कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सी.आर्.पी.एफ्.च्या सैनिकांनी दिले एक दिवसाचे वेतन !

नवी देहली – कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी साहाय्य म्हणून प्रत्येक जण पुढे येऊ लागले आहेत. केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (‘सी.आर्.पी.एफ्.’च्या) सैनिकांनीही स्वेच्छेने त्यांचे एक दिवसाचे वेतन दिले आहे. सैन्याकडून ‘पंतप्रधान साहाय्यता निधी’मध्ये ३३ कोटी ८० लाख रुपयांचा धनादेश जमा करण्यात आला आहे. ‘कोरोनावर तत्काळ नियंत्रण मिळवण्यासाठी आम्ही हे साहाय्य दिले आहे’, असे सैनिकांनी म्हटले आहे.

तेलंगण येथील भाजपचे आमदार टी. राजा सिंह यांनी एक मासाचे वेतन दिले

भाग्यनगर (तेलंगण) – येथील गोशामहल मतदारसंघातील भाजपचे प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजा सिंह यांनी कोरोनाशी लढण्यासाठी राज्य सरकारच्या ‘मुख्यमंत्री साहाय्यता निधी’मध्ये त्यांचे एक मासाचे वेतन दिले आहे. ते म्हणाले की, राज्यातील जनतेने घाबरून जाण्याऐवजी घरातच रहावे, तसेच राज्य सरकारने गरिबांना मूलभूत सुविधा पुरवाव्यात.