हुपरी (कोल्हापूर) शहरातील आरोग्य केंद्रात सुविधा उपलब्ध करून देण्याची नगराध्यक्षांची मागणी

कोल्हापूर – जिल्ह्यातील हुपरी शहरात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या पार्श्‍वभूमीवर येथील आरोग्य केंद्रात रॅपिड टेस्टिंग किटची सुविधा आणि स्वॅब कलेक्शन केंद्र तात्काळ उपलब्ध करून देण्याची मागणी नगराध्यक्षा सौ. जयश्री गाट यांनी केली आहे. पालकमंत्री सतेज पाटील, खासदार धैर्यशील माने आणि आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यांच्याकडे केलेल्या या मागण्यांना त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे सौ. गाट यांनी सांगितले.

गेल्या ८ दिवसांपासून शहरात कोरोनाचा संसर्ग वाढला असून पालिकेकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. प्रतिबंधित क्षेत्रात फिरून आरोग्य पडताळणी करणार्‍या आशा कर्मचारी आणि आरोग्यसेवक यांना योग्य त्या सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी नगराध्यक्षांनी केली आहे. या वेळी ऑक्सिमीटर पडताळणी सुविधा आणि थर्मोस्कॅनर यंत्रणा तातडीने आरोग्य केंद्रात उपलब्ध करून देत असल्याची माहिती खासदार धैर्यशील माने यांनी दिली.