|

डिचोली – डिचोली प्रथमवर्ग न्यायालयाने थिवी येथील भूमी खरेदी-विक्री घोटाळ्याच्या प्रकरणातील प्रमुख आरोपी सिद्दिकी उपाख्य सुलेमान खान याची तब्बल १० सहस्र १०० चौरस मीटर क्षेत्रफळ असलेल्या भूखंडाच्या संदर्भातील एकूण १३ विक्री खते (सेल डीड्स) अवैध ठरवून ती रहित केली आहेत.
मारिया लिब्रेटा फोन्सेका यांनी थिवी येथील भूमीच्या अवैध व्यवहारासंदर्भात डिचोली प्रथमवर्ग न्यायालयात याचिका प्रविष्ट (दाखल) केली होती. यात त्यांनी त्यांच्या पतीच्या आणि आजीच्या नावावरील भूमी वर्ष २००८ मध्ये खोट्या कागदपत्रांच्या आधारे एरिक मेंडीस आणि मायकेल आल्वारिस यांनी सिद्दिकी उपाख्य सुलेमान खान याला विकल्याचा दावा केला होता. याविषयी वर्ष २००८ मध्ये म्हापसा पोलीस ठाण्यात तक्रारही नोंदवण्यात आली होती.
न्यायाधीश अनुराधा आंद्रादे यांच्यासमोर झालेल्या सुनावणीच्या वेळी ‘पावर ऑफ अॅटर्नी’मध्ये (अधिकार पत्रावर) ज्या ५ जणांच्या स्वाक्षर्या होत्या, त्यांपैकी २ जणांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. लुईस मार्टिनो यांचा मृत्यू वर्ष १९७९ मध्ये आणि ज्योकिम फोन्सेका यांचा मृत्यू वर्ष १९९३ मध्ये झाला होता, तर मारिया व्हिक्टोरिया गोन्साल्विस यांचा मृत्यू वर्ष १९२४ मध्ये झाला होता. मारिया गोन्साल्विस या मार्टिनो यांच्या पत्नी असल्याचा दावाही खोटा असल्याचे निष्पन्न झाले. या वेळी हे व्यवहार त्यांच्यासमोर झालेच नाहीत आणि रजिस्टरमध्येही त्याची नोंद नाही, असे आढळले. त्यांच्या स्वाक्षर्यादेखील बनावट असल्याचे नोटरीने न्यायालयात सांगितले. या आधारे सुलेमान खानकडे या भूखंडाशी निगडित कोणताही कायदेशीर अधिकार किंवा मालकी नाही, हे स्पष्ट होते, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.
संपादकीय भूमिकासुस्त न्यायप्रणाली ! |