पुणे शहरात १९ जुलैला ‘श्री जगन्नाथ रथयात्रा महोत्सव’ !

‘आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघा’चा (इस्कॉन) उपक्रम

डावीकडून प्रसाद कारखानीस, बोलतांना जनार्दन चितोडे, संजय भोसले

पुणे, १५ जुलै (वार्ता.) – ओडिशातील श्रीक्षेत्र जगन्नाथपुरी येथे भगवान जगन्नाथ, बलराम आणि सुभद्रा यांचा रथोत्सव मोठ्या भक्तीभावाने साजरा होतो. तोच रथोत्सव सर्वांना आपल्या गावातच पहाता यावा, या हेतूने ‘आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघा’च्या (‘इस्कॉन’च्या) वतीने पुणे शहरात १९ जुलै या दिवशी दुपारी १ वाजता ‘सर परशुरामभाऊ महाविद्यालया’च्या प्रांगणातून ‘रथोत्सवा’ला प्रारंभ होत आहे. कात्रज-कोंढवा रस्त्यावरील मंदिरातील भगवान जगन्नाथ, बलराम आणि सुभद्रा यांना दर्शनासाठी रथावर विराजमान केले जाते. अशा स्वरूपाची रथयात्रा १८० देशांमध्ये साजरी होते, अशी माहिती ‘इस्कॉन मंदिरा’चे प्रवक्ते जनार्दन चितोडे यांनी १४ जुलै या दिवशी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

या रथयात्रेचे उद्घाटन ‘इस्कॉन’चे संन्यासी प.पू. लोकनाथ स्वामी, मंदिराचे अध्यक्ष राधेश्याम प्रभु, केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री श्री. मुरलीधर मोहोळ, राज्यसभेच्या खासदार प्रा. डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री श्री. चंद्रकांत पाटील, तसेच आमदार, नगरसेवक यांच्या उपस्थित होणार असल्याचे मंदिराचे उपाध्यक्ष श्री. संजय भोसले यांनी सांगितले.

या रथयात्रेत कारंजे आणि हाईड्रोलिक हत्ती हे विशेष आकर्षण असेल. रथाची उंची २० फूट असून फुलांसह रंगीबेरंगी कापडांनी सजावट केली जाणार आहे. रथयात्रेनंतर भगवंतांना ५६ भोगांचा नैवेद्य अर्पण करून आरती होईल. रथयात्रेच्या प्रारंभी २० सहस्र भक्तांना प्रसाद वाटप यात्रा मार्गांवरील भाविकांना १ लाख प्रसादाच्या पाकिटांचे वितरण करण्यात येणार आहे, असेही चितोडे यांनी सांगितले.

रथयात्रेला प्रारंभ स.प. महाविद्यालयाच्या प्रांगणातून होऊन अभिनव महाविद्यालय, शनिवार चौक, लक्ष्मी रस्ता, ओंकारेश्वर मंदिर, जंगली महाराज रस्ता, टिळक रस्ता मार्गे पुन्हा स.प. महाविद्यालयात येईल.