गोवा राज्यातील सौ. उषा तुळशीदास नाईक (वय ६४ वर्षे) यांच्या निधनापूर्वी आणि निधनानंतर त्यांची मुलगी सौ. स्वाती रामा गावकर यांना जाणवलेली सूत्रे
१. नामजपादी उपाय केल्यावर आईच्या दुखण्याचे निदान होणे
१ अ. आधुनिक वैद्यांच्या औषधांनी आईच्या प्रकृतीत सुधारणा न होणे : ‘१५.५.२०२० या दिवशी माझी आई सौ. उषा तुळशीदास नाईक (वय ६४ वर्षे) हिचे निधन झाले. ‘आई जुने गोवा येथे रहायची. आई मार्च २०२० पासून अस्वस्थ होती. एकदा तिला पुष्कळ उलटी झाली आणि तेव्हापासून तिचा आवाज गेला. त्यामुळे ‘ती काय बोलते ?’, ते आम्हाला कळत नसे. ती फार अशक्तही दिसत होती. तिला पोट आणि पाठ येथे वेदना व्हायच्या. आधुनिक वैद्यांना दाखवूनही तिच्या प्रकृतीत कसलीच सुधारणा होत नव्हती.
१ आ. नामजपादी उपाय केल्यावर आईच्या फुप्फुसामध्ये पाणी झाल्याचे निदान होणे : एकदा मी माझी नणंद सौ. राधा घनश्याम गावडे हिला भ्रमणभाष करून हे सर्व सांगितले. तेव्हा तिने मला ‘‘आईचे छायाचित्र ‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ या ग्रंथात ठेव’’, असे सांगितले. मी तसे केले आणि एका कागदावर आईला होणारे त्रास लिहून त्याला नामजपाचे मंडल घालून तो कागद ग्रंथात ठेवला. यानंतर तिसर्याच दिवशी आधुनिक वैद्यांनी आईचा क्ष-किरण तपासणी (‘एक्सरे’) आणि ‘सोनोग्राफी’ केली. त्यांनी ‘आईच्या फुप्फुसामध्ये पाणी झाले आहे’, असे आम्हाला सांगितले. आम्ही तिला रुग्णालयात भरती केल्यावर तिच्या फुप्फुसात झालेले (जवळजवळ ५०० मि.लि.) पाणी काढले. रुग्णालयात ४ दिवस राहून उपचार घेतल्यावर आईला बरे वाटू लागले.
२. आई रुग्णाईत झाल्यावर जाणवलेली सूत्रे
२ अ. आधुनिक वैद्यांनी ‘आईला कर्करोग झाला असून तो शेवटच्या टप्प्यात आहे’, असे सांगणे : काही दिवसांनी आईला पुन्हा त्रास होऊ लागला. आधुनिक वैद्यांनी पुन्हा तिला रुग्णालयात भरती करून घेऊन तिच्या फुप्फुसातले पाणी काढले. त्यानंतर काही दिवसांनी हळूहळू आईला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. तेव्हा आधुनिक वैद्यांनी आम्हाला सांगितले, ‘‘आईला कर्करोग झाला आहे आणि तो शेवटच्या टप्प्यात असल्यामुळे तिचे कुठल्याही क्षणी निधन होऊ शकते.’’
२ आ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांना ‘आईला शांतपणे मृत्यू येऊ दे’, अशी प्रार्थना करणे : मी परात्पर गुरु डॉक्टरांना कळकळीने प्रार्थना केली, ‘आईवर तुमची कृपा होऊ दे. तिचे जे काही प्रारब्धाचे भोग आहेत, ते लवकरात लवकर संपू दे आणि कसलाही त्रास न होता तिला शांतपणे डोळे मिटू दे.’
२ इ. अनुभूती : आई रुग्णालयात असतांना एका रात्री मला आवाज ऐकू आला, ‘तुला ही मातृऋण फेडायची संधी आहे. हे तुझ्या साधनेला पूरक आहे.’
३. आईला अनिष्ट शक्तींचा झालेला त्रास आणि नामजपादी उपायांचा झालेला लाभ !
३ अ. ‘नामजपाचा त्रास होतो’, असे सांगून आईने नामजप बंद करायला सांगणे आणि नामजप बंद केल्यावर ‘बंद का केलास ? नामजप लाव, त्याने मला बरे वाटते’, असे म्हणणे : आई रात्रभर झोपेत बडबडायची; म्हणून मी रात्रभर दत्ताचा नामजप लावून ठेवायचे. एकदा ती मला म्हणाली, ‘‘नामजप बंद कर. मला त्रास होतो.’’ मी लगेच भ्रमणभाषचा आवाज न्यून केला आणि तो बाजूला ठेवला. थोड्या वेळाने आई मला म्हणाली, ‘‘नामजप लाव. बंद का केलास ? मला नामजप ऐकायला बरे वाटते.’’
३ आ. ‘आईला आपण कुठे आहोत ?’, ते लक्षात न येणे : थोड्या वेळाने ती उठून बसली आणि मला म्हणाली, ‘‘आपण कुठे आहोत ? रुग्णालयात आहोत का ?’’ मी तिला ‘‘हो’’, असे म्हटले. तेव्हा ती मला म्हणाली, ‘‘मला वाटले की, मी तुमच्या घरी डिचोलीला आहे.’’
