ब्रिटनच्या ३६ खासदारांचे भारतातील शेतकरी आंदोलनाला समर्थन

यू.के.च्या सचिवांना भारतावर दबाव निर्माण करण्यासाठी पत्र

भारताच्या अंतर्गत प्रकरणांत ढवळाढवळ करण्याचा अधिकार ब्रिटनच्या खासदारांना कुणी दिली ? भारतावर आता त्यांचे राज्य नाही, हे त्यांना ठाऊक नाही का ?

लेबर पार्टीचे खासदार तनमनजीत सिंह धेसी

लंडन (ब्रिटन) – गेल्या १० दिवसांपासून देहलीच्या सीमेवर कृषी कायद्याच्या विरोधात चालू असलेल्या पंजाब आणि हरियाणा राज्यांतील शेतकर्‍यांच्या आंदोलनाला ब्रिटनमधील ३६ खासदारांनी समर्थन दिले आहे. तेेथील लेबर पार्टीचे खासदार तनमनजीत सिंह धेसी यांच्या नेतृत्वाखाली ३६ खासदारांनी युनायटेड किंगडमचे सचिव डोमिनिक राब यांना याविषयी पत्र लिहिले आहे. या पत्राद्वारे त्यांनी कृषी कायद्यांविरोधात भारतावर दबाव टाकण्याची मागणी केली आहे. तसेच शेतकर्‍यांच्या समर्थनार्थ परराष्ट्र मंत्रालय आणि यू.के.च्या कार्यालयाकडून भारताच्या सरकारशी चर्चा करावी, अशी मागणी केली आहे.

तनमनजीत सिंह म्हणाले, हा विषय ब्रिटनमधील शीख नागरिक आणि पंजाब राज्य यांच्याशी निगडित असलेल्या लोकांसाठी विशेष चिंतेचा विषय आहे. हा कायदा भारतातील इतर राज्यांसाठीही अडचणीचा ठरत आहे. अनेक ब्रिटीश शीख आणि पंजाबी लोकांनी त्यांच्या खासदारांसमवेत या प्रकरणी आवाज उठवला आहे. कारण पंजाबमधील त्यांच्या कुटुंबियांना याची झळ बसणार आहे.

ब्रिटीश खासदारांना अजूनही भारतावर इंग्लंडच्या राणीचे राज्य असल्याचे वाटते ! – भाजप

ब्रिटीश खासदारांच्या या पत्रावर भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी टीका केली आहे. त्यांनी ट्वीट करून म्हटले की, शेतकर्‍यांच्या आंदोलनाविषयी चिंता व्यक्त करणारे पत्र लिहिणार्‍या ३६ ब्रिटीश खासदारांना अजूनही भारतावर इंग्लंडच्या एलिझाबेथ राणीचे राज्य असल्याचे वाटत असावे.

आमचे प्रश्‍न सोडवण्यास आम्ही समर्थ आहोत. जंटलमन, माईंड युअर ओन बिझनेस (तुम्ही तुमचे काम पहा), अशी प्रतिक्रिया भातखळकर यांनी दिली आहे.