प.पू. डॉ. आठवले यांच्या कृपेने डॉ. दुर्गेश सामंत यांची पूर्णवेळ साधक होण्यासंबंधी झालेली प्रक्रिया

१० एप्रिल २०२५ या दिवशी प.पू. डॉक्टरांच्या कृपेमुळे ‘आम्ही उभयता सहजपणे काहीही त्रास न होता पूर्णवेळ साधक कसे झालो ?’, याविषयीची सूत्रे पाहिली. या भागात पूर्णवेळ साधना करायचा निर्णय घेतल्यावर नातेवाईक आणि मित्र यांनी केलेले साहाय्य याविषयीची माहिती दिली आहे.                           (भाग २)

या लेखातील मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/901121.html

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

आधुनिक वैद्य (डॉ.) दुर्गेश सामंत यांचा साधनाप्रवास

२. व्यवसाय बंद करतांना आरंभी आलेला ताण आणि प.पू. डॉक्टरांच्या कृपेने पूर्णवेळ साधना करण्याकडे झालेली वाटचाल !

अ. मी दोन ठिकाणी रुग्णतपासणी आणि रुग्णभरती करण्यासाठी जात होतो, तसेच अतीदक्षता विभाग आणि अन्य काही रुग्णालयांतही नियमित जात होतो. त्यामुळे मी  बाह्य-रुग्ण तपासणीसाठी येणार्‍या सर्व रुग्णांना ‘या काळात मी येथे नाही. त्यामुळे तुम्ही १० दिवसांनी या’, असे सांगितले. तेव्हा ‘रुग्णांना हे स्वीकारले जाईल का ?’, ही मला चिंता होती.

आ. सांगलीहून निघण्यापूर्वी मी रुग्णालयात भरती केलेले जे काही ३ – ४ रुग्ण होते, त्या सगळ्यांना पुढच्या २ ते ४ दिवसांत घरी जाण्याची अनुमती दिली. (‘डिस्चार्ज’ दिला.) त्यातील एक रुग्ण दूरच्या खेडेगावातील शेतकरी होता. तो म्हणाला, ‘‘डॉक्टर, तुम्ही जाऊन या. तोपर्यंत मी घरी जाणार नाही.’’ (तो मधुमेहाचा त्रास असलेला आणि पायाला बरी न होणारी जखम झालेला रुग्ण होता. तो पुष्कळ विश्वासाने माझ्याकडे येऊन भरती झाला होता.) मी नवीन डॉक्टर असल्यामुळे ‘माझ्या अनुपस्थितीत माझे रुग्ण कोणत्या डॉक्टरांना तपासायला सांगायचे ?’ हा मला प्रश्न होता. मी एका ज्येष्ठ डॉक्टरांना विनंती केली आणि त्यांनी दिवसातून एकदा रुग्ण तपासण्याचे मान्य केले अन् माझी ही चिंता तात्पुरती दूर झाली.

इ. आम्ही एका नवीनच ‘पॉलिक्लिनिक’मध्ये (अनेक रोगांवर उपचार केले जातात, असे रुग्णालय) मुख्य व्यवसाय करत होतो. आम्ही व्यवसाय बंद केल्यास जागेचे मालक आणि आम्ही अशी आमच्या दोघांचीही हानी होणार होती अन् आम्हाला जागेचे भाडे द्यावेच लागणार होते. त्यामुळे ‘व्यवसाय बंद कसा करणार ?’ याचा मला ताण होता.

ई. आम्ही ७ आधुनिक वैद्यांनी (फिजिशयन डॉक्टरांनी) मिळून शहरात एक अतीदक्षता विभाग चालू केला होता. त्यामुळे शहरातील लोकांची थोडी सोय झाली होती. त्यात माझी आर्थिक गुंतवणूक नसली, तरी मी सप्ताहातील ५ दिवस आणि एक रात्र तेथे राहून रुग्णालय सांभाळत असे. आता अकस्मात् हे बंद करावे लागणार होते; पण अन्य आधुनिक वैद्यांना मी करत असलेल्या प्रसारकार्याची कल्पना असल्याने त्यांनी फार काही म्हटले नाही.

