ध्वज विजयाचा उंच धरा रे…!

संपादकीय

लक्षावधी वर्षांपासूनची अतीप्राचीन सनातन हिंदु संस्कृती निर्माण झालेल्या सृष्टीचा आज जन्मदिवस ! ज्या दिवशी या सृष्टीची निर्मिती झाली, पर्यायाने त्याच दिवशी सनातन (हिंदु) संस्कृतीची निर्मिती होण्यास आरंभ झाला. पुढे श्रीरामाने वालीचा वध केला, शकांनी हुणांचा पराभव केला, तो हा विजयाचा दिवस. आजघडीला जगासह भारत देशही असुररूपी विषाणूसंसर्गाच्या गडद छायेखाली गेला असला, तरी आतापर्यंतच्या भारताच्या क्षात्रतेजवर्धक उज्ज्वल इतिहासाप्रमाणेच श्रद्धावान भारतीय त्यावर विजय मिळवतील याविषयी तीळमात्रही शंका नाही !

अराजकसदृश स्थिती

आजचा गुढीपाडवा आपत्काळाच्या उंबरठ्यावरील आहे. गेल्या काही मासांत भारतात सातत्याने चालू असलेल्या अराजकसदृश स्थितीच्या पार्श्‍वभूमीमुळे आणि त्यात भरीस भर म्हणून आलेल्या कोरोनाच्या साथीमुळे आजच्या गुढीपाडव्याची पहाटही काहीशी संधीकालाप्रमाणे झाल्याचे सर्वजण अनुभवत आहेत. अर्थात् भगवंताच्या अनुसंधानात सदैव रहाणारे भक्त हे स्थिर असल्याने त्यांच्यासाठी सर्व काळ हा सारखाच असतो. ‘खरे सण नेहमी ईश्‍वरी (आदर्श) राज्यात साजरे होतात’ याचा अर्थ ‘सणांचा खरा लाभ आदर्श व्यवस्थेत घेता येऊ शकतो’, याची प्रचीती आज भारतीय घेत आहेत. अनेक संतांनी त्यांच्या वाङ्मयामध्ये अशा प्रकारच्या रोगाचे संकट येणार असल्याचे सूतोवाच केल्याचे दाखले सध्या सामाजिक प्रसारमाध्यमांतून पुढे येत आहेत. अहो, सनातन संस्कृतीने जगाला काय दिलेले नाही ? समृद्ध जीवन जगण्याची आदर्श पद्धत तिने जगाला दिली आहे. हे जीवन जगतांना येणार्‍या संकटांच्या पूर्वसूचना दिल्या, तसे ते निवारणाच्या उपाययोजनाही सांगितल्या आहेत. रोग होऊच नयेत म्हणून ‘योग’ दिला आहे; रोग झालेच तर ‘आयुर्वेद’ दिला आहे. आपला आहार-विहार, यम-नियम, आचार-विचार सारे काही आदर्श आणि कोणत्याही पाताळात दडलेल्या जीवजंतूंपासून आंतर्बाह्य संरक्षण करण्यास सक्षम असणारे आहेत. रामरक्षेत म्हटले आहे, ‘पातालभूतलव्योम-चारिणश्छद्मचारिण: । न द्र्ष्टुमपि शक्तास्ते रक्षितं रामनामभि: ।’ थोडक्यात ‘ज्याच्याभोवती रामनामाचे कवच आहे त्याला पाताळ, पृथ्वी, आकाश कुठेही दडलेले जीवजंतू काही करू शकणार नाहीत.’ नामजप, प्रार्थना, मंत्रोच्चार आदी साधना; अग्निहोत्रासारखे विधी; औषधी वनस्पती, कापूर, गोमूत्र आदी सात्त्विक गोष्टींचा वापर जंतूसंसर्गावरील अनेक प्रतिबंधात्मक उपाय भारतात सहजतेने उपलब्ध आहेत. ज्याचे तेज सर्व रोगांचा नाश करते, तो साक्षात् सूर्यनारायण येथे प्रतिदिन तळपत आहे. घरात, मंदिरात जाण्याआधी हातपाय धुण्याची, तसेच नमस्कार करून अभिवादन करण्याची पद्धत येथे आहे. आज जगभरातील प्रतिष्ठितांसह सर्वांना या आणि अशा हिंदु संस्कृतीतील धर्माचरणाचा अंगीकार करणे भाग पडले आहे. आज विदेशात कोरोना जंतूसंसर्गाच्या प्रादुर्भावाने मृत झालेल्या शेकडोंना पुरण्यास अडचणी येत आहेत. चीनने गुपचूप कोरोनाग्रस्त मृतदेहांना अग्नी दिल्याची वृत्ते आहेत. सनातन हिंदु संस्कृतीचे महत्त्व ओळखण्याची हीच खरी आणि अंतिम वेळ आहे. भारतात जन्म घेणारे अतिशय भाग्यवान आहेत; पण ‘खरोखरच किती जणांना याची जाणीव आहे ?’, हा मोठा प्रश्‍न आहे.

