Bhojshala Verdict : भोजशाळा मशीद नव्हे, तर हिंदूंचे श्री वाग्देवी मंदिरच ! – मध्यप्रदेश उच्च न्यायालय

  • श्रीरामजन्मभूमीनंतर हिंदूंचा दुसरा मोठा विजय !

  • मध्यप्रदेश उच्च न्यायालयाच्या इंदूर खंडपिठाचा मोठा निर्णय

  • मुसलमानांना अन्य ठिकाणी जागा मिळण्यासाठी सरकारला विनंती करण्याचा सल्ला

  • ब्रिटनच्या संग्रहालयात असणारी श्री वाग्देवीची मूर्ती परत आणण्याचे केंद्र सरकारला निर्देश

इंदूर (मध्यप्रदेश) – मध्यप्रदेशातील धार येथील प्रसिद्ध भोजशाळा हिंदूंचे श्री वाग्देवीचे म्हणजे श्री सरस्वतीदेवीचे मंदिर आहे, असा निर्णय मध्यप्रदेश उच्च न्यायालयाच्या इंदूर खंडपिठाने १५ मे या दिवशी दिला. खंडपिठाने म्हटले, ‘जरी काळाच्या ओघात या जागेवर काही नियम लादले गेले होते, तरी या जागेवर पूजेचे स्थान असल्याचे सातत्याने निदर्शनास आले आहे. या जागेत सापडलेले ऐतिहासिक साहित्य हे सिद्ध करते की, हे राजा भोज यांच्याशी संबंधित संस्कृत शिक्षणाचे एक केंद्र होते. ते धार येथे देवी श्री वाग्देवी सरस्वतीला समर्पित मंदिर अस्तित्वात असल्याचे दर्शवते. त्यामुळे या क्षेत्राचे धार्मिक स्वरूप हे देवी वाग्देवी सरस्वतीचे मंदिर असलेली ‘भोजशाळा’ असल्याचे मानले जात आहे.’

मुसलमान याला ‘कमाल मौला मशीद’ म्हणत होते. न्यायालयाने मुसलमान पक्षाला मशिदीसाठी सरकारकडे स्वतंत्र भूमीची मागणी करण्याचे निर्देश दिले आहेत. हिंदूंच्या बाजूने अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांनी न्यायालयात बाजू मांडली होती. त्यांनी निर्णयानंतर ‘धर्माचा विजय होवो आणि अधर्माचा नाश होवो’ अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

भोजशाळेच्या लढ्याला प्रारंभ करणारे पू. अधिवक्ता हरि शंकर जैन !

(पू.) अधिवक्‍ता हरिशंकर जैन

ज्येष्ठ अधिवक्ता पू. हरि शंकर जैन यांनी भोजशाळा हिंदूंना परत मिळण्यासाठी प्रथम न्यायालयीन लढ्याला आरंभ केला. त्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे, तसेच पुरावे त्यांनी गोळा केले. हिंदूंच्या अस्मितेशी निगडित हा प्रदीर्घ न्यायालयीन लढा देणारे पू. अधिवक्ता हरि शंकर जैन यांच्या चरणी कृतज्ञता !

तसेच चिकाटीने हा लढा पुढे चालू ठेवणारे त्यांचे पुत्र अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांचे शतशः आभार !

जे आमचे होते, ते आम्ही पुनर्प्राप्त केले ! – अधिवक्ता विष्णु शंकर जैन

अधिवक्ता विष्णु शंकर जैन

भोजशाळेचा जो निकाल हिंदूंज्या बाजूने लागला आहे, तो पुष्कळ महत्त्वाचा आहे.

एका प्रदीर्घ लढ्यानंतर हिंदूंना त्या परिसरात पूजा करण्याचा अधिकार पुनर्प्राप्त झाला आहे. श्रीराममंदिर बाबराने उद्ध्वस्त केल्याची घटना वर्ष १५२८ मध्ये घडली होती. भोजशाळेचे प्रकरण हे त्याही पेक्षा जुने म्हणजे ११ व्या शतकातील आहे. तलवारीपेक्षा कलम अधिक सामर्थ्यवान असते, हे न्यायालयाच्या निकालामुळे पुन्हा एकदा सिद्ध झाले.

