नवी देहली – कोरोना विषाणू हवेत ३ घंट्यांपर्यंत जिवंत राहू शकतो, असे न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या संशोधनातून समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने नुकतीच सर्व वैद्यकीय अधिकार्यांना काळजी घेण्याचा सूचना दिली आहे.
कोरोनाची हवेत तग धरण्याची क्षमता पडताळण्यासाठी शास्त्रज्ञांनी न्यूब्युलायझरच्या माध्यमातून ‘व्हायरस एअरबॉर्न’ (हवेतून पसरणारा जंतू अथवा विषाणूजन्य) केला. त्या वेळी ३ घंट्यांसाठी हा विषाणू हवेत रहात असल्याचे दिसून आले. या शास्त्रज्ञांनी रुग्णालयातही पडताळणी केली. त्या वेळी शिंकल्यानंतर आणि खोकल्यानंतर जे थेंब पसरले होते, त्यांच्याद्वारे तेथील भूमी अन् भिंती यांवर कोरोनाचे विषाणू आढळले; पण हवेत हा विषाणू नव्हता. भूमीवरील विषाणू निर्जंतुकीकरणानंतर नष्ट झाला.
‘व्हायरस एअरबॉर्न’ करण्यासह अनेक वैद्यकीय प्रक्रिया आहेत, ज्यामुळे रुग्णाच्या शरीरातील विषाणू हवेत पसरतो आणि तो हवेत राहिल्यास डॉक्टर अन् परिचारिका यांच्या आरोग्यालाही धोका पोचू शकतो. त्यामुळेच जागतिक आरोग्य संघटनेने वैद्यकीय अधिकार्यांना काळजी घेण्याच्या सूचना दिल्या.