अमेरिकेत रहाणार्‍या भारतीय महाराष्ट्रीयांच्या हृदयाचा ठाव घेणारी प्रार्थना !

१९८० या वर्षी मी प्रथम अमेरिकेला गेलो. तेथे माझे अनेक कार्यक्रम झाले. गणेशोत्सवात न्यूयॉर्क येथे एक व्याख्यान ठरले. त्या वेळी स्वदेश आणि स्वधर्म प्रेमी मंडळींनी परमेश्वराला कशी प्रार्थना करावी ?, ते मनात येऊन सहज एक प्रार्थना सिद्ध झाली. तिच्या प्रती काढल्या आणि कार्यक्रमाच्या ठिकाणी त्या वाटल्या. याखेरीज मी स्वतः श्रोत्यांना चाल समजावून दिली आणि तिचे सामुदायिक पठण केले. उपस्थितांना ती प्रार्थना पुष्कळ आवडली. त्यानंतर अमेरिकेतील माझ्या अनेक कार्यक्रमात ती म्हटली गेली. पुढे काही काळ मराठी कार्यक्रमांत ती प्रार्थना राष्ट्रगीताप्रमाणे म्हटली जात असे. अजूनही असेल कुणास ठाऊक; पण ती रचना परदेशी रहाणार्‍या भारतीय महाराष्ट्रीयांच्या हृदयाचा ठाव घेणारी आहे, यात शंका नाही.

भारताचार्य पू. प्रा. सु.ग. शेवडे

हे भगवंता, दयासागरा, जगन्नायका जगदीशा ।
माय पिता अन् सगासोयरा स्वामीसखा तू परमेशा ।।

इथे विदेशी आम्ही रहातो, स्मरतो तुजला नित्य मनी ।
कृपा तुझी भगवंता असू दे, तूच आम्हा त्राता विजनी ।। १ ।।

राखी आमुची स्वधर्मनिष्ठा पापमुक्त मम मन असू दे ।
परलक्ष्मी परदारा यांची नको वासना उद्भवू दे ।।

परदेशी राहुनी आम्हाला मातृभूमीचे प्रेम असो ।
सेवा करण्या मातृभूमीची इच्छा वित्ती नित्य वसो ।। २ ।।

माय मराठी भाषा आमुची जिचे लाभले बाळकडू ।
तिच्या भाषणी श्रवणीं न करो कुणी मुख ते बाळ कडू ।।

अमृताशीही पैजा जिंके अशी मराठी मम वाणी ।
पिढयापिढ्यांच्या मुखात नांदो गोड मधुर सात्त्विक गाणी ।। ३ ।।

दे प्रवृत्ती सणवारांची स्मृती राखूनी आचरण्या ।
मातृपितृ, गुरु, श्रेष्ठ संत याविषयी मनी आदर धरण्या ।।

राष्ट्र आपले स्वतंत्र करण्या ज्यांनी आत्मार्पण केले ।
क्रांतीवीर ते हृदयी आमुच्या नित्य असावे मान्य भले ।। ४ ।।

देह जरी मम दूर राहिला मन परि ते मागे परते ।
जननीला अन् जन्मभूमीला सोडूनी येथे ना गमते ।।

अशीच वृत्ती राखी देवा माझी अन् मम बाळांची ।
लक्ष तुझे भगवंत असू दे क्षमा करी अपराधांची ।। ५ ।।

– भारताचार्य पू. (प्रा.) सु.ग. शेवडे, मुंबई.