आता काशी आणि मथुरा शेष आहे ! – हिंदु जनजागृती समिती

मुंबई – भोजशाळेविषयीचा मध्यप्रदेश उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल म्हणजे केवळ एका वास्तूचा विजय नसून शतकानुशतके दडपल्या गेलेल्या ऐतिहासिक सत्याचा आणि परकीय इस्लामी आक्रमकांनी अतिक्रमित केलेल्या मंदिरांच्या मुक्ती लढ्याचा भव्य विजय आहे. भोजशाळेच्या मुक्तीचा लढा आज यशस्वी झाला असला, तरी या संघर्षात मोठा सहभाग हा भोजशाळा मुक्ती आंदोलनाचे प्रमुख श्री. नवलकिशोर शर्मा आणि हिंदु जनजागृती समिती यांचा होता. समिती या ऐतिहासिक निर्णयाचे सहर्ष स्वागत करते आणि ‘…अब काशी-मथुरा बाकी हैं !’ (आता काशी आणि मथुरा मुक्त होणे शेष आहे) अशी संकल्प घोषणा करत आहे.

हिंदु जनजागृती समितीचे आंदोलन आणि हिंदु अधिवेशनाची फलश्रुती !

धार येथील भोजशाळेच्या मुक्तीसाठी हिंदु जनजागृती समितीने केवळ रस्त्यावर  आंदोलने केली नाहीत, तर राष्ट्रीय स्तरावर व्यापक जनजागृती केली. गोवा येथे होणार्‍या ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ (अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन) या राष्ट्रीय व्यासपिठावरून प्रतिवर्षी या संदर्भात कायदेशीर आणि धोरणात्मक ठराव संमत करून लढ्याची दिशा ठरवली. देशभरातील हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी मध्यप्रदेश सरकार आणि केंद्र सरकार यांच्याकडे याविषयी सातत्याने दाद मागितली होती. आज न्यायालयाने दिलेल्या या ऐतिहासिक निर्णयामुळे कोट्यवधी हिंदूंच्या भावनांना आणि समितीच्या प्रदीर्घ आंदोलनाला न्याय मिळाला आहे.

हिंदु जनजागृती समितीचे प्रसिद्धीपत्रक –

आक्रमकांचे अतिक्रमण हटवून काशी-मथुरेचा लढा निरंतर रहाणार !

या प्रसंगी समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी स्पष्ट केले की,

भारतातील हिंदूंची केवळ एक-दोन देवस्थाने आक्रमित झालेली नाहीत. परकीय आक्रमकांनी आणि धार्मिक कट्टरतावाद्यांनी हिंदूंच्या सहिष्णुतेचा लाभ घेऊन सहस्रो मंदिरांवर अनधिकृतपणे अतिक्रमणे केली आणि त्यावर स्वतःचा खोटा अधिकार सांगितला. अयोध्या आणि धार (भोजशाळा) येथील निकालांनी हे सिद्ध केले आहे की, असत्याचा बुरखा फार काळ टिकत नाही. आता वेळ आली आहे की, काशीच्या ज्ञानवापीपासून ते मथुरेच्या श्रीकृष्ण जन्मभूमीपर्यंतची सर्व आक्रमित क्षेत्रे मुक्त झाली पाहिजेत.

मध्यप्रदेशातील धार येथील ऐतिहासिक ‘भोजशाळा’ अर्थात हिंदूंचे पवित्र श्री वाग्देवी (सरस्वती) मंदिर आहे.

आम्ही निकालाला सर्वाेच्च न्यायालयात आव्हान देणार ! – मुसलमान पक्ष

निकालानंतर मुसलमान पक्षाचे अधिवक्ता अर्शद वारसी म्हणाले की, या निकालावर आम्ही समाधानी नाही. याविरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोत. आम्ही निकालाची पूर्ण प्रत मिळण्याची वाट पाहत आहेत. न्यायालयाने पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या तथ्यांना ग्राह्य धरूनच हा निकाल दिला आहे, असेही त्यांनी सांगितले.

(म्हणे) ‘बाबरी प्रकरणाच्या निकालाशी साम्य, सर्वाेच्च न्यायालय आदेश रहित करील !’ – असदुद्दीन ओवैसी

आम्हाला आशा आहे की,

सर्वाेच्च न्यायालय यात सुधारणा करेल आणि हा आदेश रहित करेल. बाबरी प्रकरणाच्या निकालाशी यात स्पष्ट साम्य दिसून येत आहे, अशी प्रतिक्रिया ए.आय.एम्.आय.एम्.चे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी ‘एक्स’वर करत व्यक्त केली. (सर्वाेच्च न्यायालयाने श्रीरामजन्मभूमी प्रकरणात हिंदूंच्या बाजूने निर्णय दिला होता, हे सर्वांनाच ठाऊक आहे. त्यामुळे जरी मुसलमान या प्रकरणात सर्वाेच्च न्यायालयात गेले, तरी न्यायालय हिंदूंच्याच बाजूने निर्णय देईल, हे पुरातत्व विभागाच्या पुराव्याने स्पष्ट होते ! – संपादक)

न्यायालयाने मांडलेली सूत्रे

मंदिराचे व्यवस्थापन कसे करायचे ? हे केंद्र सरकारने ठरवावे !