३ इ. आईला काही व्यक्तींच्या रूपात वाईट शक्ती दिसणे : आईच्या पलंगाजवळच मोठी आगाशी होती. त्यामुळे तिला बाहेरचे सगळे दिसत होते. एके रात्री आई बडबडू लागली, ‘‘दार बंद कर. काही व्यक्ती आल्या आहेत. बघ, त्या आपल्याकडे एवढे मोठे डोळे करून बघत आहेत. त्या प्रतिदिन समोरच्या फणसाच्या झाडाखाली बसून माझ्याकडे बघतात.’’ तेव्हा मध्यरात्र झाली होती. त्यामुळे तिचे ते बोलणे ऐकून मी फार घाबरले.
३ ई. आईला अत्तर लावताच वाईट शक्ती पळून जाणे : मला भीती वाटू लागली. मी परात्पर गुरु डॉक्टरांना प्रार्थना करून आईला अत्तर लावले. आई झोपेतच होती, तरी तिने मला विचारले, ‘‘माझ्या हाताला काय लावलेस ?’’ मी म्हटले, ‘‘अत्तर लावले.’’ तेव्हा ती म्हणाली, ‘‘अत्तर लावताच त्या व्यक्ती पळून गेल्या. बघ, बघ, त्या कसे पळत आहेत !’’ असे बोलून ती हसू लागली. तिच्या बोलण्यावरून ‘ईश्वराच्या कृपेने तेथील वाईट शक्ती पळून गेली’, असे मला जाणवले.
४. आईच्या मृत्यूच्या वेळी जाणवलेली सूत्रे
अ. १५.५.२०२० या दिवशी सकाळी ८.३० वाजता माझा भाऊ माझ्या बहिणीला घेऊन रुग्णालयात आला. माझ्या बहिणीने घरी आमची कुलदेवी श्री विजयादुर्गा हिला ‘आईचे रक्षण कर’, अशी प्रार्थना केली आणि रुग्णालयात येतांना ती श्री विजयादुर्गादेवीचे चित्र घेऊन आली. तिने ते चित्र आईच्या उशाशी ठेवले.
आ. तेव्हा माझ्या मनात आले, ‘इतके दिवस आई समवेत तिचे बाबा (परात्पर गुरु डॉक्टर) होते. आता तिची आईही (श्री विजयादुर्गादेवीही) आली आहे.’ मला पुष्कळ बरे वाटले आणि माझी काळजी मिटली. यानंतर ९ वाजता आईला कसलाही त्रास न होता तिचे निधन झाले. मला फार वाईट वाटले; पण ‘देवाने तिला त्रासापासून मुक्ती दिली’, असे वाटले.
५. आईच्या निधनानंतर जाणवलेली सूत्रे
अ. आईचा मृत्यू झाला, तेव्हा तिचा तोंडवळा काळा पडला होता आणि बोटे निळी-जांभळी झाली होती; पण आईचे पार्थिव घरी आणले, तेव्हा तिचा तोंडवळा तेजस्वी आणि पुष्कळ आनंदी दिसत होता. ती सुवासिनी गेली होती.
आ. मला ‘माझे वडील हे दु:ख कसे पेलणार ?’, अशी वडिलांविषयी पुष्कळ काळजी वाटत होती; पण परात्पर गुरु डॉक्टरांनी त्यांचीही काळजी घेतली. माझे बाबा शांत होते.
इ. रात्री झोपतांना मी परात्पर गुरु डॉक्टरांना प्रार्थना केली, ‘माझी आई चांगल्या गतीला गेली कि नाही ?’ हे मला स्वप्नात कळू दे.’ त्या रात्री मला स्वप्न पडले. मला आईच्या हातावर पुष्कळ चकाकणारे दैवी कण दिसले आणि त्या दैवी कणांकडे आई स्मितवदनाने पहात होती. ती आनंदी दिसत होती. त्यामुळे मला समाधान वाटले.
ई. दुसर्या दिवशी संध्याकाळी माझ्या नणंदेचे यजमान श्री. घनश्याम गावडे यांनी मला भ्रमणभाष करून सांगितले, ‘‘तुमच्या आईच्या तोंडवळ्यावर पुष्कळ तेज जाणवत होते. घरात थोडाही दाब जाणवत नव्हता. तुमचे बाबाही स्थिर होते आणि तुम्ही शांत होता. तुमचा नामजप चालू होता.’’ हे ऐकून माझ्या मनाला शांत वाटले आणि परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली.
६. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी स्वप्नात येऊन आश्वस्त करणे
आईच्या निधनाच्या दुसर्या रात्री माझ्या स्वप्नात परात्पर गुरु डॉक्टर आले आणि मला म्हणाले, ‘‘काळजी करू नकोस. मी आहे ना तुमच्या पाठीशी !’’
या सगळ्या प्रसंगातून देवाने मला पुष्कळ काही शिकवले आणि मी साक्षीभावाने आईचा मृत्यू बघू शकले.’
– सौ. स्वाती रामा गावकर (कै. उषा नाईक यांची मुलगी आणि सौ. राधा गावडे यांची वहिनी), मये, डिचोली, गोवा. (२३.१०.२०२०)
• वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत. • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात. • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |