‘हाउसी’चे आयोजन केल्यास कडक कारवाई ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

मडगाव – दक्षिण गोवा जिल्हाधिकारी एग्ना क्लिटस् यांनी ‘हाउसी’ या खेळावर दक्षिण गोव्यात बंदी घातली आहे. यावर भाष्य करतांना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीही ‘हाउसी’च्या विरोधात कडक कारवाई केली जाईल’, असे म्हटले आहे. याविषयी अधिक भाष्य करतांना ते म्हणाले, ‘‘पूर्वी काही कार्यक्रमांत किंवा उत्सवांत ‘हाउसी’ हा खेळ खेळला जायचा. तो छोट्या प्रमाणात होता, त्या वेळी तो ठीक होता; पण आता त्यावर लावण्यात येणार्‍या बक्षिसाची रक्कम पुष्कळ वाढली आहे. त्यामुळे कायदा त्या विरोधात कठोर कारवाई करेल. नावेली येथे १२ एप्रिलला एका कार्यक्रमात बोलतांना त्यांनी ही चेतावणी दिली.

गोवा फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष कायतान फर्नांडिस यांनी नुकतीच मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन ‘हाउसी’वरील बंदीविषयी फेरविचार करावा; कारण त्याचा ग्रामीण भागातील फुटबॉल स्पर्धांवर परिणाम होणार’, असे सांगितले होते. गोव्यातील स्थानिक फुटबॉल संघांसाठी विशेषतः ग्रामीण स्पर्धांसाठी हाउसी खेळ हा निधीचा एक महत्त्वाचा स्रोत आहे. हाउसी खेळांवरील बंदीमुळे राज्यातील तळागाळातील फुटबॉल स्पर्धांवर होणार्‍या परिणामाविषयी फर्नांडिस यांनी चिंता व्यक्त केली होती. फर्नांडिस यांची पुढच्या आठवड्यात जिल्हाधिकार्‍यांशी या विषयावर बैठक होऊन या बंदीविषयी चर्चा होणार होती. या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी केलेले हे विधान सूचक आहे.

हाउसी खेळ कसा असतो ?

हाउसी खेळणारे खेळाडू खेळण्यासाठी तिकिटे खरेदी करतात. हाउसी आयोजित करणारा आयोजक उलटसुलट क्रमांक निवडतो आणि ते घोषित करतो. प्रत्येक खेळाडू त्याच्या तिकिटावरील क्रमांक आयोजक जसे क्रमांक पुकारतो, तसे तिकिटांच्या पुस्तकावर चिन्हांकित करतो. जो खेळाडू त्याच्या तिकिटावरील सर्व क्रमांक प्रथम चिन्हांकित करू शकतो, तो जिंकतो.