आपल्या वास्तू आणि जागा यांची विक्री करण्याची प्रक्रिया तत्परतेने पूर्ण करून संभाव्य आर्थिक हानी टाळा !

स्थावर संपत्ती विकण्यास इच्छुक असलेल्या साधकांसाठी महत्त्वाची सूचना

काही साधक आपल्या वैयक्तिक वास्तू (सदनिका, बंगला, ‘फार्म हाऊस’, दुकान, गोडाऊन), मोकळी जागा (प्लॉट), शेतभूमी आदी स्थावर संपत्तीची (मालमत्तेची) विक्री करण्यास इच्छुक आहेत.

१. ‘कोरोना’मुळे नागरिकांच्या क्रयशक्तीवर परिणाम झाल्याने आगामी काळात मालमत्तेच्या विक्रीमध्ये अडचणी येण्याची शक्यता असणे

भारतात कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर लागू केलेल्या दळणवळण बंदीमुळे व्यवसाय, नोकरी आणि एकूणच नागरिकांच्या क्रयशक्तीवर (खरेदी करण्याच्या क्षमतेवर (‘पर्चेसिंग पॉवर’वर)) मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे आगामी काळात आर्थिक मंदी निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे मालमत्तेच्या किमती दिवसेंदिवस न्यून होऊ शकतात. अशा वेळी साधकांना त्यांच्या मालमत्तेची विक्री करण्यात अडचणी येेऊ शकतात आणि पर्यायाने आर्थिक हानी सोसावी लागू शकते. हे टाळण्यासाठी साधकांनी स्थावर संपत्तीच्या विक्रीच्या संदर्भात तत्परतेने निर्णय घ्यावा.

२. स्थावर संपत्तीची विक्री करतांना लक्षात घ्यावयाची सूत्रे

अ. मालमत्तेची विक्री करण्यासाठी शक्य असल्यास स्थानिक ‘ब्रोकर’चे (‘प्रॉपर्टी डीलर’चे) साहाय्य घ्यावे. ‘ब्रोकर’ विश्‍वासू आहे ना ? तो फसवणारा नाही ना ?’, याची स्थानिक लोकांकडे चौकशी करावी. वास्तू किंवा भूमी यांना अपेक्षित किंमत मिळण्याकरता त्या त्या भागातील मालमत्तेची प्रचलित किंमत अभ्यासावी आणि त्यानंतर ‘आपल्याला किती किंमत येणे अपेक्षित आहे ?’, हे ठरवावे. अपेक्षित किंमत येत असल्यास विक्रीची प्रक्रिया त्वरित पूर्ण करावी.

आ. अपेक्षित किंमत येत नसल्यास ‘किंमत किती टक्के अल्प आहे ?’, याची सद्य:स्थितीतील कारणे अभ्यासावीत. अपेक्षित किंमत मिळण्यासाठी अधिक काळ थांबून न रहाता त्यातल्या त्यात अधिक मिळालेल्या किमतीत विक्री करावी. संभाव्य आपत्काळाची तीव्रता आणि आपली निकड लक्षात घेऊन परिस्थितीप्रमाणे तडजोड करण्याची सिद्धता ठेवावी.

आपल्याकडे असलेले अवजड साहित्य, यंत्रसामुग्री आदी विकण्यास इच्छुक असल्यास त्यांच्या विक्रीची प्रक्रियाही लवकर पूर्ण करावी. ‘कोरोना’च्या प्रादुर्भावामुळे सुरक्षेच्या दृष्टीने दिलेल्या सूचनांचे पालन करून हे व्यवहार करावेत.

साधकहो, स्थावर संपत्तीच्या विक्रीचे व्यवहार तत्परतेने पूर्ण करून आपत्काळासाठी लवकरात लवकर सिद्ध व्हा !