सायखेडा (नाशिक) येथे कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जनजागृती करणार्‍या पोलिसांवरच २ तरुणांचे आक्रमण

सायखेडा (जिल्हा नाशिक) – येथे कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर ‘गर्दी करू नका, एकत्र येऊ नका’, असे आवाहन करत असलेल्या पोलिसांवरच २ तरुणांनी आक्रमण केले. त्रिमूर्ती चौकात पोलिसांनी तरुणांच्या जमावाला समजावण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांतील अमोल कुटे आणि संतोष कुटे यांनी पोलिसांशी हुज्जत घालत त्यांना शिवीगाळ केली. त्यानंतर अमोल कुटे याने पोलिसांच्या हातातील काठी हिसकावून पाठीमागून एका पोलिसाला पकडून धरले, तर संतोष कुटे याने साहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष अडसूळ आणि २ हवालदार यांच्यावर काठीने आक्रमण केले, तसेच त्यांचा गणवेश फाडला. या प्रकरणी गुन्हा नोंद करून त्यांना अटक करण्यात आली. (पोलिसांवर आक्रमण करणार्‍यांवर कठोर कारवाई केली, तरच अन्य कुणी असे कृत्य करण्याचे धाडस करणार नाही ! – संपादक)