साधना केल्याने आनंद अनुभवणार्‍या फोंडा, गोवा येथील सौ. सविता तिवारी (वय ७४ वर्षे) !

१. यजमानांनी साधनेला विरोध केला; म्हणून मुलीने घर सोडून आश्रमात जाणे 

सौ. सविता तिवारी

‘वर्ष २००० मध्ये ‘सनातन संस्था साधना म्हणून काय सांगत आहे ?’, हे जाणून न घेता माझ्या यजमानांनी (आताचे पू. सत्यनारायण तिवारी, सनातनचे १२४ वे (व्यष्टी) संत यांनी) माझी मोठी मुलगी होमिओपॅथी वैद्या (सुश्री) आरती तिवारी हिला साधना करण्यासाठी विरोध केला. त्यामुळे तिने आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करण्यास आरंभ केला.

२. ‘घरी आलेली मुलगी पुन्हा साधना करण्यासाठी आश्रमात गेली, तर मी घर सोडून जाईन’ अशी यजमानांनी धमकी देणे 

होमिओपॅथी वैद्या सुश्री (कु.) आरती तिवारी

त्यानंतर मुलीला समजावून सांगितल्यावर मुलगी घरी आली. तिने काही मास घरी राहून साधना केली. यजमानांनी पुन्हा तिच्या साधनेला विरोध करणे चालू केले. तेव्हा त्यांनी मला रागावून सांगितले, ‘‘ही जर सेवेला गेली, साधनेसाठी पुन्हा आश्रमात गेली, तर मी घर सोडून निघून जाईन.’’ तेव्हा मी त्यांना म्हणाले, ‘‘तुम्ही घर सोडून गेलात तरी चालेल. मी आरतीला साधनेसाठी साहाय्य करणार आणि तीही सेवा अन् साधना करणार.’’

३. मुलीने निग्रहाने साधना चालू ठेवल्यामुळे कुटुंबियांचे आध्यात्मिक त्रास टप्प्याटप्प्याने उणावणे 

त्यानंतर यजमान काही बोलले नाहीत. ‘यजमानांना आणि आमच्या कुटुंबातील सर्वांनाच तीव्र स्वरूपाचा आध्यात्मिक त्रास आहे’, हे गुरुकृपेने आमच्या लक्षात आले. माझी मुलगी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार साधना करू लागल्यापासून आमच्या कुटुंबातील व्यक्तींना असलेला आध्यात्मिक त्रास टप्प्याटप्प्याने उणावण्यास आरंभ झाला.

४. घरातील सर्व जण साधना करू लागल्यामुळे कुटुंबातील व्यक्तींचा आध्यात्मिक त्रास ९० टक्के उणावणे 

आज अनुमाने २० ते २२ वर्षे झाली, आमच्या कुटुंबातील व्यक्तींचा त्रास ९० टक्के इतक्या प्रमाणात उणावला आहे. आता घरातील सर्व जण सेवा आणि साधना करत आहेत. आता आमच्यात भांडणे होत नाहीत. आमचे आपापसांत असलेले वैचारिक मतभेद आणि एकमेकांच्या मनात एकमेकांबद्दल असलेले अपसमज उणावले आहेत. आम्ही कुटुंबीय एकमेकांना स्वभावदोष आणि अहं यांसहित स्वीकारून समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्ही एकमेकांशी सेवा-साधना यांविषयी बोलतो.

५. यजमान साधना करून २३ वर्षांनी संतपदाला पोचणे आणि नातवंडे दैवी बालके म्हणून जन्माला येणे 

पूर्वी मुलीच्या साधनेला विरोध करणारे माझे यजमान (पू. सत्यनारायण तिवारी, वय ७५ वर्षे) साधना करून २३ वर्षांनी संतपदाला पोचले. माझ्या मधल्या मुलाच्या दोन्ही मुली आणि छोट्या मुलीची दोन्ही मुले दैवी बालके आहेत.

६.‘आपण गुरूंवर (देवावर) सर्व भार सोपवला, तर ते आपली काळजी घेऊन आपल्याला आनंद देतात’, याची प्रचीती येणे 

आता आयुष्यात कोणताही संघर्षाचा प्रसंग उद्भवला किंवा एखाद्या गोष्टीचा ताण आला, तरी ‘श्री गुरु मार्ग दाखवतील, त्यातून आपल्याला बाहेर काढतील’, याची मला निश्चिती वाटते. ‘आपण गुरुदेवांवर (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर), देवावर सर्व भार सोपवला, तर देव काळजी घेतोच. गुरुदेवांचे केवळ बोट पकडले, तरी ते आपली सर्वतः काळजी घेतात’, हे मी पदोपदी अनुभवत आहे. ‘आपण श्री गुरूंना सर्वस्व दिले, तर तेही आपल्याला आनंदात रहायला शिकवतात’, याची मी अनेक वेळा प्रचीती घेतली आहे.

असे परात्पर गुरु आम्हाला लाभले, याबद्दल मी त्यांच्या चरणी अनंत कोटी कृतज्ञता व्यक्त करते.’

– सौ. सविता तिवारी (वय ७४ वर्षे), नागेशी, फोंडा, गोवा. (१४.३.२०२५)

  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक