विनोदाची विकृती !

विनोद म्हणजे निखळ हास्य, आनंद; परंतु विनोदाची विकृती म्हणजे ‘स्टँडअप कॉमेडी (उभे राहून करायचा एकपात्री विनोदी कार्यक्रम)’ असे म्हणायची वेळ आली आहे ! मनोरंजनाच्या प्रत्येक क्षेत्रात विदेशी अनुकरण होत असल्याने भारतामध्येही काही वर्षांपासून ‘स्टँडअप कॉमेडी’ हा प्रकार वाढलेला दिसतो. सध्या मात्र या मनोरंजनाच्या कार्यक्रमात खालच्या स्तराला जाऊन विद्वेषी टीका करून विनोद करण्याचे प्रमाण पुष्कळ वाढले आहे. त्यामुळे समाजमन दूषित आणि कलुषित होते.

या एकपात्री विनोदी कार्यक्रमाच्या माध्यमातून मुनव्वर फारुकी यांच्यापासून ते समय रैना आणि रणवीर अलाहाबादिया, तसेच कुणाल कामरा हे सर्वच जण समाजात घाणेरडे, विकृत विचार पसरवत आहेत. ‘अश्लीलता म्हणजे विनोद’, ‘स्वैराचार म्हणजे विनोद’, अशी विनोदाची प्रतिमा बनवणारे हे कलाकार आताची पिढी एकप्रकारे नासवत आहेत.

बरं, यांच्या विनोदाला काही दर्जा किंवा संस्कृती आहे, असेही नाही. यांचा विनोद म्हणजे द्वेषाची गरळओक, यांचा विनोद म्हणजे हिंदु देवतांचे विडंबन, म्हणजे एकप्रकारे विनोदाच्या नावे हिंदुद्वेष !

नुकतेच विनोदी कलाकार कुणाल कामरा यांनी राजकीय शेरेबाजी आणि विडंबनात्मक गाणे केल्याने त्यांच्या विरोधात महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापले होते. कुणाल कामरा यांच्या बाजूने आता विनोदी कलाकार अभिजीत गांगुली हेही पुढे आले आहेत. ‘भारतात आता विनोद कसा करायचा ?’, असा प्रश्न त्यांनी केला आहे. ते म्हणाले, ‘‘गर्दीसाठी विनोद केला, तर बुद्धीवादी म्हणतात की ‘खरा विनोद’ नाही. पत्नीवर विनोद केला, तर लोक ‘लैंगिकतावादी’ म्हणतात. आई-वडिलांवर विनोद केला, तर ‘संस्कारहीन’ म्हणतात. मग आता ‘हत्ती आणि मुंग्या’ यांनी परत यावे.’’

यावरून लक्षात येते की, संस्कृती, साहित्य याचा अवमान करतात, त्यांच्या बाजूनेही बोलणारे पुढे येऊ लागले आहेत. विनोदी कलाकारांना कुणीही काहीही बोलले, तरी याचा अर्थ असा होत नाही की, त्यांनी देव, धर्म, संस्कृती यांवर टीका करावी. यातून पुढील पिढीवर कुसंस्कार तर होणारच. याखेरीज त्या कलाकारालाही पाप लागणार आहे. हे विनोदी कलाकार आणि त्यांचे प्रेक्षक ज्या पाश्चात्त्यांचे मोठ्या प्रमाणात अनुकरण करतात, तेच पाश्चात्त्य आज भारतीय संस्कृतीनेच प्रभावित होत आहेत. ज्या संस्कृतीवर आपण पोसलो, जिच्यामुळे आज आपण उभे आहोत, तिच्यावरच विनोद करून पैसे कमावणे, हे कितपत योग्य आहे ? अशा कार्यक्रमांमुळे होणारी समाजाची हानी पहाता या ‘स्टँडअप’चा आता ‘एंड अप’ (शेवट) झाला पाहिजे, असेच वाटते !

– श्री. वैभव आफळे, गोवा.