गोवा येथील पूर्वीच्या काळचा विवाह समारंभ आणि सध्या त्याचे पालटलेले स्वरूप !

विवाह हे पवित्र बंधन आहे. सनातन हिंदु धर्मात जिवावर केलेल्या १६ संस्कारांपैकी विवाह संस्कार महत्त्वपूर्ण विधी आहे. त्याचे पावित्र्य टिकवून ठेवणे हे धर्मकार्यच ! याचा लाभ वधू-वर आणि समाज अशा दोघांनाही होतो. लेख लिहिण्याचा उद्देश एकच आहे, तो, म्हणजे विवाह संस्कार धार्मिक रितीने व्हावेत. त्यात अनाचार होऊ नये, म्हणजे वधू-वर अथवा हिंदु समाजाची हानी होऊ नये, उलट धर्मपालन करून देवतांची कृपा संपादन करून समाज सुखी आणि समृद्ध व्हावा अन् समष्टी स्तरावर सगळ्यांची आध्यात्मिक प्रगती व्हावी ! लहानपणापासून आतापर्यंत मी गोवा येथील पाहिलेले पूर्वीच्या काळचे विवाह समारंभ आणि सध्या त्याचे पालटत चाललेले स्वरूप यांविषयीचे तुलनात्मक विवेचन येथे केले आहे. 

आधुनिक पद्धतीच्या विवाहाचे प्रातिनिधीक छायाचित्र

१. विवाह ठरवणे आणि त्याच्याशी संबंधित सूत्रे 

१ अ. पत्रिका जुळवून लग्न ठरवणे : सध्या बरेचसे विवाह मुला-मुलींच्या मान्यतेने होतात. प्रेमविवाह असल्यामुळे पत्रिका जुळवण्याची प्रक्रिया न्यून होत चालली आहे.

१ आ. साखरपुडा : पूर्वी लग्न ठरल्यावर ‘वाङनिश्चय’ केला जात असे. सध्या हा विधी क्वचितच होतो. त्याचे रूपांतर सामाजिक कार्यक्रमात झाले असून त्याला ‘साखरपुडा’ म्हटले जाते. हा कार्यक्रम सभागृहात केला जातो. त्याला ‘छोटे लग्न’ असेही म्हणू शकतो. यासाठी पूर्वी वधू साडी नेसत असे; पण आता सगळ्या वधू महागडे लेहंगा (पायघोळ झगे) घालतात. मध्यंतरी एका साखरपुड्यात वधूने ‘ब्रायडल स्नीकर’ (चालण्यासाठी वापरतो तसे बूट) घातले होते. वधू-वराने एकमेकांना अंगठ्या घातल्यावर वराची आई वधूला साखरेचा पुडा देते आणि वधूची आई वराला साखरेचा पुडा देते. हे पुडे पाश्चात्त्य पद्धतीने सजवले जातात. नंतर पाश्चात्त्य पद्धतीनुसार केक कापला जातो. जेवणही बर्‍याचदा मांसाहारी असते.

१ इ. लग्नाचा मुहूर्त ठरवणे : पूर्वी चातुर्मास संपल्यावर, म्हणजेच कार्तिक मासात तुळशीविवाहानंतर विवाह होत असत. आता वधू-वराचे कुटुंब त्यांच्या सोयीनुसार पुरोहितांना मुहूर्त शोधायला सांगतात आणि विवाह निश्चित करतात. त्यामुळे अन्य पंथियांप्रमाणे हिंदूंचे विवाह वर्षभर साजरे होतात. अगदी पितृपक्षातही विवाह केले जातात. (पितृपक्षात श्राद्धविधी केले जातात; म्हणून त्या काळात शुभकार्य केले जात नाही.)

१ ई. लग्नविधीचे ठिकाण : पूर्वी हिंदु समाजात विवाह वधूच्या घरी पार पडत असे. वरात वधूच्या घरी जायची आणि विवाह करून वधूला सासरी घेऊन यायची. वधूच्या घरासमोर मंडप उभारला जायचा. मंडप सुखरूप रहावा; म्हणून ‘मंडप देवते’ची स्थापना करून तिचे पूजन केले जात असे. मंगलाष्टके मंदिरात देवतेच्या साक्षीने होत. हळूहळू मंदिराच्या परिसरात सभागृह बांधले गेले आणि संपूर्ण विवाहसोहळा तेथे होऊ लागला. कालांतराने विवाहाची स्थळे पालटू लागली. मोठे वातानुकूलित सभागृह, प्रशस्त आणि हवेशीर सभागृह येथे सोहळे होऊ लागले. चांगल्या सभागृहात विवाह होण्यासाठी त्याचे आरक्षण १ वर्ष अगोदरच करावे लागते. काही अडचणींमुळे विवाह रहित झाला अथवा पुढे ढकलला गेला, तर सभागृहाचा परतावासुद्धा मिळत नाही.

