‘सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करण्यापूर्वी मी आणि माझी पत्नी डॉ. (सौ.) नंदिनी वैद्यकीय व्यवसाय करत होतो. प.पू. डॉक्टरांच्या सहवासात असतांना आम्ही सेवेकडे आकर्षिले गेलो आणि ‘काही दायित्व घेऊन सेवा करावी’, असे आम्हाला वाटू लागले. त्यानंतर आम्ही पूर्णवेळ साधना करू लागल्याची प्रक्रिया होतांना ‘प.पू. डॉक्टरांनी आम्हाला अलगदपणे पूर्णवेळ साधक कसे करून घेतले ?’ (विशेष करून मला तर त्यांनी काहीच कष्ट होऊ दिले नाहीत.) आम्ही विनासायास पूर्णवेळ साधक बनलो. याविषयीची सूत्रे येथे दिली आहेत. (भाग १)

आधुनिक वैद्य (डॉ.) दुर्गेश सामंत यांचा साधनाप्रवास
१. पूर्णवेळ साधना करण्यास प्रवृत्त होणे
१ अ. प.पू. डॉक्टरांनी भविष्यातील आश्रमजीवनाच्या संबंधी दिलेली पूर्वसूचना : आम्ही उभयता (मी आणि माझी पत्नी सौ. नंदिनी) पूर्णवेळ साधना करण्याच्या पुष्कळ आधी प.पू. डॉक्टरांनी आम्हाला म्हैसाळ (ता. मिरज, जि. सांगली) येथील संत प.पू. ॐ मालती बाळ यांच्या आश्रमात जाऊन त्यांच्या आश्रमातील दिनचर्या पाहून ती लिहून पाठवायला सांगितली होती. त्यांनी त्या वेळी ‘तसे का सांगितले ?’ ते आमच्या लक्षात आले नाही. त्यांनी जसे सांगितले, तसे आम्ही केले. पुढे पूर्णवेळ साधना करू लागल्यावर काही वर्षांनी ‘त्यांनी तसे का सांगितले असावे ?’, याचा मला उलगडा झाला.
१ आ. साप्ताहिक ‘सनातन प्रभात’ची सेवा करण्यामागील कारणमीमांसा ! : नंतर मला साप्ताहिक ‘सनातन प्रभात’ सिद्ध होण्याच्या व्याप्तीचा अंदाज आला आणि ‘त्या सेवेत सहभागी व्हावे’, असे मला वाटले. त्यामागील विचारप्रक्रिया आणि घटनाक्रम येथे दिला आहे.
१ आ १. साप्ताहिक ‘सनातन प्रभात’ चालू होण्याआधी प.पू. डॉक्टरांनी ‘साप्ताहिकासाठी लेखन करा’, असे सांगणे : मी साप्ताहिक ‘सनातन प्रभात’साठी पहिल्या अंकापासून लेखन करत होतो. त्या आधी मला मराठी लेखनाचा काहीच अनुभव नव्हता, तसेच त्या आधीची कित्येक वर्षे मी वैद्यकीय क्षेत्रात असल्याने माझे लिखाण इंग्रजीतूनच असायचे. असे असतांना साप्ताहिक ‘सनातन प्रभात’ चालू होण्याआधी प.पू. डॉक्टरांनी मला ‘साप्ताहिकासाठी लेखन करा’, असे सांगितले; म्हणून मी ती सेवा करू लागलो. आरंभीच्या काळात साप्ताहिकाच्या प्रत्येक अंकात मी लिहिलेला एक लेख छापून येत असे.

१ आ २. ‘साप्ताहिक ‘सनातन प्रभात’चे दायित्व स्वीकारले, तर प.पू. डॉक्टर अन्य गोष्टी पाहू शकतील आणि आपली खर्या अर्थाने सेवा अन् त्याग होईल’, असा विचार मनात येणे : ‘साप्ताहिकात आणखीही पुष्कळ लिखाण असते’, हे माझ्या लक्षात आले. ते सर्व लिखाण संस्कारित करायचे, त्याचे शुद्धलेखन पडताळायचे, त्याची रचना करायची, अंक छापण्यासाठी द्यायचा, त्याची लेखा आणि वितरण व्यवस्था इत्यादी सर्व करायचे, म्हणजे किती मोठा व्याप आहे ! ‘यांतील काही दायित्व आपण स्वीकारले, तर प.पू. डॉक्टर अन्य गोष्टी पाहू शकतील. आपण हे दायित्व स्वीकारले, तर सनातनच्या कार्याला आपला थोडा हातभार लागू शकेल आणि आपली खर्या अर्थाने सेवा अन् त्याग होईल’, असे मला वाटले.
