-
देशात जिथे कुठे असाल, तिथेच थांबण्याचे आवाहन
-
वैद्यकीय सुविधांसाठी १५ सहस्र कोटी रुपयांच्या निधीची तरतूद
नवी देहली – देशात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे तो रोखण्यासाठी २४ मार्चला रात्री १२ वाजल्यापासून संपूर्ण देशात २१ दिवसांची (१४ एप्रिलपर्यंत) ‘दळणवळण बंदी’ (लॉकडाऊन) करण्यात येत आहे. देश, देशातील प्रत्येक कुटुंब आणि प्रत्येक नागरिक यांना वाचवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून या काळात नागरिकांना घराबाहेर पडण्यावर संपूर्ण बंदी घालण्यात आली आहे. देशातील सर्व राज्यांपासून ते गावांपर्यंत सर्वच भागांमध्ये ‘दळणवळण बंदी’ केली जाणार आहे. ही एक प्रकारे संचारबंदी (कर्फ्यू) असून ती ‘जनता कर्फ्यू’पेक्षा अधिक कठोर असणार आहे. महामारीला रोखण्यासाठी हा निर्णय आवश्यक असून त्यासाठी देशाला आर्थिक किंमत चुकवावी लागेल. अशा कठीण प्रसंगी प्रत्येक भारतियाला वाचवणे, हे केंद्र आणि राज्य शासन यांचे प्रथम प्राधान्य असेल. त्यामुळे माझी नागरिकांना हात जोडून प्रार्थना आहे की, आता देशात जिथे कुठे असाल, तिथेच थांबा. देशातील प्रत्येक नागरिकांसाठी हा कठोर निर्णय आवश्यक असून प्रत्येकाने यासाठी वेळ द्यावा. कोरोनाचे संक्रमण चक्र तोडण्यासाठी २१ दिवसांचा कालावधी महत्त्वपूर्ण आहे. जर आपण हे २१ दिवस पाळले नाहीत आणि जर स्वतःला सावरले नाही, तर आपण २१ वर्षे मागे जाऊ, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करतांना केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की,
१. कोरोनाचा प्रभावी सामना करण्यासाठी ‘सोशल डिस्टन्सिंग’ (दूर रहाणे) आवश्यक आहे.
२. काही नागरिकांचा निष्काळजीपणा सर्वांच्या जिवाला हानीकारक ठरत आहे. हाच निष्काळजीपणा देशाला पुढे हानीकारक ठरू शकेल. अशा प्रकारे जर निष्काळजीपणा चालूच राहिला, तर देशाला पुष्कळ मोठी किंमत चुकवावी लागेल आणि त्याचा कोणी अंदाज करू शकणार नाही.
४. मी एक कुटुंब सदस्य म्हणून सांगू इच्छितो की, नागरिकांनी बाहेर जाणे बंद करून घरातच थांबावे. देशव्यापी ‘लॉकडाऊन’ने घराच्या भोवती लक्ष्मणरेषा आखली आहे. ‘घरातून बाहेर जाणारे एक पाऊल कारोनाला घरात आणेल’, याची जाणीव नागरिकांनी ठेवावी. त्यासाठी जनतेने धैर्य आणि अनुशासन पाळणे आवश्यक आहे.
५. केंद्र शासनाने आरोग्यविषयक सर्व प्रकारच्या वैद्यकीय सुविधा मिळण्यासाठी १५ सहस्र कोटी रुपयांच्या निधीची व्यवस्था केली आहे.
६. लोकहो, अफवा पसरवू नका आणि पसरू देऊ नका. नागरिकांनी शासनाच्या निर्देशांचे पालन करावे. कुटुंब आणि देश यांचे रक्षण यांसाठी हाच एकमेव रस्ता आहे. यातून आपण विजयी होऊन पुढे जाणारच.