सध्या लागू झालेली नवीन पद्धत म्हणजे ‘डेस्टिनेशन वेडिंग’ ! एका विशिष्ट स्थळाच्या ठिकाणी, देशात किंवा विदेशात जाऊन विवाह करणे. येणार्‍या पाहुण्यांची सर्व प्रकारची सोय तेथे केली जाते. यासाठी ‘इव्हेंट मॅनेजमेंट’ (कार्यक्रम नियोजन करणारे) हासुद्धा एक मोठा व्यवसाय झाला आहे. त्यासाठी पुष्कळ पैसा व्यय केला जातो.

आधुनिक वैद्या डॉ. रूपाली भाटकार 

२. विवाहाशी निगडीत सिद्धता ! 

२ अ. सजावट आणि रोषणाई : पूर्वी केळीचे खांब, पाने, झेंडू आणि जाईची फुले, आंब्याची पाने वगैरे वापरून विवाहमंडप सजवला जात असे. हळूहळू बाजारात सुंदर दिसणारी; पण असात्त्विक विदेशी फुले, उदा. ॲस्टर, जेरमेनिअम, ऑर्किड, फर्न वापरण्यात येऊ लागली. आता तर खोटी फुले-पाने (प्लास्टिकची) वापरून सजावट केली जाते; पण त्यासाठी अधिक पैसा लागतो. कधी कधी थर्माकोलसारख्या पर्यावरणाला घातक वस्तू वापरल्या जातात. पूर्वी सात्त्विक आणि स्थानिक फुले वापरत. गोव्यात म्हार्दोळ गाव यासाठी प्रसिद्ध होते. आता वधू-वरांसाठी असात्त्विक फुले, म्हणजे ऑर्किड वगैरे वापरून हार बनवतात. कधी कधी बाहेरगावातून महागडे हार-तुरे मागवतात. दिवसासुद्धा सभागृहात विजेची अनावश्यक रोषणाई केली जाते. त्याव्यतिरिक्त व्हिडिओसाठी रोषणाई केलेली असते. यामुळे सभागृहात उष्णता निर्माण होते.

२ आ. संगीत : पूर्वी मंदिरात वाजवणार्‍या वाजंत्र्यांना बोलावून सनईवादन केले जात असे. आता ही वाजंत्री पुष्कळ अल्प असते. गोव्यात विवाह समारंभात सात्त्विक सनईवादनाचे ध्वनीमुद्रण लावले जाते.

२ इ. वधू-वराची वेशभूषा : पूर्वी वधू सुती किंवा नऊवारी साडी नेसत असे. कालांतराने सहावारी साड्या आल्या. नंतर वधू सहावारी रेशमी शालू नेसू लागली. आता काही वधू लेहंगा (पायघोळ झगे) घालतात. बर्‍याच ठिकाणी ओढणी वापरली जात नाही. फॅशन (नवरूढी) म्हणून पोटाचा भाग उघडा ठेवला जातो. वधूचा मेकअप (रंगभूषा), केशरचना करणे, तिला साडी नेसवणे आदी कृतीही केल्या जातात. काही वेळा ब्लाऊजचा मागील गळा एवढा मोठा असतो की, पूर्ण पाठच उघडी रहाते. नवीन पद्धतीनुसार ब्लाऊजच्या मागे महागडे भरतकाम केलेले असते. एका विवाहात वधूच्या ब्लाऊजच्या मागे विठोबाच्या मुखवट्याचे भरतकाम केले होते. असे करणे हे देवतांचे विडंबन नव्हे का ? लेहंग्यावर जरदोसी, बीड (मणी) वर्क केलेले असते. यात पुष्कळ पैसे व्यय होतात.

सध्याच्या मुलींना धर्मशिक्षण नसल्यामुळे आणि त्या पाश्चात्त्य जीवनशैलीचे अनुकरण करत असल्याने कपाळाला कुंकू लावणे, हे त्यांना मागासलेपणाचे लक्षण वाटते. त्यामुळे कपाळावर दिसणार नाही, इतकी लहान टिकली त्या लावतात. पूर्वीच्या काळी आमच्या आजी-पणजी यांच्याकडे दोनच रेशमी शालू असायचे. एक आईने दिलेला आणि दुसरा सासूने दिलेला ! हेच शालू त्या सगळ्या विवाह समारंभांत नेसत. आज आम्ही प्रत्येक विवाहासाठी नवीन साडी खरेदी करतो ! ‘वर’ पूर्वी धोतर नेसत असे. आता कुर्ता-पायजमा घातला जातो. पाश्चात्त्य पद्धतीच्या विवाहात ‘तीन पीस सूट’ (कोट, जॅकेट आणि पँट) घातला जातो; पण ते अयोग्य आहे; कारण तो पोशाख भारतीय नाही.

