
पुणे – स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी राहुल गांधी यांनी लंडनमध्ये अनिवासी भारतियांसमोर वादग्रस्त विधान केले होते. त्यामुळे सावरकरांचे नातू सात्यकी सावरकरांनी राहुल गांधींच्या विरोधात पुण्याच्या विशेष न्यायालयात मानहानीचा दावा प्रविष्ट केला होता. या दाव्याची सुनावणी ‘समरी ट्रायल’ ऐवजी ‘समन्स ट्रायल’मध्ये रूपांतरीत करावी, असा अर्ज राहुल गांधींचे अधिवक्ता मिलींद पवार यांनी केला होता. हा अर्ज विशेष न्यायाधीश अमोल शिंदे यांनी ७ एप्रिलला संमत केला. पुढील सुनावणी २५ एप्रिलला आहे.
‘समरी ट्रायल’मध्ये उलट तपासणीसाठी बचाव पक्षाला मर्यादा येऊ शकतात. ‘समन्स ट्रायल’मध्ये विस्तृत उलट पडताळणी करण्यात किंवा कोणतीही महत्त्वाची कागदपत्रे न्यायालयात मागवण्यात बंधने येणार नाहीत. सात्यकी सावरकर यांनी न्यायालयात प्रविष्ट केलेली कागदपत्रे, राहुल गांधी यांच्या भाषणाची ध्वनीचित्रफीत, वर्तमानपत्रे, पुस्तके, साक्षीदारांचे प्रतिज्ञापत्र हे बचाव पक्षाकडे हस्तांतरित करावेत, असा युक्तीवाद अधिवक्ता मिलींद पवार यांनी केला. त्यानुसार सात्यकी सावरकरांनी सर्व कागदपत्रे बचाव पक्षाला हस्तांतरित करावी आणि त्यांचे म्हणणे लेखी द्यावे, असे विशेष न्यायाधीश अमोल शिंदे यांनी सांगितले.