‘११ एप्रिल २०२५ या दिवशी आपण डॉ. दुर्गेश सामंत यांनी पूर्णवेळ साधना करायचा निर्णय घेतल्यावर नातेवाईक आणि मित्र यांनी त्यांना केलेले साहाय्य हा भाग पाहिला. आज मुंबई सेवाकेंद्रात आल्यानंतर झालेल्या घडामोडी, डॉ. (सौ.) नंदिनी सामंत यांनी पूर्णवेळ साधना करण्यास आरंभ करणे आणि दैनिक ‘सनातन प्रभात’ चालू करण्याचा लोकोत्तर निर्णय घेणारे प.पू. डॉक्टर यांविषयीची माहिती येथे दिली आहे. (भाग ३)
या लेखाचा यापूर्वीचा भाग वाचण्याकरीता येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/901509.html

आधुनिक वैद्य (डॉ.) दुर्गेश सामंत यांचा साधनाप्रवास
५. नातेवाईक आणि मित्र यांचे लाभलेले साहाय्य !

५ आ ४. एका नातेवाइकाने कोल्हापुरातील एका संतांकडे जाऊन साधकाने पूर्णवेळ साधना करण्याविषयी काळजी व्यक्त करणे : सांगण्यासारखी वैशिष्ट्यपूर्ण घटना म्हणजे ‘मी पूर्णवेळ साधना करणार’, हे समजल्यानंतर आमचे एक नातेवाईक कोल्हापुरातील एका संतांकडे गेले आणि त्यांनी त्या संतांकडे काळजी व्यक्त केली. त्या संतांनी त्यांचे सर्व प्रकारे समाधान केले. पुष्कळ वर्षांनंतर ते संत एका कार्यक्रमाच्या प्रसंगी मला भेटले, तेव्हा मला हे त्यांच्याकडून समजले.
मला हे चांगले अनुभव केवळ श्री गुरूंच्या कृपेने आले. असे काही चांगले अनुभव सध्याच्या काळातही येऊ शकतात, हे कळावे यासाठी हे लिहावेसे वाटले. या अनुभवांमुळे माझे मन सकारात्मक रहाण्यास साहाय्य झाले.
६. मुंबई सेवाकेंद्रात आल्यानंतर झालेल्या घडामोडी
अ. मी सांगलीहून येतांना ‘८ – १० दिवसांत घरी परत येईन’, असे म्हणालो होतो; परंतु दीड – दोन मास उलटल्यानंतरही माझे मुंबईतील वास्तव्य वाढतच होते. या संपूर्ण काळात गुरुकृपेने माझे मन स्थिर होते आणि मी एकाग्रतेने सेवा शिकत होतो.
आ. या कालावधीत माझ्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आला. देवाच्या कृपेने सांगलीतील माझ्या डॉक्टर मित्रांनी परिस्थिती निभावून नेली. तेव्हा मी ‘१० ते १२ दिवसांनी मुंबईत परत येईन’, असे सांगून लगेच सांगलीला गेलो.
इ. सांगलीला जातांना मी प.पू. डॉक्टरांचा निरोप घेण्यासाठी गेलो होतो. तेव्हा मी त्यांना विचारले, ‘‘सर्व ठीक आहे. मात्र अंतःकरणातील अनामिक भय जात नाही.’’ तेव्हा प.पू. डॉक्टर म्हणाले, ‘‘द्वैत असेपर्यंत ते राहील.’’
ई. मी सांगलीत १० ते १२ दिवस होतो. तेव्हा माझ्या व्यवसाय बंद करण्याच्या सूत्रावर मला कुणीही काही विचारले नाही.
उ. डॉ. (सौ.) नंदिनी सामंत यांचा पूर्णवेळ साधनेस आरंभ होणे : वडिलांना भेटून मुंबईत परतल्यानंतर प.पू. डॉक्टरांनी ‘डॉ. (सौ.) नंदिनी साधना करणार का ?’ हे विचारायला सांगितले. मी तिला तसे दूरभाषवर विचारले. तेव्हा तिने लगेच होकार दिला.