१ आ ३. प.पू. डॉक्टरांच्या ‘सर्व गोष्टींचे अध्यात्मिकीकरण करणे’, या विचाराने प्रभावित होणे : ‘साप्ताहिक ‘सनातन प्रभात’साठी लिखाण आणि अन्य काही करावे’, असे वाटण्याचे कारण म्हणजे प.पू. डॉक्टरांचा ‘सर्व गोष्टींचे अध्यात्मिकीकरण करणे, साधनेच्या भूमिकेतून व्यक्तीगत जीवन ते राष्ट्रहित आणि समाजहित इत्यादी सर्व गोष्टींकडे पहाणे’, हा दृष्टीकोन माझ्या मनाला पटला होता.
१ इ. अध्यात्मप्रसाराला अधिक वेळ देण्याविषयी घडलेले काही प्रसंग आणि मनातील विचारप्रक्रिया
१ इ १. प.पू. भक्तराज महाराज यांनी ‘तू शेवटपर्यंत प.पू. डॉक्टरांच्या समवेत रहा’, असे सांगितले असल्यामुळे ‘वैद्यकीय व्यवसाय बाजूला ठेवून अध्यात्मप्रसाराकडे वळायचे’, असे ठरवणे : ६.३.१९९४ या दिवशी प.पू. भक्तराज महाराज यांच्याशी (प.पू. बाबांशी) बोलत असतांना ते म्हणाले, ‘‘तू शेवटपर्यंत प.पू. डॉक्टरांच्या समवेत रहा. त्यात तुझे कल्याण आहे.’’ त्यानंतर वर्ष १९९५ मध्ये प.पू. बाबा त्यांच्या देहत्यागापूर्वी गोव्याला आले होते. तेव्हा गोव्यातून परत जातांना आम्ही त्यांना विमानतळावर पोचवायला गेलो होतो. तेव्हाही मला प.पू. बाबांनी ‘‘तू शेवटपर्यंत प.पू. डॉक्टरांच्या समवेत रहा’’, असे सांगितले होते. त्या वेळी मी नुकताच चालू केलेला वैद्यकीय व्यवसाय, तसेच संसार आणि प्रसार हे सर्व सांभाळत होतो. चार वर्षांनंतर ‘खाजगी वैद्यकीय व्यवसाय चालू ठेवल्यास रुग्णसेवा इत्यादी व्याप वाढतच रहाणार आहे’, हे माझ्या लक्षात आले. मला वैद्यकीय व्यवसाय आणि प्रसारसेवा यांची, तसेच संसारातील दायित्वाची जुळणी करतांना समस्या येत होत्या. आता ‘साप्ताहिक ‘सनातन प्रभात’ची सेवा आणि व्यवसाय यांतील काय निवडायचे ?’, यासंबंधी काहीतरी निर्णय घ्यायलाच हवा’, असे माझ्या लक्षात आले.
१ इ २. ‘वैद्यकीय व्यवसाय आणि प्रसारकार्य यांचा मेळ जमत नाही’, हे लक्षात आल्याने एका निर्णयाप्रत येतांना रुग्णाच्या रोगाच्या निदानासंदर्भात एक प्रसंग घडून मनातील द्वंद्व संपणे आणि अध्यात्मप्रसाराला अधिक वेळ देण्याचा निश्चय होणे : एकूण सांगलीत ‘वैद्यकीय व्यवसाय, प्रसारकार्य, मुलाचा (मुकुलचा) जन्म, तसेच अन्य घरगुती गोष्टी’ यांच्या धावपळीत व्यवसाय आणि प्रसार यांचा मेळ बसत नव्हता. त्यात मी ‘रुग्ण, तसेच माझ्यावर भरवसा ठेवणारे अन्य वैद्य यांच्यावर अन्याय करत आहे’, हे माझ्या लक्षात येत होते. प्रसार आदी कार्य न्यून करावे, तर ‘ते कसे करायचे, हे मला समजत नव्हते. आता कोणतातरी ठाम निर्णय घेऊन ‘एका गोष्टीला प्रथम प्राधान्य देऊन दुसर्या गोष्टीला अगदी ठराविक आणि मर्यादित वेळ द्यावा’, या निर्णयाप्रत मी पोचलो होतो; परंतु ‘नेमकी दिशा कोणती ठेवावी अन् हे प्रत्यक्ष कधी आणि कसे करावे ?’, हे प्रश्न माझ्या मनात होते. त्या वेळी मला काहीच लक्षात येत नव्हते.
