भारत संपूर्ण जगाचे नेतृत्व करण्यास सक्षम ! – सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

नवी देहली – ‘विविधतेला जोडणारा घटक केवळ भारताजवळच असून आम्हाला तो जगाला द्यायचा आहे. त्यामुळे संपूर्ण जगाचे नेतृत्व करण्यासाठी भारत पूर्णपणे सक्षम आहे’, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी दूरचित्रसंवाद यंत्रणेद्वारे झालेल्या एका कार्यक्रमात केले. ‘जागतिक दृष्टीकोनातून भारताची भूमिका’ या विषयावर ते बोलत होते. ‘विश्‍वकल्याणासाठी भारताचे विचार अधिक प्रभावी असून जगाच्या सर्व प्रश्‍नांची उत्तरे आमच्या परंपरेत आहेत’, असेही ते म्हणाले.

सरसंघचालक भागवत पुढे म्हणाले की,

१. आम्हाला लढून जगावर विजय मिळवायचा नाही. यासाठी आम्हाला रक्त सांडायचे नाही. बळजबरी आणि लोभ यांच्या माध्यमातून लोकांना त्यांच्या मुळापासून वेगळे करायचे नाही. आम्हाला आमच्या देशाच्या उदाहरणातून जगाला गोष्टी समजावून द्यायच्या आहेत. आम्हाला सध्याचे ज्ञान आणि विज्ञाना यांचाही स्वीकार करायचा आहे. कुठलाही नेता हे करणार नाही, तर हे समाजालाच करावे लागेल.

२. अमेरिका, रशिया आणि चीन यांच्या शीतयुद्धाच्या परिस्थितीत सर्व जग भारताकडे आशेने पहात आहे. इतर देश जगाला बाजार मानतात; पण भारत संपूर्ण विश्‍वाला एक कुटुंब मानतो. ‘सर्वांना सुख मिळो’, असा भारताचा विचार आहे. यात कुणालाही लहान मानले जाणार नाही, हाच विचार भारताला द्यायचा आहे. यात विकासही असेल, पर्यावरणाचे संरक्षण असेल, व्यक्ती अधिकारसंपन्न असेल आणि समाजही खर्‍या अर्थाने प्रबळ असेल.