हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक सुनील घनवट ‘हिंदु शौर्य पुरस्कारा २०२५’ने सन्मानित !

  • हिंदवी स्वराज्य अर्थात् ‘हिंदु राष्ट्रा’च्या कार्यात देत असलेल्या योगदानासाठी पुणे येथे पुरस्कार प्रदान !

  • हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कार्यरत असणार्‍या हिंदु जनजागृती समितीसाठी उल्लेखनीय घटना !

पुरस्कार प्रदान करतांना (डावीकडे) कात्रज भाग संघचालक श्री. शिवाजी राव मालेगावकर, श्री. सुनील घनवट, श्री. सचिन भोसले आणि श्री. बाळासाहेब बोत्रे

पुणे, ९ एप्रिल (वार्ता.) – आपली ओजस्वी वाणी आणि नेतृत्व कौशल्य यांमुळे हिंदूंचे प्रभावी संघटन करणारे आणि हिंदु धर्मावरील आघात रोखण्यासाठी झटणारे हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांना ‘श्रीरामनवमी उत्सव समिती’च्या वतीने ‘हिंदु शौर्य पुरस्कार २०२५’ प्रदान करून गौरवण्यात आले. ‘श्रीरामनवमी उत्सव समिती, पुणे’ने ६ एप्रिल या दिवशी धनकवडी येथे श्रीरामनवमीच्या निमित्ताने भव्य अशा मिरवणुकीचे आयोजन केले होते.  हिंदु जनजागृती समिती म्हटली की, श्री. सुनील घनवट यांचे नावच राष्ट्र-धर्म प्रेमींसमोर येते ! हिंदवी स्वराज्य अर्थात् हिंदु राष्ट्राच्या कार्यात देत असलेल्या योगदानासाठी श्री. सुनील घनवट यांना पुरस्कार देण्यात आला. कात्रज भाग संघचालक श्री. शिवाजीराव मालेगावकर यांच्या हस्ते श्री. सुनील घनवट यांना मानचिन्ह देण्यात आले.

(डावीकडून) श्री. शिवराज वाळवेकर, माजी महापौर श्री. दत्ताजी धनकवडे, आमदार श्री. भीमराव अण्णा तापकीर, राष्ट्रसंत भाऊ महाराज परांडे, श्री. सुनील घनवट, योगी निरंजननाथजी, खासदार सौ. मेधा कुलकर्णी, मा. नगरसेवक वर्षा तापकीर, मा. नगरसेवक मोहिनी देवकर

या वेळी माजी महापौर श्री. दत्ताजी धनकवडे, आमदार श्री. भीमराव अण्णा तापकीर, राष्ट्रसंत भाऊ महाराज परांडे, योगी निरंजननाथजी, खासदार सौ. मेधा कुलकर्णी, मा. नगरसेवक वर्षा तापकीर, मा. नगरसेवक मोहिनी देवकर, श्री. सचिन भोसले, श्री. बाळासाहेब बोत्रे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

रामराज्य स्थापनेसाठी सर्वांना प्रयत्न करायचे आहेत ! – सुनील घनवट, संघटक, महाराष्ट्र आणि छत्तीसगड, हिंदु जनजागृती समिती

रामराज्य स्थापनेसाठी आपल्या सर्वांना प्रयत्न करायचे आहेत. श्रीरामजन्मभूमी परत मिळवण्यासाठी आपल्याला ५०० वर्षे लागली. काशी आणि मथुरा यांसाठी तेवढी वर्षे लागणार नाहीत, यासाठी हिंदूंना प्रयत्न करायचे आहेत. त्यामुळे आपण सर्वांनी जागृत राहूया !

मानचिन्ह

श्री. सुनील घनवट याचे हिंदु राष्ट्राच्या कार्यातील अतुलनीय योगदान !

श्री. सुनील घनवट हे हिंदु जनजागृती समितीच्या अंतर्गत राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांसाठी वर्ष २००२ पासून अखंड कार्यरत आहेत. श्री. घनवट हे संपूर्ण महाराष्ट्र, तसेच छत्तीसगड यांचे राज्य संघटक असून मंदिर महासंघ आणि हिंदु राष्ट्र समन्वय समिती यांचे राष्ट्रीय संघटक आहेत. मागील अनेक वर्षांपासून त्यांनी हिंदूंमध्ये जागृती करणे, हिंदूंचे संघटन करणे, गडदुर्ग रक्षणासाठी प्रयत्न करणे, मंदिर सरकारमुक्त होण्यासाठी प्रयत्न करणे यांसह अनेक उपक्रम राबवले आहेत.

श्री. सुनील घनवट यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्यातील राष्ट्र-धर्म यांप्रतीच्या तीव्र तळमळीतून त्यांनी आतापर्यंत केलेल्या आवाहनांमुळे गेल्या काही वर्षांत सहस्रो हिंदूंनी धर्मकार्य करण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्यात त्यांचे हे योगदान श्रेष्ठच आहे. त्यांनी राबवलेल्या विविध अभियानांनाही नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. श्री. घनवट यांच्या भेटीनंतर अनेक हिंदुत्वनिष्ठ राष्ट्र-धर्म कार्यार्थ सकारात्मक झाले. त्यांतील अनेकजण आता सक्रीय झाले आहेत.

विशेष : रामनवमीच्या निमित्ताने जसे आपण सर्व जण एकत्र येतो, तसे रामराज्य स्थापनेसाठी आणि हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी सर्वांनी प्रतिज्ञाबद्ध होऊया का ? असा प्रश्न श्री. सुनील घनवट यांनी विचारल्यावर सर्व धर्मप्रेमींनी हात उंचावून त्यांना अनुमोदन दिले.