धर्म विरुद्ध अधर्म

वर्ष २०१४ मध्ये भाजपचे शासन देशात सत्तेवर आल्यानंतर नि(अ)धर्मीवादी आणि धर्माचे महत्त्व मानणारे या देशातील दोन मुख्य मतप्रवाहांमध्ये खर्‍या अर्थाने मोठ्या प्रमाणात वैचारिक घुसळण प्रकट स्वरूपात चालू झाली. गेल्या ६ वर्षांत नि(अ)धर्मीवादी आणि धर्माचे महत्त्व मानणारे यांच्यातील वैचारिक मतभेदांना अधिकाधिक सुस्पष्टता येऊन आता सनातन भारतीय संस्कृतीचे महत्त्व अधिकाधिक समोर येत आहे. आता राष्ट्रद्रोही आणि राष्ट्रप्रेमी, तसेच अधर्मी आणि धार्मिक असे गट काहीसे स्पष्ट स्वरूपात पुढे येत आहेत, हे एकप्रकारे चांगले लक्षण आहे. सीमारेषेवरील जिज्ञासूंनाही धर्माचे महत्त्व लक्षात येऊ लागले आहे. काँग्रेसच्या काळात भारतीय संस्कृतीचा द्वेष पराकोटीला पोचला; मात्र ‘येणार्‍या काळात जगभर हिंदु संस्कृतीचे महत्त्व वाढणार आहे’, असे भविष्य अनेक द्रष्ट्यांनी वर्तवले आहे. पाश्‍चात्त्यांच्या अंधानुकरणात डुबलेली जनता आज भारतात पुष्कळ मोठ्या प्रमाणात असूनही भारतात आणि जगभरात सनातन भारतीय संस्कृतीतील विविध साधनामार्गांद्वारे साधना करून मनःशांती शोधणार्‍यांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. भारतीय समाजासह जगातील बहुसंख्य लोक ‘भारतीय संस्कृती’चे महत्त्व जाणून त्याचे आचरण करण्यासाठी धडपडत आहेत. कुठल्या देशात आकाशवाणीवर संस्कृत श्‍लोक म्हटले जात आहेत, तर कुठल्या देशाच्या विधीमंडळात संस्कृत श्‍लोकांचे पठण होत आहे. जर्मनीत संस्कृत शिकवणारी १४ विद्यापिठे आहेत आणि तिथे संस्कृतमधून आकाशवाणीवर बातम्याही दिल्या जातात. ही काही अत्यल्प उदाहरणे आहेत. भारतात ‘संस्कृत विद्यापीठ विधेयक’ संमत झाले आहे. गेल्या काही मासांत राममंदिराचा निर्णय होणे, काश्मीरमधील ३७० कलम जाणे, ‘सीएए’ सारखा कायदे होणे या हिंदूंच्या दृष्टीने हिताच्या गोष्टी शासनाने केल्यामुळे हिंदूंमध्ये काहीसे उत्साहाचे वातावरण आहे. २२ मार्चला पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देत देशभरातील आबालवृद्धांनी एकाच वेळी नाद करून संघटितपणाचा आविष्कार दर्शवला. राष्ट्रहिताच्या कायद्यांना विरोध करून दंगली करणारे, ‘आझादी’ची मागणी करणारे यांसारख्या आतंकवाद्यांना तोंड देण्यासाठी अशाच संघटित हिंदूंची आज आवश्यकता आहे. या आपत्काळात विषाणू आणि अधर्मी यांना तोंड देण्यासाठी हिंदू एकत्र आले, तर येणार्‍या काळात सनातन संस्कृतीचा ब्रह्मध्वज त्यांना उंचच उंच फडकवता येईल, यात शंका नाही !