पाकिस्तानच्या स्वातमध्ये उत्खननात सापडले १ सहस्र ३०० वर्षे जुने मंदिर !

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकमधील स्वात जिल्ह्यातील बारिकोट घुंडई भागात चालू असलेल्या उत्खननात १ सहस्र ३०० वर्षे जुने मंदिर आढळून आले आहे. येथील डोंगराळ भागात पुरातत्व विभागाच्या तज्ञांनी हे मंदिर शोधले आहे. त्याच्या जवळच एक जलकुंडही आढळले आहे. मंदिरात प्रवेश करण्यासाठी भाविक या ठिकाणी स्नान करत असावेत. हे मंदिर श्रीविष्णूचे असल्याचे सांगण्यात आले.

 (सौजन्य : Zee 24 Taas)

१. पुरातत्व अधिकारी खलिक यांनी सांगितले की, या भागात पहिल्यांदाच हिंदु शाही काळातील अवशेष सापडले आहेत.

२. इटलीच्या पुरातत्व विभागाचे प्रमुख डॉ. लुका यांनी सांगितले की, स्वात जिल्ह्यात गंधार संस्कृती काळातील हे पहिले मंदिर आहे. स्वात जिल्ह्यातील काही ठिकाणी बौद्ध धर्माशी निगडीत विहार आणि इतर अवशेषही आढळून आले आहेत.

३. हिंदु शाही अथवा काबूल शाही (वर्ष ८५० ते १०२६) काळातील राजघराणे आहे. या हिंदु राजवंशाने काबूल खोरे (पूर्व अफगाणिस्तान), गंधार (सध्याचा पाकिस्तान) आणि सध्याच्या भारताच्या उत्तर-पश्‍चिम भागात राज्य केले होते. पुरातत्व विभागाने केलेल्या उत्खननात मंदिराजवळ छावणी आणि टेहळणी करण्यासाठी उंच मनोरे आढळून आले आहेत.