हे ऐतिहासिक आणि संरक्षित स्थळ देवी सरस्वतीला समर्पित असलेले मंदिर आहे. भोजशाळा मंदिराचे व्यवस्थापन कसे करायचे, हे केंद्र सरकार आणि पुरातत्व सर्वेक्षण विभाग यांनी ठरवावे. वर्ष १९५८ च्या कायद्यानुसार या मालमत्तेचे संपूर्ण व्यवस्थापन पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या हाती राहील.

नमाजपठणाचा अधिकार रहित

न्यायालयाने पुरात्व सर्वेक्षण विभागाचा वर्ष २००३ चा आदेशही रहित केला. या कायद्यामुळे हिंदूंना भोजशाळेत पूजा करण्याचा अधिकार नाकारला गेला होता. तसेच मुसलमानांना प्रार्थना करण्याचा अधिकार देणारा आदेशही न्यायालयाने रहित केला.

धार येथे मोठा बंदोबस्त !

निकालाच्या पार्श्वभूमीवर इंदूर आणि धार जिल्हा प्रशासन यांनी येथे मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला होता. निकालाचा दिवस शुक्रवारचा असल्याने भोजशाळेत दुपारी मुसलमान नेहमीप्रमाणे नमाजठणासाठी आले होते. या वेळी प्रशासनानकडून लोकांना शांतता ठेवण्याचे आवाहन करण्यात आले होते. पोलीस अधीक्षकांनी सांगितले की, धार शहराची सुरक्षा १२ स्तरांवर करण्यात आली आहे. राखीव पोलीस दल आणि धडक कृती दल यांना सतर्क ठेवण्यात आले आहे.

हिंदूंना होती मंगळवारी पूजा करण्याची अनुमती

वर्ष २००३ पासून येथे प्रत्येक मंगळवारी आणि वसंत पंचमीला हिंदूंना पूजा करण्याची, तर शुक्रवारी मुसलमानांना येथे नमाजपठण करण्याची अनुमती देण्यात आली होती. इतर दिवशी परिसर पर्यटकांसाठी खुला असतो. वर्ष २०१३ आणि २०१६ मध्ये वसंत पंचमी आणि शुक्रवार एकाच दिवशी आल्याने येथे तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.

वाचा → भोजशाळेसाठी संघर्षरत हिंदुत्वनिष्ठ, याचिकाकर्ते आदींनी ‘सनातन प्रभात’कडे व्यक्त केलेले अभिप्राय…

न्यायालयात झालेला युक्तीवाद

१. हिंदु पक्षाकडून सांगण्यात आले होते की, भोजशाळेवर ‘प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्ट १९९१’ (पूजास्थळ कायदा) लागू होत नाही. हे पुरातत्व सर्वेक्षण विभागाद्वारे संरक्षित स्मारक आहे. प्राचीन स्मारके आणि पुरातत्व स्थळे आणि अवशेष अधिनियम १९५१ च्या सूचीमध्ये भोजशाळेचे नाव नोंदवले आहे. वर्ष २०२४ मध्ये अधिवक्ता श्री. अश्विनी उपाध्याय प्रकरणात दिलेल्या निकालाला भोजशाळा प्रकरणात लागू करता येणार नाही.

२. ७ एप्रिल २००३ या दिवशी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने प्रसारित केलेला आदेश रहित करण्याची मागणी करण्यात आली होती. न्यायालयाला विनंती केली की, भोजशाळेचे धार्मिक स्वरूप निश्चित करून ते पूर्णपणे हिंदु समाजाला सोपवले जावे. यामुळे देवी सरस्वतीची पूजा आणि हवन वर्षभर अखंडितपणे करता येईल.

३. मुसलमान पक्षाच्या अधिवक्त्या शोभा मेनन यांनी न्यायालयात सांगितले की, भोजशाळा मंदिर आहे, मशीद आहे कि जैनशाळा आहे ? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. विवादित स्थळाचे धार्मिक स्वरूप निश्चित करण्याचा अधिकार दिवाणी न्यायालयाला आहे. उच्च न्यायालय कलम २२६ अंतर्गत रिट अधिकार क्षेत्रात सुनावणी करत आहे.

