त्याचप्रमाणे या आरोपींची बँक खातीही गोठवण्यात आली असून त्यात अंदाजे ४४ लाख ४६ सहस्र रुपये आहेत. या सर्व मालमत्ता आणि बँक खाती जिल्हा प्रशासनाकडे हस्तांतरित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आरोपींपैकी मायरन हा पसार आहे,  तर त्याची पत्नी दीपाली ही सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. दोघांनाही आर्थिक गुन्हे पथकाकडून भारतीय दंड संहितेचे कलम ४०६, ४२० आणि उपकलम ३४ या अन्वये, तसेच ‘गोवा प्रोटेक्शन ऑफ इंटरेस्ट ऑफ डिपॉझिटर्स इन फायनान्शियल अस्टॅब्लिशमेंट्स ॲक्ट (गोवा आर्थिक आस्थापनांमधील गुंतवणूकदारांचे हित जपणे कायदा) १९९९’चे कलम ३ आणि ५ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

या मालमत्ता हरवणे किंवा लपवल्या जाणे आदी फसवणूक टाळण्यासाठी आणि गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत मिळण्यासाठी मालमत्तांच्या जप्तीचे आदेश देण्यात आले आहेत. अतिरिक्त जिल्हाधिकारी, दक्षिण गोवा यांच्याकडे ही मालमत्ता सोपवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या मालमत्तांमध्ये गोवा, मुंबई, ठाणे आणि पुणे येथील ७ निवासी मालमत्ता आहेत. यात गोव्यातील नुवे येथील बंगला, कुठ्ठाळी येथील एक सदनिका आणि मडगाव येथील बंगला यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे मायरन रॉड्रीग्स याची एकूण ५ बँक खात्यांतील रक्कम, तर दीपाली हिच्या ३ बँक खात्यांतील रक्कम जोडली आहे. सुरेश ज्योकिम आल्मेदा यांना या दांपत्याने १ कोटी १९ लाख रुपयांना फसवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. गुन्हे अन्वेषण विभाग मायरन, त्याची आधीची पत्नी सुनीता रॉड्रीग्स, दीपाली आणि इतर ५ जण यांचा सहभाग असलेल्या आणखी एका प्रकरणाचेही अन्वेषण करत आहे. या आरोपींपैकी सुनीता रॉड्रीग्स हिला ७ डिसेंबर २०२४ या दिवशी अटक करण्यात आली होती आणि २० दिवसांनी जामिनावर सोडण्यात आले, तर इतर आरोपींना अद्याप अटक व्हायची आहे.