राष्ट्रासाठी स्वार्थ बाजूला ठेवून सर्वस्वाचा त्याग करायला शिकवून त्याचे आचरण करायला लावणारी हिंदु संस्कृती !

श्री. सतिश कोचरेकर

‘कोरोनाने सध्या संपूर्ण जगात धुमाकूळ घातला आहे. या विषाणूंशी दोन हात करण्यासाठी प्रत्येक देश मोठ्या प्रमाणावर झुंजत आहे. दुर्दैवाने ‘यावर कोणत्याही प्रकारचा ठोस उपचार नाही’, असे पंतप्रधान मोदी यांनी जनतेला संबोधित करतांना सांगितले. हा विषाणू हवेत संक्रमित होत नसून बाधित रुग्ण संपर्कात आल्याने याचा प्रादुर्भाव वाढतो. त्यामुळे यापासून बचाव करण्यासाठी गर्दीची ठिकाणे टाळणे, हा सर्वांत उत्तम उपाय आहे. आज जगाच्या तुलनेत भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी आहे; मात्र पुढचा टप्पा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तो टप्पा पार पडला, तर देशात भयावह स्थिती निर्माण होऊ शकते. शासनाकडून जनतेच्या सुरक्षेसाठी मोठ्या प्रमाणात प्रबोधन करण्यात येत आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणूस प्राथमिक दृष्टीने आवश्यक ती काळजी घेत आहे.

समाजाने दाखवलेला अत्यंत बेशिस्तपणा !

विमानाने भारतात दाखल होणार्‍या व्यक्तींना वैद्यकीय निगराणीत ठेवणे, त्यांना आवश्यक त्या सुविधा पुरवणे, बाधित असल्याचे आढळल्यास योग्य उपचारांची व्यवस्था करणे, समाजात प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी सुसज्ज विलगीकरण कक्षात ठेवणे, त्यांना सर्व प्रकारच्या सुविधा पुरवणे, हा सगळा भाग सरकारच्या वतीने विनामूल्य उपलब्ध करण्यात आला आहे. या सर्व प्रयत्नांसाठी शासनाचे अभिनंदन करायलाच हवे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटल्याप्रमाणे आपल्यासाठी हा युद्धाचा प्रसंगच आहे. त्याचा सामना आपल्याला एकत्र येऊन करायचा आहे आणि ते आवश्यक आहेच.

कनिका कपूर यांची मेजवानी

मुळात ज्यांच्या माध्यमातून कोरोना विषाणू भारतात दाखल झाला; म्हणजेच या साथीचा प्रादुर्भाव होण्याचा पहिला टप्पा पार पडला, त्यांच्यापैकी काही जणांची वागणूक मात्र निराशाजनक आणि प्रचंड स्वार्थीपणाची आढळून येत आहे. कनिका कपूर ही गायिका अमेरिकेहून १५ मार्च या दिवशी लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) येथे आली. कोरोनाची लक्षणे लगेच दिसून येत नसल्याने शासनाच्या निर्देशांनुसार भारताबाहेरून आलेल्या प्रवाशांनी त्यासाठी १४ दिवस स्वतःला घरामध्ये बंदिस्त करून ठेवणे आवश्यक आहे; परंतु कनिका कपूर यांनी हा नियम न पाळता लक्ष्मणपुरीमध्ये ४०० ते ५०० जणांची उपस्थिती असलेल्या मोठ्या मेजवानीत सहभाग घेतला. अनेकांशी हस्तांदोलन केले. मंत्र्यांसह अनेक प्रतिष्ठित व्यक्ती या मेजवानीत उपस्थित होत्या. आज त्यांच्यात भीतीचे वातावरण आहे. ही एकच घटना नव्हे, तर यापूर्वीही विलगीकरण केलेले प्रवासी ट्रेनमध्ये उघडपणे प्रवास करतांना आढळून आले. एका प्रसंगात तर अशाच एका विदेशातून परतलेल्या महिलेला तिचा पती कोरोनाग्रस्त असल्याचे आढळल्यावर ती माहेरी आली. तिच्या माहेरच्या व्यक्तींनी तिला गुपचूप लपवून ठेवले. शेवटी पोलिसांनी बळाचा वापर करत त्या महिलेला पुढील उपचारांसाठी कह्यात घेतले. बांगलादेशातून आलेल्या विद्यार्थ्यांनीही १४ दिवसांच्या विलगीकरणाला विरोध करत विमानतळावर गोंधळ घातला. तेथेही पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. उल्हासनगर मध्ये एका महिलेने १ सहस्र ५०० उपस्थिती असलेल्या एका कार्यक्रमात सहभाग घेतला. एक व्यक्तीने मुंबई ते ओडिशा असा प्रवास लपत-छपत केला. त्या कालावधीत २ ठिकाणी त्याने वास्तव्यही केले. कोरोनासारखा आजार देशाच्या एका टोकापासून दुसर्‍या टोकापर्यंत पसरवण्यात अशा व्यक्तींची भूमिका महत्त्वाची ठरू शकते, यात शंका नाही.

