पुणे येथील ‘युद्ध सेवा पदक (वाय्.एस्.एम्.)’ प्राप्त करणारे ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त) हे भारतीय सैन्यात ‘७ मराठा लाईट इन्फंट्री’त कार्यरत होते. त्यांनी भारत-चीन सीमा, भारत-पाकिस्तान सीमा आणि ईशान्य भारत येथील उग्रवाद अन् आतंकवाद विरोधी मोहिमांत सक्रीय सहभाग घेऊन त्यांचा बीमोड करण्यात महत्त्वाचा वाटा उचलला. या लेखाद्वारे त्यांची कामगिरी, त्यांना मिळालेली पदके आणि त्यांनी लिहिलेली पुस्तके यांचा परिचय करून घेणार आहोत.

१. लष्करी सेवा आणि शैक्षणिक कामगिरी
अ. ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त) यांनी संरक्षण अभ्यासात ‘मास्टर ऑफ सायन्स’ (एम.एस.सी. – पदव्युत्तर पदवी) आणि ‘मास्टर ऑफ फिलॉसॉफी’ (एम्.फिल.) ही पदवी घेतली आहे. त्यांनी जुलै १९७३ मध्ये डेहराडून येथील ‘इंडियन मिलिटरी अकादमी’ (आय.एम्.ए.) येथे त्यांच्या लष्करी कारकीर्दीचा प्रारंभ केला आणि १५ जून १९७५ या दिवशी ‘७ व्या मराठा लाईट इन्फंट्री’मध्ये अधिकारी म्हणून नियुक्त झाले.

आ. त्यांनी जम्मू-काश्मीर, पंजाब, भारत-चीन सीमा, भारत-पाकिस्तान सीमा आणि ईशान्येसह भारतातील काही सर्वांत अशांत प्रदेशांमध्ये उग्रवाद आणि आतंकवाद विरोधी कारवायांमध्ये सक्रीय सहभाग घेतला. भारत-चीन सीमेवर ‘पॅट्रोलिंक’ही (टेहळणी पथक) केले आहे. वर्ष १९७५ पासून त्यांनी भारतीय सैन्याने चालवलेल्या सर्व प्रमुख कारवायांमध्ये भाग घेतला.
२. आतंकवादविरोधी कारवायांमध्ये प्रमुख कामगिरी
अ. त्यांनी आतंकवादाच्या शिखरावर असलेल्या पूंछ आणि राजौरी या आव्हानात्मक प्रदेशात ‘ऑपरेशन रक्षक’ म्हणून राबवलेल्या मोहिमेत त्यांच्या बटालियनचे, म्हणजे ‘७ मराठा लाईट इन्फंट्री’चे नेतृत्व केले. पाकमधून जम्मू-काश्मीरमध्ये होणारी आतंकवाद्यांची घुसखोरी रोखण्यात त्यांचे योगदान महत्त्वाचे होते. त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या युनिटला ‘युनिट प्रशस्तीपत्र’ आणि १८ ‘शौर्य पुरस्कार’ मिळाले. त्यात ब्रिगेडियर महाजन यांना मिळालेल्या ‘युद्ध सेवा पदका’ (वाय्.एस्.एम्.)चा समावेश आहे.
विशेष सदर
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्यासाठी मावळे आणि शिलेदार यांनी केलेला त्याग सर्वोच्च आहे, त्याप्रमाणे आजही अनेक हिंदुत्वनिष्ठ आणि राष्ट्रप्रेमी नागरिक धर्म-राष्ट्र यांच्या रक्षणासाठी ‘शिलेदार’ म्हणून कार्य करत आहेत. त्यांची आणि त्यांच्या हिंदु धर्मरक्षणाच्या संघर्षाची माहिती करून देणार्या ‘हिंदुत्वाचे शिलेदार’ या सदराद्वारे इतरांनाही प्रेरणा मिळेल ! – संपादक
आ. भारतीय सैन्याच्या सर्वांत मोठ्या लष्करी जमवाजमवीच्या ‘ऑपरेशन पराक्रम’च्या कालावधीत, ज्यामुळे जवळजवळ पाकशी युद्ध झाले, ब्रिगेडियर महाजन यांनी सैन्याच्या हालचाली आणि प्रशासनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांच्या योगदानाला ‘आर्मी कमांडर’च्या ‘प्रशंसा पुरस्कारा’ने मान्यता देण्यात आली.
इ. नंतर ‘ऑपरेशन रक्षक’मध्ये ब्रिगेड कमांडर म्हणून त्यांनी जम्मू-काश्मीरमधील पूंछ, कृष्णा घाटी, सुरणकोट आणि राजौरी या आतंकवादग्रस्त भागातील मोहिमांचे नेतृत्व केले. त्यांच्या कमांडमध्ये सीमा सुरक्षा दलाच्या (‘बी.एस्.एफ्’च्या) २ बटालियन होत्या. एका युनिटला युनिट प्रशस्तीपत्र मिळाले. वर्ष २००६ मध्ये ‘बी.एस्.एफ्’च्या एका बटालियनला देशातील ‘सर्वोत्तम बटालियन’ म्हणून मान्यता मिळाली. त्या वर्षाचा सर्वोच्च शौर्य पुरस्कार ‘अशोक चक्र’ त्यांच्या कमांडखालील अधिकार्याला देण्यात आला.
३. मिळालेले अनेक शौर्य पुरस्कार
अ. ‘जीओसी-इन-सी सेंट्रल कमांड प्रशंसापत्र’
आ. युद्ध सेवा पदक (वाय्.एस्.एम्.)
इ. त्यांच्या कमांडच्या कालावधीत ‘७ मराठा लाईट इन्फंट्री’ला ‘लष्कर प्रमुख युनिट प्रशस्तीपत्र (Chief of Army Staff Unit Citation)’
ई. त्यांच्या कमांडच्या कालावधीत ‘जीओसी-इन-सी नॉर्थन कमांड युनिट प्रशंसापत्र’
उ. ब्रिगेड कमांडर म्हणून एका युनिटला ‘सी.ओ.ए.एस्.’ युनिट प्रशस्तीपत्र
४. ‘आर्मी वॉर कॉलेज’मध्ये प्राध्यापकाची भूमिका
फेब्रुवारी २००६ मध्ये ब्रिगेडियर महाजन यांनी ‘आर्मी वॉर कॉलेज’मधील ‘हायर कमांड विंग’च्या विद्या शाखेत ३ वर्षे उत्कृष्ट काम केले. ‘डायरेक्टिंग स्टाफ’ (कर्मचार्यांना मार्गदर्शन) म्हणून ते तिन्ही दलांतील वरिष्ठ अधिकार्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी तज्ञ व्यवस्थापन, आण्विक जैविक-रासायनिक युद्ध, काश्मीर अन् ईशान्येतील उग्रवाद, साम्यवादी विचारसरणीचा अतिरेकीपणा, आतंकवाद, सागरी घुसखोरी यांवर मार्गदर्शन केले.
नागरिकांना आवाहन

छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, बाजीराव पेशवे हे सर्व योद्धे महान होतेच; पण जोपर्यंत सर्वसामान्य माणूस देशासाठी काहीतरी करत नाही, तोपर्यंत देश महान होणार नाही. – ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त)
५. निवृत्तीनंतरचे योगदान
५ अ. शैक्षणिक आणि सल्लागार भूमिका
५ अ १. ब्रिगेडियर महाजन हे मुंबईतील ‘राष्ट्रीय स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारका’तील ‘स्ट्रॅटेजिक स्टडी सेंटर’चे (रणनैतिक अभ्यास केंद्राचे) प्रमुख आहेत.
५ अ २. ते वर्ष २०१८ ते २०२१ पर्यंत पुणे विद्यापिठात ‘स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय सुरक्षा अध्यासना’चे अध्यक्ष आणि प्राध्यापक म्हणून काम केले.
५ अ ३. ते वर्ष २०१७ ते २०१९ पर्यंत दमण आणि दीव सरकारचे ‘सुरक्षा सल्लागार’ होते.
५ आ. लेखन आणि माध्यम सहभाग
५ आ १. ते निवृत्तीनंतरही लेखनाद्वारे राष्ट्रीय सुरक्षा व्याख्यानांमध्ये योगदान देत आहेत. त्यांनी ५ सहस्रांहून अधिक लेख लिहिले आहेत, ते ‘सकाळ’, ‘लोकसत्ता’, ‘महाराष्ट्र टाइम्स’ आणि ‘सनातन प्रभात’ अशा आघाडीच्या मराठी वृत्तपत्रांत, तसेच ‘कॅस जर्नल’, ‘न्यूज भारती ऑर्गनायझर’ या इंग्रजी प्रकाशनांत प्रकाशित होतात. ते राष्ट्रीय स्तरावरील मासिकांमध्येही योगदान देतात.
५ आ २. ते ‘आयबीएन् लोकमत’, ‘झी २४ तास’, ‘एबीपी माझा’, ‘टाइम्स नाऊ’ आणि ‘मिरर नाऊ’ यांसारख्या मराठी, हिंदी अन् इंग्रजी भाषिक वृत्तवाहिन्यांवरील वादविवाद वा चर्चासत्रे यांमध्येही सहभागी होतात.
५ आ ३. ते स्वतः ऑनलाईन व्हिडिओद्वारे प्रेक्षकांपर्यंत पोचतात.
अ. फेसबुकवरील लोकप्रिय ‘ई-लेक्चर’ मालिका समाविष्ट आहे, ज्याला ५ दशलक्षहून अधिक ‘व्ह्यूज’ मिळाले आहेत.
आ. त्यांचे यू ट्यूब चॅनेल https://m.youtube.com/@hemantmahajan12153/videos%E2%80%99 या लिंकवर असून त्याला २ लाख ३५ सहस्रांहून अधिक ‘व्ह्यूज’ मिळत आहेत.
इ. त्यांचा https://brighemantmahajan.blogspot.com या ‘ब्लॉग’ला १० लाख व्ह्यूज मिळत आहेत.
ब्रिगेडियर महाजन (निवृत्त) यांनी राष्ट्रीय सुरक्षेवर लिहिलेली पुस्तके
१. ‘नक्षलवादाचे आव्हान : चीनचे भारताशी छुपे युद्ध’, प्रकाशक : नचिकेत प्रकाशन, नागपूर.
२. ‘आव्हान चिनी ड्रॅगनचे’, प्रकाशक : नचिकेत प्रकाशन, नागपूर.
३. ‘Proxy War In Jammu Kashmir : A Winning Strategy-2014’हा पुस्तकाच्या रूपात प्रकाशित झालेला संशोधन प्रकल्प ‘थिंक टँक’साठी. (बुद्धीवंतांच्या गटासाठी)
४. ‘आव्हान जम्मू-काश्मीरमधील छुप्या युद्धाचे’, प्रकाशक : माधवी प्रकाशन, पुणे.
५. ‘बांगलादेशी घुसखोरी भारताच्या सुरक्षेचे सर्वांत मोठे सुरक्षा आव्हान. वर्ष २०२९ पूर्वी आसाम, बंगालच्या मुख्यमंत्रीपदी दोन बांगलादेशी ? (ऑक्टोबर २०१५, २०१६)’, प्रकाशक : भारतीय विचार साधना, पुणे.