रायगडावर ड्रोन बंदी !
अलिबाग – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त १२ एप्रिल या दिवशी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा रायगड जिल्हा दौर्यावर येणार आहेत. त्यामुळे रायगड परिसरात जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी सुरक्षेच्या कारणास्तव सकाळी ७ ते दुपारी ४ या वेळेत २ कि.मी. परिसरात ड्रोन, पॅराग्लायडर, पॅरामोटर्स, हँगग्लायडर्स यांच्या वापरावर बंदी घातली आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई करण्यात येणार आहे.
४ वर्षांच्यामुलीवर अत्याचार !
कल्याण, १० एप्रिल (वार्ता.) – येथील विठ्ठलवाडी परिसरात ४ वर्षांच्या मुलीवर तिच्या शेजारी रहाणार्याने अत्याचार केले. या प्रकरणी पोलिसांनी ५० वर्षीय आरोपी अभियंत्यावर गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे. (गुन्हेगारांना कायद्याचे भय वाटत नसल्यामुळेच दिवसेंदिवस अशा गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे ! – संपादक) अत्याचार केल्यानंतर आरोपीने पोलिसांकडे त्याच मुलीच्या पालकांविरुद्ध मारहाणीची खोटी तक्रार केली होती.
एल्फिन्स्टन पूल २ वर्षे बंद !
मुंबई – वरळी-शिवडी कनेक्टरसाठी एल्फिन्स्टन पुलाची पुनर्बांधणी करण्यात येणार असून हा पूल वाहतुकीसाठी २ वर्षे बंद ठेवण्यात येणार आहे. जुना पूल तोडून त्या ठिकाणी डबल डेकर ब्रिजची निर्मिती करण्यात येणार आहे. पुनर्बांधणीच्या कामामुळे मोठी वाहतूककोंडी होणार असल्याने १३ एप्रिलपर्यंत सूचना-हरकती मागवल्या आहेत. नागरिकांनी १३ एप्रिलपर्यंत हरकती न घेतल्यास १५ एप्रिलपर्यंत वाहतूक बंद करून पाडकामाला प्रारंभ होईल.