कोल्हापूर – राज्यशासनाने दिलेल्या आदेशानुसार मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्याची प्रक्रिया चालू आहे. सत्ताधारी राजकीय पक्ष हस्तपेक्ष करून गावाची सत्ता आपल्या कह्यात रहाण्याच्या हेतूने प्रशासक नियुक्तीचे निर्देश देत आहेत, हे लोकशाहीला मारक आहे. मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीच्या तत्कालीन ग्रामपंचायत सरपंच आणि सदस्य यांची प्रशासक मंडळ म्हणून नियुक्ती करावी, असे मत भाजपचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी व्यक्त केले आहे.
ते पुढे म्हणाले की, नवीन निवडलेल्या व्यक्तीस कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कार्य करतांना मर्यादा येणार आहेत. सध्या मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी कोरोनाची परिस्थिती यशस्वीपणे सांभाळली आहे. हे सदस्य आणि सरचंप हे गावाने निवडून दिलेले असल्यामुळे ते पात्र आणि योग्य आहेत. राज्यामध्ये कोरोनाची परिस्थिती सामूहिक संसर्गाच्या टप्प्यामध्ये आहे. अशा वेळी नवीन प्रशासकापेक्षा विद्यमान सरपंच आणि सदस्य ही परिस्थिती व्यवस्थित हाताळू शकतील.