मी आणि सौ. नंदिनी यांनी पूर्णवेळ साधना करणे आणि त्यातील सर्व अडथळे सहजतेने दूर होणे, ही किमया केवळ प.पू. डॉक्टरांच्या कृपेनेच झाली. ही आमची मोठी अनुभूती आहे.’
७. दैनिक ‘सनातन प्रभात’ चालू करण्याचा लोकोत्तर निर्णय घेणारे प.पू. डॉक्टर !
७ अ. प.पू. डॉक्टर यांनी साप्ताहिक ‘सनातन प्रभात’ चालू झाल्यानंतर अवघ्या काही मासांतच दैनिक ‘सनातन प्रभात’ चालू करण्याचा विस्मयकारक निर्णय घेणे : मी ३ मास सेवाकेंद्रात रहात असतांनाच प.पू. डॉक्टरांनी दैनिक ‘सनातन प्रभात’ चालू करायचा निर्णय घोषित केला. मला याचे आश्चर्य वाटले. साप्ताहिक चालू होऊन अगदी काही मासच झाले होते. त्याचे अहवालही नेटके आणि वेळेवर येत नव्हते. दैनिक चालवण्यासाठी कार्यकुशलता असणारे कुणीच साधक नव्हते. साप्ताहिकाचे संपादन (संपूर्ण कार्य पहाणारा) सांभाळणारा एकही स्वतंत्र साधक नव्हता, तर दैनिकासाठी कोण असणार ? त्यातही ‘साप्ताहिक’ आणि ‘दैनिक’ या दोन्ही गोष्टी सर्वच स्तरांवर भिन्न आहेत. आपल्याकडे दैनिकाच्या क्षेत्रातील अनुभवी सल्लागार कुणीच नव्हता. ‘भारतात एखाद्या आध्यात्मिक संस्थेने दैनिक चालवले आहे’, असे उदाहरण मला तरी ठाऊक नव्हते. या स्थितीत दैनिक चालू करण्याचा निर्णय प.पू. डॉक्टरांसारखे केवळ विशिष्ट ध्येयवादी आणि लोकोत्तर संतच घेऊ शकतात.
७ आ. दैनिकाच्या संदर्भातील अत्यावश्यक साधनांविषयी अनभिज्ञ असलेले साधक !

७ आ १. मराठीत लिहिण्या-वाचण्याची सवय न रहाणे : ऑक्टोबर १९९८ मध्ये प.पू. डॉक्टर यांनी मला गोवा येथील दैनिक ‘सनातन प्रभात’च्या कार्यालयात जाण्यास सांगितले. ऑक्टोबर मासाच्या पहिल्या आठवड्यात मी दैनिक ‘सनातन प्रभात’ चालू करण्यासाठी गोव्याला जायचे ठरले. तेव्हा मागील १० ते १५ वर्षे माझा मराठी भाषेशी संबंध तुटला होता. त्यामुळे मला मराठी लिहिण्या-वाचण्याची सवय राहिली नव्हती.
७ आ २. संगणकाचे ज्ञान नसणे : मी मुंबईत प्रथमच ‘संगणक कसा असतो ?’, हे पाहिले. ‘इ-मेल’ ही तर माझ्यासाठी एक अद्भुत आणि अतर्क्य गोष्ट होती. गोव्यात जाऊन दैनिक चालू करण्यासाठी लागणार्या अत्यावश्यक साधनांचा मला परिचयही नव्हता, तरीही प.पू. डॉक्टरांनी माझ्यावर विश्वास टाकला.
७ इ. प.पू. डॉक्टरांनी स्वतःच्या आचरणाने विशिष्ट उद्देशाने अहर्निश आणि योग्य प्रकारे कार्यरत रहायला शिकवणे : प.पू. डॉक्टर यांनी माझी कठीण परिस्थितीत टिकून रहाण्याची जिद्द बळकट केली आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ‘विशिष्ट उद्देशाने अहर्निश आणि तेही योग्य प्रकारे कार्यरत कसे रहायचे ?’, हे त्यांनी मला स्वतःच्या आचरणातून शिकवले. सेवाकेंद्रात असतांना त्यांच्याकडून हे शिकणे, माझ्यासाठी सर्वांत अधिक महत्त्वाचे होते.’
