मुंबई – मुंबई महानगर प्रदेशातील मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड येथील ३२ सहस्र हेक्टर कांदळवनाला ‘राखीव वन’ म्हणून घोषित करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी याविषयीच्या हरकती आणि दावे यांची चौकशी तातडीने पूर्ण करून १५ जानेवारीपर्यंत अधिसूचना काढण्याचा आदेश दिला आहे.
याविषयी अधिक माहिती देतांना वन विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर म्हणाले, ‘‘३२ सहस्र हेक्टर कांदळवनातील १५ सहस्र हेक्टर भूमीवरील कांदळवन शासकीय जागेत आहे. महानगर प्रदेशातील कांदळवन मोठ्या प्रमाणात नष्ट करून तेथे घरे बांधण्याची कामे चालू आहेत. त्यासाठी काही ठिकाणी खाडीतही भराव टाकला जात आहे. त्यामुळे कांदळवनाचे संरक्षण करण्यासाठी ही जागा ‘राखीव वन’ म्हणून घोषित करण्यात येणार आहे.’’ यापूर्वी ‘कुलाबा-वांद्रे-सिप्झ मेट्रो-३’ची आरे वसाहतीमधील कारशेड पर्यावरणाच्या सूत्रावरून कांजूरमार्ग येथे स्थलांतरित करतांना आरे येथील ८०० एकर जागा ‘राखीव वन’ म्हणून शासनाने यापूर्वीच घोषित केली आहे.