मी अशा स्थितीत असतांना एक दिवस मिरजेहून माझ्या एका मित्राने माझ्याकडे, म्हणजे सांगलीला ‘मी दुसरे मत (सेकंड ओपिनीयन) द्यावे’, यासाठी त्याचा एक रुग्ण पाठवला. त्या रुग्णाला तपासून मी त्याच्या रोगाविषयीचे निदान, उपाययोजना आदी सगळे लिहून मित्राकडे पाठवले. ते सगळे अगदी योग्य होते. मात्र एका नसेचे (‘नर्व्ह’चे) नाव लिहितांना त्यासंबंधीची माझी एक संज्ञा चुकली होती. मित्राने माझे पत्र वाचून मला लगेच दूरभाष केला आणि विचारले, ‘‘तुझ्याकडून असे होणे शक्यच नाही. ‘असे कसे झाले ?’, हे मी समजूच शकत नाही.’’ त्याचे वैद्यकीय शिक्षण चालू असतांना आम्ही एकत्र सेवा केली होती. त्यामुळे तो मला अगदी जवळून ओळखत होता. तेव्हा मलाही समजत नव्हते की, असे कसे झाले ? येथेच माझ्या डोक्यात प्रकाश पडला. मला माझ्या मनातील द्वंद्वावर निर्णय मिळाला होता. ‘हा एक दैवी संकेत आहे’, असे मी समजलो. ‘वैद्यकीय व्यवसाय अल्प करून आता अध्यात्मप्रसाराला अधिक वेळ द्यायचा’, हे माझ्या मनाशी पक्के झाले. याविषयी ‘आता पुढे काय करायचे ?’, हा प्रश्न उरला होता. मी त्याच दिवशी या संदर्भात प.पू. डॉक्टरांना विचारायचे ठरवले आणि तसे केले.
१ इ ३. प.पू. डॉक्टरांनी वैद्यकीय व्यवसाय बंद करून साप्ताहिक ‘सनातन प्रभात’ची सेवा करण्यासाठी अनुमती दर्शवणे : मी माझी पत्नी सौ. नंदिनी हिच्याजवळ माझ्या मनातील ‘पूर्णवेळ साधना करणे अथवा वैद्यकीय व्यवसाय बंद करणे’, या विचाराचा उल्लेखही केला नव्हता. वर्ष १९९४ मध्ये एकदा मी प.पू. बाबांना वैद्यकीय व्यवसाय बंद करण्याविषयी विचारले. तेव्हा त्यांनी ‘नको’, असे सांगितले होते. त्यामुळे ‘त्यांच्या पश्चात् प.पू. डॉक्टरांकडून परत तेच उत्तर आले, तर काय करायचे?’, असे दडपणही माझ्या मनावर होते.
जुलै १९९८ मध्ये प.पू. डॉक्टर इंदूर येथे असतांना मी त्यांना दूरभाष करून सांगितले, ‘‘मला साप्ताहिक कसे सिद्ध करतात, ते शिकायचे आहे. मी त्याचे दायित्व सांभाळू शकलो, तर मला एक मोठी सेवा मिळू शकते आणि ही सेवा मी ५ – ६ साधकांना घेऊन सांगलीमध्ये करू शकेन. अंक अंतिम पडताळणीसाठी आपल्याकडे पाठवून देईन. यासाठी मी वैद्यकीय व्यवसाय बंद करीन. सौ. नंदिनीचा व्यवसाय चालू राहील. त्यात आमचा आर्थिक व्यय भागेल.’’ प.पू. डॉक्टरांनी सांगितले, ‘‘सौ. नंदिनीला ‘हे चालेल का ?’, असे विचारा आणि ठरवा.’’ लगेचच मी सौ. नंदिनीला विचारले. तीसुद्धा लगेच ‘‘हो’’, असे म्हणाली. मी प.पू. डॉक्टरांना दूरभाषवरून तिचे उत्तर कळवले. ते म्हणाले, ‘‘तुम्ही त्रैमासिक बैठकीसाठी ठाण्याला येणारच आहात. ती ३ दिवसांची त्रैमासिक बैठक संपल्यानंतर ८ दिवस मुंबईतील सेवाकेंद्रात रहा. साप्ताहिक ‘सनातन प्रभात’च्या संदर्भातील सर्व सेवा शिकून घ्या.’’ वैद्यकीय व्यवसाय बंद करण्याचा निर्णय अशा रीतीने दूरभाषवर झाला.
प.पू. डॉक्टरांशी दूरभाषवर वरील बोलणे झाले. त्याच दिवशी मी लगेचच वडिलांना दूरभाष करून सांगितले, ‘‘मी वैद्यकीय व्यवसाय बंद करून अध्यात्मप्रसाराचे कार्य करणार आहे.’’ त्यांनी आणि इतरांनीही त्यावर काही म्हटले नाही. (क्रमश:)
– आधुनिक वैद्य (डॉ.) दुर्गेश सामंत (वय ६३ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१५.२.२०२४)
या लेखातील पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/901509.html