- आयुर्वेद हे प्राचीन शास्त्र आहे ! अॅलोपॅथीचा उगमही झाला नव्हता, तेव्हा आयुर्वेदाच्याच साहाय्याने क्लिष्ट शस्त्रक्रिया झाल्याचे दाखले प्राचीन ग्रंथांत मिळतात ! असे असतांना आधुनिक वैद्यांनी पुकारलेला हा बंद हे त्यांच्या कोत्या मानसिकतेचे द्योतक !
- वैद्यकीय क्षेत्रात अनेक अपप्रवृत्तींचा शिरकाव झाला आहे ! स्वतःच्या लाभासाठी आधुनिक वैद्य रुग्णांना भरमसाठ तपासण्या करायला लावतात, याचा अनुभव अनेकांनी घेतलेला असतो. असे असतांना आता स्वतःच्या क्षेत्रात निर्माण होणार्या पर्यायांना विरोध करणे, हे एकप्रकारे स्वतःची मक्तेदारी टिकून रहाण्यासाठी केलेली धडपड ठरते ! असे बंद पुकारून आधुनिक वैद्य काय साध्य करू पहात आहेत ?
पणजी, ११ डिसेंबर (वार्ता.) – केंद्राने पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या आयुर्वेदीय वैद्यांना शस्त्रक्रिया करण्यास अनुमती दिल्याच्या निषेधार्थ आयोजित ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ने (आय्.एम्.ए.) पुकारलेल्या ‘भारत बंद’मध्ये ‘आय्.एम्.ए.’च्या गोवा विभागाने सहभाग घेतला.
याविषयी माहिती देतांना ‘आय्.एम्.ए.’च्या गोवा विभागाचे अध्यक्ष डॉ. एस्. सॅम्युएल म्हणाले, ‘‘आय्.एम्.ए.’शी निगडित आधुनिक वैद्यांना अत्यावश्यक आणि कोरोनाबाधित रुग्ण सोडून इतर रुग्ण यांच्याशी निगडित सेवा ११ डिसेंबर या दिवशी सायंकाळी ६ वाजेपर्यंत बंद करण्यास सांगण्यात आले. ‘आय्.एम्.ए.’ने संघटनेच्या मागण्यांविषयी एक निवेदन गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना दिले आहे.’’