चीनने पॅनगाँग तलावाच्या भागामध्ये सैनिक आणि नौका यांची संख्या वाढवली

भारत आणि चीन यांच्यातील तणावात वाढ

चीनच्या या वाढत्या कुरापती भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये सैन्य कारवाई करू नये, यासाठी दबाव निर्माण करण्यासाठीच आहेत, हे लक्षात येते ! भारताने चीनच्या दबावाला भीक न घालता पाकव्याप्त काश्मीर कह्यात घेतलेच पाहिजे !

नवी देहली – काही दिवसांपूर्वी लडाखच्या पॅनगाँग तलावाजवळ भारत आणि चीन यांच्या सैन्यामध्ये झटापटी झाली होती. आता याच भागात चीनने गस्तीच्या नावाखाली सैनिक आणि नौका यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढवली आहे. त्यामुळे येथील तणावामध्ये भर पडली आहे. लडाखमध्ये भारतीय सैनिकांच्या गस्त घालण्यावर, तसेच रस्ता बांधणीवर चीनने आक्षेप घेतला आहे.

१. तलावाच्या ४५ किलोमीटरच्या पश्‍चिम भागावर भारताचे नियंत्रण आहे. या भागात गस्त घालण्यासाठी भारताकडेसुद्धा चीन इतक्याच नौका आहेत. तलावाच्या भागात चीनने केवळ नौकांची संख्या तिप्पट वाढवली आहे, तसेच तो आक्रमकपणे वागत आहे.

२. याविषयी सैन्याधिकार्‍याने सांगितले की, लडाखमध्ये जो तणाव आहे, त्यामुळे चीनला लागून असलेल्या सीमारेषेवरील अन्य ठिकाणची परिस्थिती बिघडू शकते.
भारत स्वतःच्याच भागात बांधकाम करत आहे. जेव्हा चिनी सैनिक बलपूर्वक घुसखोरी करतात आणि आपल्या सैनिकांकडून त्यांना माघारी फिरण्यास सांगण्यात येते, तेव्हा स्वत:हून ते माघारी फिरत नाहीत. त्यामुळे संघर्षाची स्थिती उत्पन्न होते.