‘चैत्र कृष्ण तृतीया (१६.४.२०२५) या दिवशी श्रीमती संध्या बधाले यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या मुलीच्या लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्यामध्ये जाणवलेले पालट येथे दिले आहेत.

श्रीमती संध्या बधाले यांना ५१ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !
१. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावर दृढ श्रद्धा असणे
‘माझ्या आईचे मणक्याचे शस्त्रकर्म करायचे ठरल्यावर मी तिला विचारले, ‘‘तुला शस्त्रकर्माची भीती वाटते का ? किंवा तुझ्या मनात अन्य काही विचार आहेत का ?’’ तेव्हा ती म्हणाली, ‘‘प.पू. गुरुमाऊली (परात्पर गुरु डॉ. आठवले) माझ्या समवेत आहेत. त्यांना अपेक्षित असेच होईल.’’
२. सनातनच्या तीनही गुरूंप्रती भाव !
आईच्या मनात सनातनच्या तीनही गुरूंप्रती (परात्पर गुरु डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या प्रती) पुष्कळ भाव आहे. आई रुग्णाईत असतांना एकदा तिला सूक्ष्मातून परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे दर्शन झाले. तिला भक्तीसत्संगाच्या माध्यमातून श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे दर्शन झाले. एकदा तिला एका साधकाने श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी दिलेला प्रसाद दिला. तेव्हा प्रसादाच्या माध्यमातून त्यांचे दर्शन झाले. त्यामुळे तिची पुष्कळ भावजागृती होत होती. तिला प्रत्येक वेळी ‘श्री गुरूंचे आपल्याकडे लक्ष असते’, याची प्रचीती येत होती.
३. साधनेचे प्रयत्न गांभीर्याने करणे
अ. आई या कालावधीत नामजपादी उपाय आणि भावजागृतीचे प्रयत्न करत असे अन् श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या वाणीतील सत्संग ऐकत असे. ती शस्त्रकर्म होण्याच्या आधी आणि नंतरही नामजपादी उपाय पूर्ण करत होती. त्यामुळे ‘तिला परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी ऊर्जा मिळत आहे’, असे मला वाटले.
आ. त्या कालावधीत तिच्या मनात जराही नकारात्मक विचार नव्हते. ती साधनेचे प्रयत्न करून परिस्थितीला सामोरे जाण्याचा प्रयत्न करत होती.
इ. आई श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या वाणीतील सत्संग भ्रमणभाषवर ऐकत होती आणि त्यांनी भक्तीसत्संगात सांगितल्यानुसार प्रयत्न करत होती.
४. आनंदी असणे
ती साधनेचे प्रयत्न करत असल्याने तिच्या चेहर्यावर ताण किंवा भीती जाणवत नव्हती. ‘तिच्याभोवती श्री गुरूंचे संरक्षककवच असल्यामुळे ती आनंदी आहे’, असे मला वाटले.
५. आईमध्ये जाणवलेले पालट
अ. आई साधनेचे प्रयत्न गांभीर्याने करते.
आ. पूर्वी आईला कुटुंबियांची काळजी वाटत असे; मात्र आता तिच्या मनात ‘श्री गुरु माझ्या कुटुंबाची काळजीच घेतीलच. ज्या वेळी जे आवश्यक असेल, ते गुरुदेव देतील’, असे विचार असतात. त्यामुळे तिची कुटुंबियांविषयीची काळजी न्यून झाली आहे.
इ. आता आईला परिस्थिती स्वीकारता येते आणि ती आनंदी असते.
ई. पूर्वी आध्यात्मिक त्रासामुळे तिच्या मनात नकारात्मक विचार असायचे. आता ती सकारात्मक राहून गुरुदेवांना अपेक्षित अशी कृती करण्याचा प्रयत्न करते.
उ. पूर्वी आई मनातील विचार कुणाला सांगत नसे. आता तिच्या मनात एखादा विचार आल्यास ती संबंधित साधकाला सांगते आणि ‘या वेळी मी कसे वागणे अपेक्षित आहे ?’, असे त्याला मनमोकळेपणाने विचारते.
ऊ. आई सर्वांशीच सहजतने बोलते. ती तिच्या दोन्ही सुनांशी सहजतेने वागते. ती त्यांच्यामधील गुणांचे कौतुकही करते. ती सुना सांगतील त्याप्रमाणे साधनेचे प्रयत्न करते. ती सुनांना सांगते, ‘‘तुम्ही माझ्या मुलीप्रमाणेच आहात.’’
ए. पूर्वी आईचे अक्षर चांगले नव्हते. ती रुग्णाईत असतांना चांगले अक्षर काढण्याचा प्रयत्न करत होती. आता ती टंकलेखनही करते. आता तिच्या मनात ‘अजून शिकायचे आहे’, असा विचार असतो.
ऐ. आईचा उत्साह वाढला आहे आहे. तिची स्वतःला पालटण्याची तळमळही वाढली आहे.
ओ. आईचे वय ५१ वर्षे आहे; पण तिच्याकडे पाहून तसे वाटत नाही. तिचा चेहरा आता पूर्वीपेक्षा पुष्कळ उजळ झाला आहे. प.पू. गुरुमाऊलीच्या कृपेने आईचे साधनेचे प्रयत्न चांगले चालू आहेत.’
– सोनाली बधाले (श्रीमती बधाले यांची मुलगी), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२१.१.२०२५)
|