छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श ठेवून हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात सहभागी व्हा ! – सद्गुरु सत्यवान कदम, धर्मप्रचारक, सनातन संस्था

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील युवा धर्मप्रेमींसाठी ‘ऑनलाईन’ शौर्यजागृती व्याख्यान

सद्गुरु सत्यवान कदम

रत्नागिरी, २४ नोव्हेंबर (वार्ता.) – आताच्या चित्रपट सृष्टीतील अभिनेत्यांचे आदर्श समोर ठेवण्यापेक्षा हिंदु राष्ट्र स्थापनेचे महान कार्य करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज, बाजीराव पेशवे यांसारख्या राष्ट्रपुरुषांचा आदर्श ठेवून त्यांचे गुण आत्मसात करणे आवश्यक आहे. त्याचसमवेत ‘‘सामर्थ्य आहे चळवळेचें । जो जो करील तयाचें । परंतु येथें भगवंताचें । अधिष्ठान पाहिजे ॥’’ या उक्तीप्रमाणे साधना करून आध्यात्मिक बळ प्राप्त करणे, ही काळाची आवश्यकता आहे. त्यासाठी गुरुकृपायोगानुसार साधना आणि स्वभावदोष-अहंनिर्मूलन प्रक्रिया प्रतिदिन राबवून ईश्‍वराची कृपा संपादन करूया, असे प्रतिपादन सनातनचे धर्मप्रचारक सद्गुरु सत्यवान कदम यांनी केले. २३ नोव्हेंबर २०२० या दिवशी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील युवा धर्मप्रेमींसाठी आयोजित केलेल्या ‘ऑनलाईन’ शौर्यजागृती व्याख्यानात बोलत होते.

प्रत्येकाने सामाजिक माध्यमांचा प्रभावी वापर करून धर्म आणि राष्ट्र रक्षणार्थ सिद्ध व्हावे ! – मनोज खाडये, पश्‍चिम महाराष्ट्र आणि कोकण विभाग समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

१. सध्या जग तिसर्‍या महायुद्धाच्या उंबरठ्यावर असतांना राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी ‘‘सङ्घे शक्तिः कलौ युगे’’ या उक्तीप्रमाणे हिंदूंचे राष्ट्रव्यापी संघटन करणे, ही काळाची आवश्यकता आहे.

२. तिसर्‍या महायुद्धाची भयानकता एवढी असेल की, पहिली २ महायुद्धे खेळण्यातील लुटुपुटूच्या युद्धासारखी वाटतील.

३. आज आपला देश हा सर्वाधिक म्हणजे ६३ कोटी युवकांची संख्या असणारा एकमेव देश आहे. त्यामुळे राष्ट्र आणि धर्म यांचे रक्षण करणे हे युवकांचे दायित्व आहे; पण आज युवक पाश्‍चात्त्यांचे अंधानुकरण करण्यात व्यस्त आहेत.

४. युवकांमधील देव, देश आणि धर्म यांच्याविषयीचे प्रेम जागृत करून त्यांना हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात सहभागी करून घेण्यासाठी प्रयत्न करणे, हे आपले कर्तव्य आहे. यासाठी प्रत्येकाने सामाजिक माध्यमांचा प्रभावी वापर करून आपल्या संपर्कातील युवकांना हिंदु जनजागृती समितीच्या कार्याशी जोडून घेऊन धर्म आणि राष्ट्र रक्षणार्थ सिद्ध करावे, असे आवाहन युवा धर्मप्रेमींना केले.

या आवाहनाला ‘‘जय श्रीराम’’असे (chatbox) संदेश करत युवकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शवला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. नयना दळवी आणि कु. पूजा धुरी यांनी केले. या व्याख्यानाला हिंदु जनजागृती समितीचे विनोद गादीकर उपस्थित होते.

अभिप्राय

१. कु. श्रुती शहाकार : ‘लव्ह जिहाद’ची ज्यांना माहिती नाही, त्यांना माहिती देऊन त्यांच्यामध्ये जागृती करण्याचा प्रयत्न करीन.

२. प्राची बिले : या वर्गाच्या माध्यमातून शारीरिक आणि मानसिक बळ वाढले आहे.

३. श्री. सुरज चव्हाण : या धर्मकार्यामध्ये अन्य युवकांना जोडून घेण्याचा प्रयत्न करणार.