‘आमचे नोकरीचे स्वरूपच असे आहे की, याविषयी (आरोग्य राखण्याविषयी) आम्ही काही करू शकत नाही. यासाठी तुम्ही काय साहाय्य करू शकता ? या सगळ्यात आयुर्वेद काय काय साहाय्य करू शकतो ?’, असे प्रश्न पालटता दिनक्रम आणि कामाच्या वाढत्या अपेक्षा यांतून सहजच आम्हा वैद्यांसमोर येत असतात.
१. व्यक्तीच्या कामाचे स्वरूप, आजारपणाची लक्षणे आणि उपचार यांच्या अनुषंगाने
काहींचे नोकरी आणि व्यवसायच ताण देणारे असतात जसे की, पर्यटन व्यवसाय, पत्रकार, पोलीस. शिक्षक, पोलीस, व्याख्याते (पब्लिक स्पीकर्स) या लोकांना सतत उभे राहून काम असते. त्यांच्या बेंबीखालील भागात त्रास अधिक प्रमाणात दिसतात, जसे की, पायावर ‘व्हेरिकोज व्हेन’, पायदुखी, मूळव्याध आणि तत्सम आजार ! काहींचे उष्णता वाढवणारे जसे की, अग्नीशमन निरीक्षक, मुख्य आचारी किंवा ‘केटरिंग’ (खाण्या-पिण्याचे पदार्थ पुरवणे) व्यवसाय ज्यात अंगावर गांध्या, डोळ्यांतील शिरांचे आजार, लालपणा, जळजळ ही लक्षणे दिसतात.
या सगळ्याला अनियमित खाण्याच्या वेळा भर घालत असतात. यामध्ये समजा तुमची प्रकृती त्या त्रासात भर घालणारी असेल, तर हे त्रास अजून पटकन वाढणार. जसे आपण आपल्या घरातील कचरा वेळच्या वेळी टाकून देतो, तसे शरिरात साचत जाणारे एक प्रकारचे दोष न्यून करण्यासाठी प्रतिदिन विशिष्ट मात्रेत तूप पिणे किंवा काही रसायन औषधांचे प्रतिदिन सेवन असे वेगवेगळे उपाय करता येतात, ज्यामुळे अपरिहार्य कारणांमुळे येणार्या शरिरातील हानिकारक पालटांचा वेग न्यून करता येऊ शकतो.
रात्रपाळी असणार्या / रात्री घरून काम करणार्या व्यक्तींमध्ये डोकेदुखी (सध्याच्या भाषेत ‘मायग्रेन’), डोळ्यांचा कोरडेपणा, थकवा ही लक्षणे दिसतात. त्यावर शरिराच्या वरच्या भागावर काम करणार्या विविध स्निग्ध कल्पना (औषध, तेल, तूप, लेप) वापरता येतात. एखाद्याच्या व्यवसायाला किंवा छंदाला साहाय्य करण्यासाठी त्या त्या अवयवावर काम करणार्या वनस्पती देता येतात. काही खेळाडू, जलतरणपटू (स्विमर्स) किंवा सायकल चालवणार्या लोकांना त्यांचा दमसास वाढवायला उपयुक्त आणि त्यांचा ‘इव्हेंट’ (खेळ) झाल्यावर त्यातून पटकन नेहमीच्या दिनक्रमाला परत येण्यासाठी साहाय्य करणारी औषधे अन् काही दिनचर्येमधील पालट आम्ही सांगत असतो. त्याचे छान परिणाम दिसून येतात. वार्षिक पंचकर्मही या सगळ्यामध्ये साहाय्यभूत ठरते.
२. आयुर्वेदाचा उपयोग आणि निरोगी रहाण्यासाठीचा कानमंत्र
या सगळ्या प्रवासात त्या व्यक्तीची स्वतःची आरोग्यपूर्ण रहाण्याची इच्छा असणेही महत्त्वाचे आहे. सकाळी घरातून बाहेर जातांना केलेली पोळी समवेत नेणे सोपे कि तिथे वडापाव खाणे सोपे, हे त्या व्यक्तीच्या मानसिकतेवर अवलंबून असते. रुग्ण सांगेल आणि विचारील त्या प्रत्येक ठिकाणी रोग बरा व्हायला आयुर्वेदाचा चिकित्सा दृष्टीने वापर, एखाद्या अवयवाचा बळ वाढवायचे किंवा आपल्या व्यवसायाला अनुसरून त्याला साहाय्य करणार्या गोष्टींचा वापर, अशा विविध पद्धतीने समावेश करता येतो.
बर्यापैकी नीट दिनचर्या पाळणार्या व्यक्ती आणि प्रतिदिन जागरण, अनियमित वेळा अन् पुष्कळ मानसिक ताणाचे काम यांच्या आरोग्याची तुलना होऊ शकणार नाही. जेव्हा आपण एखादा व्यवसाय करण्याचे ठरवतो, तेव्हा त्याला लागून येणारे दुष्परिणाम हे अध्याहृत असतात. आपण व्यवसाय निवडण्यासाठी आपला पिंड, जन्मजात असलेले आरोग्य बल आणि स्वतःची प्रकृती सांभाळायची क्षमता यांचा विचार करणे मूलभूत आहे; परंतु यामुळे तुम्हाला एखाद्या व्यवसायाने १०० त्रास होणार असतील, तर तो १० ते २० टक्क्यांमध्ये रहाण्याचे काम आयुर्वेद सल्ला आणि औषधी नक्कीच करू शकतात.
पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या वयाला आणि त्यांच्याकडे असलेले उत्तरदायित्व सक्षमपणे सांभाळण्यासाठी ‘प्रतिदिन योगा करणे, खाण्यावर नियंत्रण, ध्यान या गोष्टी करत असतात. ताणाच्या कामातून त्यांना स्वतःचे आरोग्य सांभाळायला ऊर्जा मिळते’, हा चक्राचा पहिला भाग आणि ते ‘हे सातत्याने करत आहेत म्हणून आरोग्य चांगले रहाते’, हा चक्राचा दुसरा भाग. ते करणे न करणे ही प्रत्येकाची आवड !
– वैद्या (सौ.) स्वराली शेंड्ये, यशप्रभा आयुर्वेद, पुणे.