२ ई. वधूची केशरचना : वधू पूर्वी अंबाडा घालून त्यावर दागिने आणि फुले माळत असते. गोव्यात तर ‘सट’ म्हणून ३ प्रकारच्या वेण्या वधूसाठी बनवल्या जात. लाल गुंज रतन अबोली, हिरवी बोकोड्यो (पाने) आणि सर्वांत वर झिग म्हणून रूपेरी तारेची वेणी (कलाबूत)! समाजाचे आधुनिकीकरण होत गेले, तशी ही प्रथा न्यून झाली. केशरचना करणारे वधूचे केस वेणीत बांधू लागले. केस छोटे असले, तर त्यांना गंगावन (खोटे केस) लावले जाई.

सध्या काही वधू दागिने माळण्यासाठी अंबाडा घालतात; पण साडीच्या रंगाला सुसंगत होतील, अशी खोटी फुलेही माळतात. काही वधू केस मोकळे सोडतात अथवा काही वेळा विचित्र पद्धतीने केस बांधले जातात. काही वेळा रसायने वापरून केस सरळ करायची प्रथा प्रचलित झाली आहे. काही वधू केसांचा नैसर्गिक रंग पालटून कलप लावून ते सोनेरी, तपकिरी रंगाचे करतात. ‘हिंदु धर्मानुसार स्त्रीने केस मोकळे सोडू नयेत’, असे सांगितले आहे; कारण मोकळ्या केसांतून स्त्रीवर अनिष्ट शक्ती आक्रमणे करू शकतात.

२ उ. सात्त्विक दागिने : केसात भांगटिळा, अंबाड्यावर सोन्याची सुरंगी वेणी (कोकणी भाषेत ‘सुरंगावळसार’), सोन्याची फुले, कानात झुमके अथवा कुडी, बाजूबंद, हातात गोठ, पाटल्या, तोडे, बांगड्या, गळ्यात कंठ, माळा वगैरे पूर्वीचे दागिने गोव्यातील काही वधू अजूनही घालतात. हे ‘स्त्रीधन’, म्हणजे स्त्रीची आर्थिक सुरक्षा आहे. हे दागिने दैवी सकारात्मक स्पंदने आकर्षित करण्यासाठी उत्तम आहेत.

बर्‍याचदा स्त्रिया दागिन्यांच्या सुंदर नक्षीकडे आकर्षित होतात; पण त्यांतून नकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होत असतात; म्हणून पारंपरिक दागिने जे आमच्या पूर्वजांनी दिलेले आहेत, ते उत्तम आहेत. (सनातन संस्थेने समाजासाठी ‘कंठ आभूषणापासून मेखलेपर्यंत अलंकार, हात पायात घालायचे अलंकार, स्त्रियांनी अलंकार घालण्यामागील शास्त्र’ हा सिद्ध केला आहे.)

मंगळसूत्र

गोव्यात वधूला विवाहात दोन प्रकारचे मंगळसूत्र दिले जाते. सासरकडून दिल्या जाणार्‍या मंगळसूत्रात काळ्या मण्याचे धागे असतात आणि मध्ये एक मुहूर्तमणी असतो, तो प्रपंचाचे प्रतीक असतो. माहेरहून दोन सोनेरी वाट्या असलेले दोन पदरी मंगळसूत्र घातले जाते. सध्या सोन्याचे दागिने विकणारी आस्थापने मंगळसूत्रात २ वाट्या अथवा मुहूर्तमणी न घालता सोनेरी अथवा हिरे यांचे लॉकेट घालतात. पुरुष जसे सोन्याची साखळी (ब्रेसलेट) मनगटावर बांधतात, त्याप्रमाणे स्त्री गळ्यात मंगळसूत्र न घालता हातात काळ्या मण्यांचे ब्रेसलेट घालू शकते, अशा स्वरूपाचे एक विज्ञापन मध्यंतरी प्रसिद्ध झाले होते.

 

 

(क्रमशः पुढच्या रविवारी)

– आधुनिक वैद्या डॉ. रूपाली भाटकार, फोंडा, गोवा.(१८.३.२०२५)

या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/904968.html