‘एच्.एम्.पी.व्ही.’ (ह्युमन मेटापन्यूमो व्हायरस) या विषाणूविषयी माध्यमांमध्ये उलटसुलट चर्चा झाल्या. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे सावट निर्माण झाले. खरेतर ‘एच्.एम्.पी.व्ही.’ या विषाणूमुळे कोणताही धोका नाही. आवश्यकता आहे ती काळजी घेण्याची ! ही काळजी कशी घ्यावी ? आणि या विषाणूविषयीची माहिती येथे दिली आहे.
१. ‘एच्.एम्.पी.व्ही.’ आणि अन्य विषाणूंविषयी बातम्यांमुळे होणारी उलथापालथ
सध्या प्रत्येक वृत्तवाहिनीवर आणि वर्तमानपत्रामध्ये चढाओढीने ‘एच्.एम्.पी.व्ही.’विषयी बातम्या दिल्या जात आहेत. कुणी म्हणते, ‘हा ‘कोविड’ महामारीपेक्षाही गंभीर आजार आहे.’ कुणी म्हणते, ‘त्याच्यामुळे मृत्यूचे तांडव चालू आहे आणि अगदी रांगा लागल्या आहेत.’ बातमी कोणतीही असो, कुणीही दिलेली असो किंवा कितीही गंभीर असो, त्याचे मूळ हे आपण एका ट्वीटमध्ये शोधू शकतो. ते ट्वीट लिहिणार्या व्यक्तीलाही ठाऊक नसेल की, आपल्या ट्वीटमुळे सहस्रो किलोमीटर दूर भारत देशात एवढी उलथापालथ होईल. तसे पहायला गेले, तर निसर्गामध्ये लाखो प्रकारचे विषाणू आहेत. हे सर्वच विषाणू मानवासाठी बाधक नसतात. वर्ष २०२२ पर्यंत या लाखो विषाणूंपैकी केवळ ११ सहस्र २७३ विषाणू शास्त्रज्ञ ओळखू शकले आहेत; मात्र जे विषाणू सापडले आहेत त्यांच्याविषयी अतिशय सखोल असा अभ्यास केला जातो. अगदी त्यांचे ‘जीन्स’ (गुणसूत्रे) कोणते आहेत ?, ते पेशींना कसे बाधित करतात ? वगैरे सर्व माहिती प्रयोगाद्वारे मिळवली जाते. या सर्व ज्ञात विषाणूंमधील साधारणपणे २७० प्रकारचे विषाणू मानवाला बाधित करू शकतात. यांच्याविषयी थोडा अधिक अभ्यास केला जातो. अर्थात् जसजसे नवीन शोध लागत जातील, तशी ही संख्या वाढत जाईल. अर्थातच सामान्य जनतेला ही २७० नावे ठाऊक असणे शक्यच नाही. अगदी सर्व डॉक्टरांनाही हे प्रत्येक नाव ठाऊक असेलच, असे नाही. त्यामुळे ‘एच्.एम्.पी.व्ही.’, म्हणजे ‘ह्युमन मेटापन्यूमो व्हायरस’, असे भले मोठे नाव असणारा विषाणू हा एक नवा विषाणू आहे’, असा गैरसमज होऊ शकतो. ‘कोविड’ महामारीनंतर आपण सर्व जण नव्या विषाणूंना घाबरतो; कारण चीनमध्ये कोरोनाच्या विषाणूने सर्व जगभरामधील ७० लाख लोकांचे मृत्यू घडवून आणले आणि या ‘एच्.एम्.पी.व्ही.’ विषाणूची बातमी चीनच्या कुणा एका व्यक्तीने एका ट्वीटमध्ये दिली होती, ही एवढी एकच गोष्ट सर्व माध्यमांच्या अतीप्रतिसादाला कारणीभूत आहे.
