
‘साधनेतील एखादा अडथळा किंवा होत असलेला एखादा त्रास दूर होण्यासाठी साधक कोर्या कागदावर श्रीकृष्णाच्या नामजपाचे मंडल घालतात आणि त्यामध्ये आलेला अडथळा किंवा होत असलेला त्रास लिहून तो दूर होण्यासाठी प्रार्थना लिहितात. तसेच साधक एखादा संभाव्य त्रास श्रीकृष्णाच्या नामजपाच्या मंडलात लिहून ‘तो त्रास होऊ नये आणि स्वतःभोवती श्रीकृष्णाच्या नामजपाचे संरक्षककवच निर्माण व्हावे’, अशी प्रार्थना लिहितात. योजलेल्या या उपायाचा लगेच परिणाम झालेला दिसतो आणि त्रासाची तीव्रता साधारण ५० टक्क्यांनी अल्प झाल्याचे लक्षात येते.
साधकांना सूचनाकागदाच्या आकारानुसार मंडलासाठी कोणत्याही एकाच देवतेचा नामजप एक अथवा अनेक वेळा लिहू शकतो. |
याचे एक छोटेसे उदाहरण म्हणजे, ‘एकदा ८ – १० साधक रेल्वेने गोव्याला येत होते. ते पावसाळ्याचे दिवस होते. त्यांची गाडी रत्नागिरी आणि चिपळूण यांच्या मध्ये २ – ३ घंटे बंद पडली होती. त्याचे कारण समजत नव्हते. मी त्यांना नामजपाचे मंडल घालण्याचा उपाय सुचवला. त्यांनी तो उपाय केल्यावर अगदी २ – ३ मिनिटांतच त्यांची गाडी चालू झाली.’
‘साधकांनी नामजपाचे मंडल घातल्यास त्यांना या सोप्या उपायाचा इतका लाभ कसा काय होतो ?’, असा विचार केल्यावर लक्षात आले, ‘बहुतांश साधक गेली १५ ते २० वर्षे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुकृपायोगानुसार साधना करत आहेत. ते परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितल्याप्रमाणे सध्याच्या काळाला अनुकूल अशी आणि ईश्वराला अपेक्षित अशी समाज सात्त्विक बनवणारी समष्टी साधना करत आहेत. त्यांचे हे इतक्या वर्षांचे तपच झाले असल्याने त्यांच्या वाणीत आणि लिखाणात चैतन्य निर्माण झाले आहे. त्यामुळे त्यांनी लिहिलेल्या देवाच्या नामजपामुळे त्या देवाचे अस्तित्व निर्माण झाल्याने तो नामजप फलद्रूप होतो आणि साधकांना त्या नामजपाचा लाभ होतो.
साधक नामजप करत असतांनाही हीच अनुभूती घेत आहेत. त्यामुळे ते करत असलेले पंचतत्त्वांचे नामजप, उच्च देवतांचे नामजप, तसेच ‘शून्य, महाशून्य, निर्गुण आणि ॐ’, हे निर्गुण स्तराचे नामजप त्यांना सिद्ध झाल्यासारखेच आहेत.
परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांकडून देवतेचा कृपाशीर्वाद मिळवून देणारी साधना करवून घेतल्याविषयी त्यांच्याप्रती कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती थोडीच आहे !’
– सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.