‘ई-शिक्षण’ नकोसे वाटू नये !

कोरोनाच्या संकटामुळे साधारण मार्चच्या तिसर्‍या आठवड्यापासून शाळा, महाविद्यालये बंद आहेत. या एक-दोन मासांच्या कालावधीत शिक्षणक्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर एक पालट घडतांना दिसून येत आहे, तो म्हणजे ‘ई-एज्युकेशन’चा (संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षण देण्याचा उपक्रम) ! दळणवळण बंदीच्या काळात विद्यार्थ्यांची शैक्षणिक हानी होऊ नये; म्हणून विविध ‘अ‍ॅप्स’ वापरून ‘ऑनलाईन’ वर्ग भरवले जात आहेत. ‘ऑनलाईन प्रशिक्षण’, ‘ऑनलाईन चाचण्या’ यांचे पेव फुटले आहे. तंत्रज्ञानाचे कितीही युग आले, तरी शिक्षणक्षेत्रात त्याचा तितकासा आणि सर्वदूर उपयोग होत नव्हता; पण कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर अवघ्या १-२ मासांमध्ये शिक्षणव्यवस्थेने एका आभासी विश्‍वात प्रवेश केला. शहरांपासून खेड्यांपर्यंत आणि पदव्युत्तर शिक्षणापासून शालेय शिक्षणापर्यंत सध्या ‘ई-कंटेंट’चा (संगणकीय लिखाणाचा) भडिमार होत आहे. यामागे अपरिहार्यता आहे; तशी दूरदृष्टीची वानवा असल्याची झलकही आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी पत्रकार परिषदेमध्ये ‘केंद्र सरकार प्रत्येक इयत्तेसाठी स्वतंत्र दूरचित्रवाहिनी चालू करणार आहे’, असे सांगितले. हा निर्णय महत्त्वपूर्ण आहे; पण त्याच जोडीला पर्याय म्हणून असलेली ‘ऑनलाईन शिक्षणा’ची प्रक्रिया ही मुख्य पद्धत होऊ नये, हीसुद्धा अपेक्षा आहे.

‘ऑनलाईन’ शिक्षणाचा महत्त्वाचा लाभ हा आहे की, या शिक्षणाला स्थळ आणि वेळ यांचे बंधन नाही. प्रत्येक जण आपापल्या सोयीने आणि उपलब्ध वेळेनुसार ‘ई-कंटेंट’ पाहून शिकू शकतो. याशिवाय कुशाग्र, सामान्य किंवा अल्प बुद्धीमत्तेचे विद्यार्थी त्यांच्या आकलनक्षमतेनुसार ‘ऑनलाईन कंटेंट’चा चांगल्या प्रकारे उपयोग करून घेऊ शकतात. तशी सोय शाळा-महाविद्यालये यांमध्ये भरवल्या जाणार्‍या वर्गांमध्ये असतेच असे नाही. वर्गामध्ये शिक्षकांचे बोलणे ‘रिवाईंड’ (पुनरावृत्ती) करता येऊ शकत नाही किंवा त्याविषयी मर्यादा येतात. ‘ई-लर्निंग’चे हे जसे लाभ आहेत, तशीच त्याची दुसरी बाजूही आहे. अशा प्रकारच्या अध्ययन-अध्यापन प्रक्रियेत जवळीक, आदर, धाक, आपुलकी यांना तितकेसे स्थान नसते. समोरासमोरचा प्रत्यक्ष संवाद होण्यास मर्यादा असल्याने शिक्षण घेतांना अळम्टळम् होण्याची शक्यता अधिक असते. ‘ऑनलाईन’ परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांचे मूल्यमापनही योग्य प्रकारे होण्याची किंवा ‘चिटिंग’चे (फसवणुकीचे) प्रमाण न होण्याची शक्यता अल्प असते. त्याशिवाय ‘ई-शिक्षण’ घेण्यासाठी सुविधायुक्त भ्रमणभाष, ‘इंटरनेट’ आदी सर्व असण्याची पूर्वअट आहेच. नव्याच्या नवलाईप्रमाणे सध्या ‘ऑनलाईन’ शिक्षण, ‘ऑनलाईन परीक्षा’ यांना सर्वत्र उधाण आले असले, तरी त्यामध्ये ‘विद्यार्जन’ आणि ‘ज्ञानदान’ हा मुख्य हेतू गटांगळ्या खात नाही ना ?, हे पाहिले पाहिजे. अन्यथा ‘ई-शिक्षणा’चे धडे गिरवतांना ‘शिक्षण नकोसे झाले आहे’, असे विद्यार्थ्यांना वाटू नये; म्हणजे झाले !

– प्रा. (सौ.) गौरी कुलकर्णी, पुणे