२. ‘एच्.एम्.पी.व्ही.’ विषाणू गेल्या ७५ वर्षांपासून सर्वांमध्ये सर्रास आढळणे
‘एच्.एम्.पी.व्ही.’ नक्की आहे तरी काय ? हा विषाणू वर्ष २००१ मध्ये नेदरलँडमध्ये सापडला, म्हणजे खरे तर ओळखला गेला. तत्पूर्वी लहान मुलांमध्ये जे न्यूमोनियासारखे गंभीर आजार होत होते, त्यातील जवळजवळ ३० टक्के मुलांमध्ये नक्की कोणत्या सूक्ष्म जंतूने आजार होत आहेत, हे ओळखता येत नव्हते, म्हणजेच मानवाला ठाऊक नसलेला एखादा किंवा अनेक विषाणू असू शकतील, असा अंदाज होता. याविषयी प्रयोग करतांना डच शास्त्रज्ञ व्हॅन डेन हुगेन आणि त्यांचे सहकारी यांनी या विषाणूचा शोध लावला. त्यांच्या असे लक्षात आले की, रुग्णालयामध्ये गंभीर आजाराने भरती असणार्या १० टक्के मुलांमध्ये या विषाणूची बाधा दिसून येते. मुलांमध्ये सर्दी, खोकला आणि न्यूमोनिया असा आजार निर्माण करणार्या ‘आर्.एस्.व्ही.’ विषाणूचा हा जवळचा आहे; मात्र त्याच्याएवढा गंभीर आजार निर्माण करत नाही. कोणताही विषाणू सापडला की, पहिला प्रश्न निर्माण होतो की, हा नवा विषाणू आहे कि जुना ? त्यामुळे ‘एच्.एम्.पी.व्ही.’ सापडला की, त्यानंतर सर्वांत पहिल्यांदा जे प्रयोग केले गेले, ते कोणत्या ना कोणत्या कारणाने साठवून ठेवलेल्या लहान मुलांच्या रक्ताच्या नमुन्यावर. त्याने असे लक्षात आले की, हा विषाणू तर जवळपास गेली ५० वर्षे आपल्यामध्ये आजार निर्माण करत होता, म्हणजे कमीत कमी वर्ष १९५० पासून हा विषाणू नक्कीच आपल्याला बाधित करत होता. सध्या वर्ष २०२५ मध्ये हा ७५ वर्षे जुना विषाणू आहे आणि भारतीय माध्यमे मात्र ‘या विषाणूचा पहिला रुग्ण सापडला’, अशा बातम्या जोरजोरात सांगत आहेत. गेल्या ७५ वर्षांत या विषाणूने कुणालाच बाधित केले नसेल, हे शक्य तरी आहे का ? मग जगभरात किती लोकांना या विषाणूची बाधा होऊन गेलेली आहे ? या प्रश्नाचे उत्तर शोधणे अतिशय सोपे असते आणि शास्त्रज्ञांनी पुढचा प्रयोग हाच केला.
३. लहान मुलांपासून प्रौढांपर्यंत ‘एच्.एम्.पी.व्ही.’ आढळणे अन् त्याविरोधात लढण्यासाठी मानवी देहात ‘अँटिबॉडीज’ (प्रतिपिंडे) आढळणे
शास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या देशांतील लोकांमध्ये जन्मलेल्या बाळापासून अगदी वयस्कर व्यक्तीपर्यंत सर्वांच्या रक्ताची चाचणी केली आणि त्यांच्या शरिरात या विषाणूविरुद्ध ‘अँटिबॉडीज’ (प्रतिपिंडे) आहेत का ? हे पडताळले. त्यांना जे सापडले ते आश्चर्यकारक होते. वयाच्या ५ व्या वर्षापर्यंत जवळजवळ ९० टक्के मुलांमध्ये ‘अँटिबॉडीज’ सापडल्या आणि १०० टक्के प्रौढ व्यक्ती ‘एच्.एम्.पी.व्ही.’ने आधीच बाधित झालेल्या होत्या. नुकत्याच जन्मलेल्या बाळाच्या शरिरातही या ‘अँटिबॉडीज’ होत्या; कारण आईपासून त्या बाळाला ही सुरक्षा मिळत होती. काही मासांनंतर जेव्हा या ‘अँटिबॉडीज’ न्यून व्हायच्या, तेव्हा त्या बाळांमध्ये संसर्ग चालू होतांना दिसला. अर्थात् कोणत्याही कारणाने जेव्हा प्रतिकारशक्ती न्यून होते, त्या वेळेला ‘अँटिबॉडीज’ असल्या तरीही बाधा होण्याची शक्यता यामध्ये आहे. चीनमधील चित्रही असेच आहे. श्वसनसंस्थेच्या आजारांमध्ये हा विषाणू किती वेळा कारणीभूत असतो ? जर साधी सर्दी-खोकला असेल, तर सहसा ५ ते १५ टक्के रुग्ण ‘एच्.एम्.पी.व्ही.’ने बाधित असू शकतात. न्यूमोनिया किंवा ‘ब्रॉकायटिस’सारखे (फुफ्फुसाच्या नळ्यांना आलेली सूज) गंभीर आजार झाले असतील, तर साधारण १० टक्के वेळा ‘एच्.