संसर्गजन्य आजार पसरवणार्‍यांचे कधीही समर्थन नाही !

कोरोनाविषयीच्या सूचनांचे पालन न करणारे बेशिस्त नागरिक

या सर्व घटना पहाता ‘कोरोनाविषयी वरीलपैकी कोणालाही माहिती नव्हती’, असे अजिबात नाही. देशातील वातावरण, सामाजिक प्रसारमाध्यमे, सार्वजनिक ठिकाणे, बातम्या, वर्तमानपत्र इतकेच नव्हे, तर भ्रमणभाषच्या कॉलर ट्यूनपर्यंत प्रत्येक ठिकाणी कोरोना हाच विषय सध्या चर्चेत आहे. कोरोनाने बाधित होणे, हा त्यांचा दोष नाही; पण ‘आपल्यामुळे स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात येऊ नये, असा विचार प्रत्येकाने करावा’, ही सामान्य अपेक्षा आपण नक्कीच करू शकतो. विमानाने प्रवास करणारा प्रवासी शिकलेला, समाज जीवनाची माहिती असणारा, योग्य-अयोग्य गोष्टींचा सारासार विचार करू शकणारा, आर्थिक स्थिती बर्‍यापैकी असलेला असू शकतो, असे गृहीत धरता येईल. असे असतांना आजार आढळून आल्यावर आपला जीव वाचवण्यासाठी उपचार न घेता पळून जाणे, हा विचार योग्य कसा काय असू शकतो ? संसर्गाने पसरणारा आजार जाणीवपूर्वक आपल्या संपर्कात येणार्‍या निष्पाप जनतेत पसरवण्याचे समर्थन कधीही करता येणार नाही.

स्वतःमध्ये त्यागाची भावना निर्माण होण्यासाठी हिंदु संस्कृतीचे आचरण करा !

ज्या समाजात आपण रहातो, त्या समाजाप्रती स्वतःचे काही कर्तव्य असते. आपण समाजाचे काही देणे लागतो. एखादी स्वार्थी व्यक्ती काही देऊ शकत नसेल, तर किमान आपल्यामुळे समाजाची हानी होणार नाही, याची जाणीव प्रत्येकाला असायलाच हवी. त्यामुळे यापुढे दुर्दैवाने या आजाराचा सामना करावा लागल्यास शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करत सहकार्य करणे, हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. समाजाचा विचार करणे, राष्ट्रभावना जागृत असणे, प्रसंगी राष्ट्रासाठी स्वार्थ बाजूला ठेवून अगदी सर्वस्वाचा त्याग करणे, हा विचार भारतीय हिंदु संस्कृती आपल्याला देते. संकटात असलेल्या एका कबुतराला वाचवण्यासाठी स्वतःच्या मांडीचे मांस स्वतःच्या हाताने कापून त्याच्या मागावर असलेल्या ससाण्याला देणार्‍या शिबी राजाचे उदाहरण याच संस्कृतीने आपल्याला दिले आहे. हा त्याग, समर्पण वृत्ती स्वतःमध्ये येण्यासाठी हिंदु संस्कृतीचे आचरण करणे, याशिवाय दुसरा पर्याय कसा बरे असेल ?’

– श्री. सतिश कोचरेकर, हिंदु जनजागृती समिती, मुंबई.