४. जैन समाजाने म्हटले की, जी प्रतिमा श्री वाग्देवीची असल्याचे सांगितले जात आहे, ती जैन समाजाची आराध्य देवी अंबिकाची आहे. सिहोर येथील देवी अंबिकाच्या मंदिरात भोजशाळेत सापडलेल्या मूर्तीसारखीच मूर्ती आहे. याला जैन तीर्थक्षेत्र घोषित केले पाहिजे.

न्यायालयीन लढाईचा घटनाक्रम

वर्ष २०२२ मध्ये रंजना अग्निहोत्री आणि इतर यांनी ‘हिंदू फ्रंट फॉर जस्टिस’ यांच्या वतीने उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करून भोजशाळेचे धार्मिक स्वरूप निश्चित करण्याची आणि हिंदु समाजाला पूर्ण अधिकार देण्याची मागणी केली.

याचिकेत नियमित पूजा-अर्चा करण्याचा अधिकार, परिसरात नमाजपठणावर बंदी, न्यासाची स्थापना आणि ब्रिटीश संग्रहालयात ठेवलेली श्री वाग्देवीची मूर्ती परत आणण्यासारख्या मागण्यांचा समावेश आहे.

न्यायालयाच्या आदेशानंतर पुरातत्व विभागाकडून सर्वेक्षण

वर्ष २०२४ मध्ये भारतीय पुरातत्व सर्वेक्षणने भोजशाळा परिसराचे ९८ दिवस वैज्ञानिक सर्वेक्षण केले होते. त्यानंतर २३ जानेवारी २०२६ या दिवशी वसंत पंचमीला सर्वोच्च न्यायालयाने दिवसभर पूजा-अर्चा करण्याची अनुमती दिली. उच्च न्यायालयात ६ एप्रिलपासून नियमित सुनावणी प्रारंभ झाली, जी १२ मे पर्यंत चालली.

हिंदु पक्षाने केलेला युक्तीवाद

हिंदु पक्षाच्या वतीने अधिवक्त्यांनी भोजशाळा हे श्री सरस्वती मातेचे मंदिर आणि प्राचीन विद्या केंद्र असल्याचे सांगत ऐतिहासिक दस्तऐवज, पुरातत्व विभागाचे सर्वेक्षण, शिलालेख, स्थापत्य अवशेष आणि वसंत पंचमीला पूजा करण्याच्या परंपरेचा हवाला दिला.

अधिवक्ता मनीष गुप्ता यांनी परमार राजा भोज यांच्या ‘समरांगण सूत्रधार’ ग्रंथाचा उल्लेख करत सांगितले की, भोजशाळेची रचना त्यात वर्णन केलेल्या मंदिर निर्मितीच्या मानकांशी जुळते.

मुसलमान पक्षाने सर्वेक्षण अहवालावर उपस्थित केले प्रश्न

मुसलमान पक्षाने न्यायालयात युक्तीवाद केला की, परिसर दीर्घकाळापासून कमाल मौला मशीद म्हणून वापरात आहे आणि धार्मिक स्वरूप निश्चित करण्याचा अधिकार दिवाणी न्यायालयाला आहे.

अधिवक्ता आणि काँग्रेसचे नेते सलमान खुर्शीद यांनी पुरातत्व विभागाच्या सर्वेक्षण अहवालावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत म्हटले की, सर्वेक्षणाच्या वेळी उपलब्ध करून दिलेली छायाचित्रे आणि व्हिडिओग्राफी स्पष्ट नव्हती. अयोध्या प्रकरणाच्या विपरीत भोजशाळेत कोणतीही स्थापित मूर्ती अस्तित्वात नाही.

भोजशाळेचा इतिहास

परमार वंशाचे महान राजे सम्राट भोज

या वास्तूचे मूळ ११ व्या शतकात परमार वंशाचे महान राजे सम्राट भोज (वर्ष १०००-१०५५) यांच्या कारकिर्दीत आहे. राजा भोज हे विद्येचे मोठे आश्रयदाते होते. त्यांनी धार येथे एक भव्य महाविद्यालय (संस्कृत विद्यालय) आणि सरस्वती मंदिर स्थापन केले, जिथे दूरवरून विद्यार्थी शिक्षणासाठी येत असत. १४ व्या शतकात अलाउद्दीन खिलजी आणि त्यानंतरच्या मालवाच्या मुसलमान सुलतानांनी हा परिसर कह्यात घेतला. वर्ष १४०१ मध्ये दिलावर खान गौरी याने आणि नंतर वर्ष १५१४ मध्ये महमूद शाह खिलजी याने येथील मंदिराचे रूपांतर मशिदीत करण्याचा प्रयत्न केला आणि मंदिराचे खांब व साहित्य वापरून रचना बदलली.

हे ही वाचा → भोजशाळेचा इतिहास : कालरेषा