७ ई. प.पू. डॉक्टर यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’चे कार्य गोव्यात चालू करण्यास सांगणे आणि अल्पावधीत डॉ. (सौ.) वेरेकर यांचा पणजी येथील बंगला संस्थेच्या कार्यासाठी मिळणे : ऑगस्ट १९९८ च्या शेवटी प.पू. डॉक्टर म्हणाले, ‘‘सांगली जिल्ह्यात हवी तशी जागा मिळत नाही आणि गोव्यात साधकसंख्या पुष्कळ आहे, तर सगळ्यांनीच मुंबई सोडून दैनिक ‘सनातन प्रभात’ आणि अन्य कार्य गोव्याला चालू केले, तर बरे होईल.’’ तेव्हा आम्ही गोव्यात कार्यासाठी जागा शोधू लागलो. अल्पावधीत डॉ. (सौ.) वेरेकर यांनी त्यांचा पणजी येथील बंगला या कार्यासाठी देऊ केला. तेव्हा जागेचा शोध संपला.
७ उ. घरातील सर्व सामान विनासायास गोव्याला स्थलांतरित होणे : ‘आम्ही आता सांगलीला कधीच परत जाणार नाही आणि गोव्यात स्थलांतरित होणार’, हे निश्चित झाले. सप्टेंबर १९९८ च्या आरंभी सौ. नंदिनीने सांगलीतील साधकांच्या साहाय्याने आमचे सांगलीच्या घरातील सामान एक साधक (कै.) देसाई यांच्या ट्रकने गोव्याला आणले. प.पू. डॉक्टरांच्या कृपेने मला प्रत्यक्ष सांगलीला जाऊन काही करावे लागले नाही. सर्वकाही विनासायास घडून आले.
८. सेवाकेंद्रात प.पू. डॉक्टरांच्या सहवासात असतांना शिकायला मिळालेली अनमोल सूत्रे !
८ अ. प.पू. डॉक्टर यांच्याकडून साप्ताहिक ‘सनातन प्रभात’च्या संदर्भात शिकायला मिळालेली सूत्रे ! : ‘मी सेवाकेंद्रात साप्ताहिक ‘सनातन प्रभात’साठी आलेले कच्चे लिखाण गोळा करणे, त्याची निवड करणे आणि त्यावर पुढील संस्करण करणे’, हे शिकण्यासाठी आलो होतो. पहिल्या काही दिवसांतच हे सर्व थोडेफार शिकून झाले. त्यानंतर प.पू. डॉक्टर मला अन्य सेवाही सांगू लागले. त्यामुळे मी त्या सेवा समजून घेऊ लागलो. हीसुद्धा प.पू. डॉक्टरांचीच कृपा !
८ अ १. कच्चे लिखाण समजून घेणे : साप्ताहिकाच्या संदर्भात आलेल्या लिखाणावर संस्करण करण्यास शिकत असतांना मला ‘प.पू. डॉक्टर लिखाण कशा रीतीने हाताळतात ?’, हे शिकायला मिळाले. आलेले लिखाण विविध प्रकारची पेने वापरून, विविध हस्ताक्षरांमध्ये आणि विविध आकारांतील कागदांवर लिहून आलेले असते. त्यांतील काही जणांचे हस्ताक्षर समजायला कठीण जायचे.
८ अ २. प.पू. डॉक्टरांनी कच्चे लिखाण तटस्थपणे पाहून त्यावर प्राथमिक वर्गीकरणाच्या नोंदी करणे आणि सर्व कागद योग्य प्रकारे लावून ठेवण्यास शिकवणे : प.पू. डॉक्टर यांच्याकडे साप्ताहिकासाठी आलेले कच्चे लिखाण प.पू. डॉक्टर स्वतः तटस्थपणे पहात असत. त्यात काही चुकीचे आढळले, तरी ते त्याकडे सहजतेने पाहून पडताळत असत. त्यावर ते प्राथमिक वर्गीकरणाच्या नोंदी करत. ते सर्व कागद योग्य प्रकारे लावून ठेवत. त्यांनी इतरांनाही तशीच सवय लावली होती.
(क्रमशः)
– आधुनिक वैद्य (डॉ.) दुर्गेश सामंत (वय ६४ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१५.२.२०२४)
याच्या नंतरचा लेख वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/902629.html
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |