मुंबई – कर्जत-सी.एस्.एम्.टी. लोकलमधून प्रवास करतांना महिलेशी गैरवर्तणूक करणार्यास न्यायालयाने दोन वर्षांच्या कठोर कारागृहाची शिक्षा सुनावली आहे.
वर्ष २०१२ मध्ये आरोपी कैलास पहाडी याने एका महिलेचा विनयभंग केला होता. या प्रकरणी तक्रारीनंतर पोलिसांनी त्याला अटक केली होती. त्यानंतर ८ वर्षे हा खटला चालला होता. यामध्ये न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेतला. यामध्ये पीडित महिलेने स्वतः आणि तिच्या सहकारी प्रवाशांनी पहाडीला गैरवर्तन करतांना पाहिल्याचे सिद्ध झाल्याने तो यामध्ये दोषी ठरला.
मुंबईच्या दंडाधिकारी न्यायालयाने त्याला दोन वर्षांची कठोर कारागृहाची शिक्षा आणि १० सहस्र रुपयांचा दंड ठोठावला आहे. तसेच १० सहस्र रुपयांपैकी ८ सहस्र रुपये पीडित महिलेला हानीभरपाई म्हणून देण्याचे आदेश दिले आहेत.