आधुनिक वैद्य (डॉ.) दुर्गेश सामंत

उ. मी जवळपास ५ वर्षे व्यवसाय करत असल्याने आता सुमारे २ सहस्र रुग्ण जोडलेले होते. माझ्याकडे त्या रुग्णांचे एक प्रकारे नैतिक दायित्व होते. ‘त्यांच्यापैकी कुणाला काही समस्या झाली, तर त्याला मी उत्तरदायी ठरणार होतो’, याचा मला ताण आला होता.

ऊ. जीवनविमा आणि मित्रांकडे गुंतवलेले सर्व पैसे त्यांच्याकडून सोडवून घेण्यातील अडचणी, यांचाही मनावर ताण होता.

ए. सदनिकेसाठी आणि प्रसारासाठी घेतलेल्या वाहनाचे कर्ज फेडले. आता अधिकोषात एकूण २ लक्ष रुपये राहिले होते. याच्यावर पुढचे सर्व जीवन चालायचे होते. याचा नकळत ताण हा होताच.

ऐ. ज्या मित्रांनी मला वैद्यकीय शिक्षण आणि नंतर व्यवसाय यांमध्ये मोठे साहाय्य केले, तेही माझ्यावर अवलंबून होते. याचाही मला ताण होता.

३. त्या वेळी माझा मुलगा मुकुल हा २ वर्षांचा होता. ‘त्याचे पुढे कसे होईल ?’ या प्रश्नाचा विचारही माझ्या मनात आला नाही. 

या सर्वांतून बाहेर पडून प.पू. डॉक्टरांच्या कृपेनेच पुढे मला आणि सौ. नंदिनीला केवळ ३ मासांमध्ये पूर्णवेळ साधक होता आले.’

४. काही दिवसांसाठी मुंबईला गेलो असतांना ‘सांगली सोडून कायमचा निघून गेलो’, हे समजल्यावर कुणाचाही विरोध न होणे 

‘मी सेवाकेंद्रात राहून साप्ताहिक ‘सनातन प्रभात’ची सेवा शिकायला आरंभ केला. यामध्ये ५ – ६  दिवस कधी निघून गेले, ते मला समजलेही नाही. त्यानंतर एकदा प.पू. डॉक्टर म्हणाले, ‘‘आणखी ४ ते ६ दिवस थांबता का ? सेवा पूर्ण शिकून घ्या !’’ त्यानुसार मी थांबलो.

सांगलीत ‘मी सांगली सोडून कायमचा निघून गेलो’, हे सर्वांना समजले. माझ्या पत्नीच्या (सौ. नंदिनीच्या) महिला रुग्ण अथवा महिला रुग्णांचे नातेवाईक ‘असा कसा हा नवरा ? बायको-मुलाला सोडून जातो आणि बाईच्या जातीला दुःख करतो !’, असे दुःख प्रकट करू लागल्या. अन्य कुणाचा मला दूरभाष आला नाही किंवा सौ. नंदिनीवरही कुणी काही दडपण आणले नाही. त्यामुळे आमच्या मनात ‘रुग्णांना वार्‍यावर सोडले’, ही अपराधी भावनाही राहिली नाही.

५. नातेवाईक आणि मित्र यांचे लाभलेले साहाय्य !

५ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने घरातील व्यक्ती, नातेवाईक आणि मित्र यांच्याकडून साधनेला विरोध न होऊन मन सकारात्मक रहाण्यास साहाय्य होणे : माझ्याशी थेट परिचित नसलेले शहरातील काही मोजके लोक माझ्या पूर्णवेळ साधना करण्याच्या निर्णयाची टीका करत असत. श्री गुरुकृपेने माझा त्यांच्याशी फारसा संपर्क आला नाही. त्याच प्रमाणे श्री गुरूंची कृपा आणि भगवंताची इच्छा यांमुळेच माझ्या घरातील व्यक्तींच्या मनाची सिद्धता झाली आणि मला साधना करण्यास कुणाचाच विरोध झाला नाही. माझी पत्नी, मुलगा आणि आई-वडील, तसेच अन्य नातेवाईक यांपैकी कुणीही मला साधनेला कधीच विरोध केला नाही. काहींनी ‘तुम्ही नेमके काय करता? कसे रहाता? तुमचे ठीक चालले आहे ना ?’, अशी आमची प्रेमाने चौकशी केली. ज्यांना आमची काळजी वाटली, ते सर्व आश्रमात येऊन प्रत्यक्ष पाहून गेले.

