बेळगाव येथे मराठी फलकाला फासले काळे !

पुन्हा कन्नड संघटनेची आगळीक

बेळगाव – मराठा विकास प्राधिकरण स्थापनेविषयी मुख्यमंत्री बी.एस्. येडीयुरप्पा यांचे अभिनंदन करण्यासाठी लावण्यात आलेल्या मराठी भाषेतील फलकाला २० नोव्हेंबर या दिवशी कन्नड भाषिकांनी काळे फासले. त्या फलकावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री येडीयुरप्पा, बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांच्यासह काही मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांचे छायाचित्र होते.

(सौजन्य : KNN City News Marathi)

या घटनेमुळे येथील अनगोळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेनंतर तो फलक तातडीने हटवण्यात आला आहे. गळ्यात लाल आणि पिवळ्या रंगाचा स्कार्फ घातलेल्या २ तरुणांनी हे कृत्य केले आहे. त्याचे चलचित्र सिद्ध करून ते चित्रीकरण सामाजिक प्रसारमाध्यमांवर प्रसारित करण्यात आले आहे. यामध्ये आमदार अभय पाटील यांच्या छायाचित्राला काळे फासण्याची सूचना चित्रण करणारा तरुण देत आहे, असे दिसते.