Amarkantak Temple Donation Scam : अमरकंटक (मध्यप्रदेश) येथील नर्मदा उगम मंदिरातील सोने-चांदी गायब !

  • पोलीस ठाण्यात सोने-चांदी जमा केले जात असल्याचा न्यासाचा दावा

  • पोलिसांनी दावा फेटाळला

अमरकंटक येथील नर्मदा उगम मंदिर

शहडोल (मध्यप्रदेश) – अमरकंटक येथील नर्मदा नदीच्या उगम मंदिराला दानात मिळालेल्या सोने आणि चांदी यांची कोणतीही नोंद उपलब्ध नाही, असा आरोप करण्यात आला आहे. नर्मदा उगम मंदिराचे व्यवस्थापन स्थानिक नगर परिषदेकडून केले जाते; परंतु परिषदेकडे न्यासाचे नियम उपलब्ध नाहीत. मंदिर न्यासाचा दावा आहे की, देणगीत मिळालेले सोने आणि चांदी यांचे दागिने अमरकंटक पोलीस ठाण्यात जमा केले जातात आणि त्याची पावती न्यासाकडे आहे. पोलीस ठाण्याच्या अधिकार्‍यांचे म्हणणे आहे की, त्यांच्याकडे मंदिराची कोणतीही देणगी येत नाही.

१. ‘श्री नर्मदा मंदिर उगम ट्रस्ट’ची स्थापना वर्ष २००१ मध्ये झाली होती. न्यासाकडे मंदिर व्यवस्थापन, बांधकाम, दानपेट्यांमधील रक्कम आणि सोने-चांदी यांचे व्यवस्थापन करण्याचे दायित्व आहे. न्यासाकडे १० दानपेट्या आहेत. यात मुख्य मंदिर, कार्तिक स्वामी, श्रीराममंदिर, अकरा रुद्र मंदिर, उद्गम स्थळ, श्रीविष्णु मंदिर आणि माईच्या बागेतील दानपेट्या यांचा समावेश आहे. मंदिर व्यवस्थापनाने दिलेल्या माहितीनुसार न्यासाच्या खात्यात १ कोटी ४१ लाख रुपये जमा आहेत. वर्ष २००१ पासून आतापर्यंत दानात मिळालेल्या सोने-चांदी यांची संपूर्ण नोंद उपलब्ध नाहीत.

२. वर्ष २०२१ पासून व्यवस्था सांभाळणारे कर्मचारी गणेश पाठक यांच्या मते, त्यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर सूची सिद्ध केली; परंतु जुन्या नोंदवहीतील नोंदी स्पष्ट नाहीत. त्यामुळे मंदिरातील एकूण दागिन्यांची संख्या आणि तपशील स्पष्ट नाही. अयोध्येतील श्रीराममंदिर चोरी प्रकरणानंतर समितीने नवीन दागिन्यांची छायाचित्रांसह नोंदणी चालू केली; परंतु जुन्या नोंदी अजूनही अपूर्ण आहेत.

३. या मंदिराचे दागिने पोलीस ठाण्यात जमा केले जातात. ही व्यवस्था कधी आणि कोणत्या आधारावर चालू झाली, याची माहिती न्यासाचे कोषाध्यक्ष चैन सिंह परस्ते यांना नाही. त्यांनी मान्य केले की, सोने-चांदी यांच्या एकूण नोंदीची स्पष्ट माहिती त्यांच्याकडे नाही. दागिने कधी आणि कुणाच्या उपस्थितीत पोलिस ठाण्यात पाठवले जातात ?, याची प्रक्रियादेखील नोंदींमध्ये नाही.

दानपेटी उघडणारे आणि स्वाक्षरी करणारे यांच्यात भेद !

दानपेटी उघडण्यासाठी बोलावलेले काही सदस्य मोजणीच्या वेळी उपस्थित नसतात, तर नंतर नोंदवहीत इतर लोकांच्या स्वाक्षर्‍या घेतल्या जातात. पुजारी दुर्गेश द्विवेदी यांनी आरोप केला आहे की, नोंदवहीतील स्वाक्षरी प्रक्रियेत अनियमितता आहे. अनेक प्रकरणांमध्ये बनावट स्वाक्षर्‍या किंवा नंतर स्वाक्षर्‍या घेतल्या जातात. यामुळे दान रकमेच्या मोजणीच्या पारदर्शकतेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण होते. दान रक्कम आणि दागिन्यांच्या नोंदी असलेल्या नोंदवहीमध्ये अनेक ठिकाणी काटछाट आणि ‘व्हाईटनर’चा (लिखाण खोडण्यासाठी वापरला जाणारा पांढरा रंग) वापर दिसतो. काही नोंदींमध्ये आधी नोंदवलेली आकडेवारी पुसून नवीन आकडेवारी लिहिण्यात आली आहे. यामुळे नोंदींच्या विश्वासार्हतेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण होते. दस्तऐवजांनुसार दागिन्यांच्या वजनात आणि नोंदींमध्येही विसंगती आहेत.

संपादकीय भूमिका

मंदिरांची ही स्थिती हिंदूंना लज्जास्पद !