५ आ. नातेवाईक आणि मित्र यांनी केलेले साहाय्य

५ आ १. सनातन संस्थेवर कठीण प्रसंग येणे आणि वडीलबंधूंनी सांगलीला परत येण्यास सांगून ‘दवाखाना चालू करण्यास साहाय्य करीन’, असे सांगणे : केवळ एकदाच असा प्रसंग आला होता. वर्ष २०११ मध्ये माझ्या वडीलबंधूंनी सनातनवर आलेले संकट पाहून आणि त्या वेळची कठीण परिस्थिती पाहून मला दूरभाष केला आणि ते म्हणाले, ‘‘कठीण प्रसंग आहे. तुम्हाला त्रास होऊन तिकडे रहाणे कठीण होऊ शकते. तेव्हा तू सांगलीला परत ये आणि चिकित्सालय चालू कर. मी तुला यथाशक्ती साहाय्य करतो.’’

५ आ २. व्यवसाय बंद करणार असल्याचे समजल्यावर एका मित्राने आठवड्यातून दोन दिवस रुग्णालयात रुग्णचिकित्सा करण्यास येण्याविषयी सांगणे : एका मित्राने मला एम्.डी. करतांना, तसेच नंतर व्यवसायात आल्यानंतरही पुष्कळ साहाय्य केले होते. त्याला ‘मी व्यवसाय बंद करणार आहे’, हे सांगितल्यानंतर तो म्हणाला, ‘‘तू आठवड्यातील ५ दिवस तुला काय करायचे ते कर; पण २ दिवस माझ्या रुग्णालयात ये. या दोन दिवसांत ‘तुझे सध्या जेवढे साप्ताहिक उत्पन्न आहे, तेवढेच राहील’, असे पाहू. माझी तुझ्याकडून अन्य काही अपेक्षा असणार नाही.’’ पुढे त्याने मोठे रुग्णालय बांधल्यावर त्याच मित्राने, तसेच अन्य मित्रांनीही ‘परत येणार असशील, तर अवश्य ये’, असे सांगितले.

५ आ ३. कठीण प्रसंगात एका ज्येष्ठ आधुनिक वैद्यांनी साहाय्य करण्याची सिद्धता दाखवणे : वर्ष २००८-०९ च्या सुमारास एका ज्येष्ठ आधुनिक वैद्यांची मिरजेत भेट झाली. तेव्हा ते मला म्हणाले, ‘‘दुर्गेश, तू ज्या मार्गाने गेलास, त्याबद्दल माझे काही म्हणणे नाही; पण ‘अनेक जण नंतर या मार्गावरून परत येतात आणि त्या वेळी त्यांच्या हातात काहीच नसते; म्हणून निराश होतात’, असे मी पाहिले आहे. तुझ्यावर तशी पाळी कधी आलीच, तर तू निःसंकोच मिरजेत परत ये. या भागातील आम्ही सर्व ज्येष्ठ आधुनिक वैद्य ‘२ वर्षांत तुझी सांपत्तिक स्थिती आमच्यासारखी होईल’, असे साहाय्य करू. हे आम्ही तुझ्यावर उपकार करत नसून तू खरी ‘क्लिनीकल प्रॅक्टिस’ (वैद्यकीयदृष्ट्या रुग्णतपासणीचा उत्तम सराव) करणार्‍या परंपरेतील शेवटचा आहेस; म्हणून आम्ही हे करू.’’          (क्रमशः) 

– आधुनिक वैद्य (डॉ.) दुर्गेश सामंत (वय ६३ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१५.२.२०२४)

या लेखाचा यापुढील भाग वाचण्याकारीता येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/902274.html