एम्.पी.व्ही.’ची बाधा सापडते. ज्यांचा अस्थम्याचा त्रास अचानक वाढतो, त्यांच्यामध्ये १ ते ५ टक्के वेळा ‘एच्.एम्.पी.व्ही.’ची बाधा हे कारण असू शकते; मात्र एकाच वेळी त्याच्यासह इतर विषाणूंची बाधाही झालेली असेल, तर अशा वेळी मात्र आजार अधिक गंभीर होऊ शकतो. अतीदक्षता विभागातील रुग्णांमध्ये ७० टक्के वेळा दुहेरी बाधा आढळून आली आहे. ‘एच्.एम्.पी.व्ही.’ला घाबरण्याची कितपत आवश्यकता आहे ? आपण ‘फ्ल्यू’ला किंवा सर्दीला घाबरतो का ? जर याचे उत्तर ‘नाही’ असेल, तर या विषाणूलाही घाबरायची आवश्यकता नाही. खरेतर कोणत्याही सूक्ष्म जंतूला घाबरायची आवश्यकता नसते; कारण त्यांचे नियंत्रण करण्यासाठी आपल्याकडे अनेक उपाय उपलब्ध असतात. हे उपाय जर सामान्य जनतेने नेहमीसाठीच लक्षात ठेवले, तर भविष्यातही आपण कोणत्याही नव्या किंवा जुन्या सूक्ष्म जंतूला घाबरणार नाही. आपण एखाद्या आजाराला घाबरतो, तेव्हा योग्य निर्णय घेण्याची क्षमता न्यून होते; कारण निर्णय प्रज्ञा (बुद्धी) नाही, तर भीती घेते. या विषाणूविषयी बोलायचे झाले, तर हा एक अतिशय जुना विषाणू आहे, जो सर्वांना वयाच्या ५ व्या वर्षापर्यंतच बाधित करतो; मात्र याची चाचणी केली जात नसल्याने आपल्याला याची पूर्वकल्पना नव्हती. ‘एच्.एम्.पी.व्ही.’पासून सुरक्षित रहाण्याचे उपाय हा आजार लहान मुलांमध्ये सर्वाधिक प्रमाणात दिसून येतो, हे आपण लक्षात ठेवायला हवे.
४. भारतीय माध्यमांनी ‘एच्.एम्.पी.व्ही.’विषयी चुकीची माहिती पसरवून जनतेला घाबरवणे आणि काळजी घेण्याची आवश्यकता !
वर्ष २००१ मध्ये हा विषाणू सापडल्यानंतर गेली २५ वर्षे ‘एच्.एम्.पी.व्ही.’ हा विषाणू विशेष गंभीर आजार निर्माण करत नाही, यासाठी वेगळा कोणताही उपचार नाही, या कारणास्तव याची नियमितपणे चाचणीही केली जात नव्हती; मात्र भारतीय माध्यमांनी या विषाणूला मोठे बनवले आहे. पुढील काही दिवस एखादी नवी बातमी सापडेपर्यंत या आजाराविषयी निरनिराळ्या प्रकारे माहिती सांगितली जाईल; मात्र ही माहिती वाचतांना किंवा ऐकतांना एकच गोष्ट लक्षात ठेवायची की, ‘एच्.एम्.पी.व्ही.’ हा एक जुना विषाणू आहे आणि ज्याविरुद्ध आपल्या सर्वांमध्ये ‘अँटिबॉडीज’ उपलब्ध आहेत. यामध्ये नवे ‘म्युटेशन’ (उत्परिवर्तन) झाल्याची कोणतीही बातमी नाही. भारत आणि चीन येथील भौगोलिक परिस्थिती वेगळी आहे. यामुळे ‘एच्.एम्.पी.व्ही.’ विषाणूमुळे ‘कोविड’ महामारीसारखा ‘साथीचा रोग’ (पँडेमिक) होण्याची कोणतीही शक्यता नाही. मग आता माध्यमांमधील बातमीमुळे घाबरण्याची आवश्यकता नाही. केवळ त्यांच्या अज्ञानावर हसणे पुरेसे आहे; मात्र अशा घटना भविष्यात वारंवार घडणार असल्याने विविध शास्त्रीय माहिती असणे आणि प्रतिबंधात्मक उपायांविषयी माहिती असणे आवश्यक आहे. प्रत्येक बातमी प्रारंभी पडताळून घेणे, हे कौशल्य सर्वांनीच मिळवायला हवे, अन्यथा माध्यमांद्वारे कोणताही विषाणू येईल आणि टिचकी मारून जाईल.
– डॉ. प्रिया देशपांडे, मिरज
(लेखिका एम्.डी. रोगप्रतिबंधकशास्त्र तज्ञ असून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज येथे कार्यरत आहेत.)
(साभार : साप्ताहिक ‘विवेक’, मराठी)
‘एच्.एम्.पी.व्ही.’ वा अन्य विषाणू यांच्याविरोधात घ्यावयाची काळजी अन् उपाय![]()
– डॉ. प्रिया देशपांडे |